सांग किती दिवस - मराठी गझल

सांग किती दिवस, मराठी गझल - [Sang Kiti Diwas, Marathi Ghazal] सांग किती दिवस असे एकटे रहायचे, गीत माझे नवे एकट्यानेच गायचे.

सांग किती दिवस असे एकटे रहायचे, गीत माझे नवे एकट्यानेच गायचे

सांग किती दिवस असे एकटे रहायचे
गीत माझे नवे एकट्यानेच गायचे

मी मांडलेला पसारा खोलीभर माझ्या
मला सावराया जरा, कोण इथे यायचे

डोळ्यात आठवांचे कैफ, ओठात हास्य
आरशाने मज आता कितीदा पाहायचे

गुज मनी उलगडूनी लोळतो अंथरुणात
झोपेलाही आता झोप नाही म्हणायचे

वीज जाते अचानक अंधारते रात
जीव कातर अन्‌ भय कुणा सांगायचे

बोलणे मनाशीच, रात सरते मुक्याने
मी थांबतो जरी, वेळेने का थांबायचे

दूर कुठेतरी स्मरेल मजला कोणी
इथे येउनी मज कोण साथ द्यायचे

सांग किती दिवस असे एकटे रहायचे
गीत माझे नवे एकट्यानेच गायचे


उमेश कुंभार | Umesh Kumbhar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता आणि मराठी गझल या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.