कालपुरूष - एक शोध एक रहस्य - भाग २

कालपुरूष - एक शोध एक रहस्य - भाग २ - [Kaalpurush - Ek Shodh Ek Rahasya - Part 2] जमीन, समुद्र आणि आता अंतराळात देखिल कचऱ्याच्या महासंकटाचा उलगडा करणारी रहस्य कथा.
कालपुरूष - एक शोध एक रहस्य - भाग २ - मराठी कथा | Kaalpurush - Ek Shodh Ek Rahasya - Part 2 - Marathi Katha

महासागराचे खारे कडवट पाणी मानवनिर्मित कचरा व सुर्याची अतिनील किरणे

लघुग्रहाचा तुकडा उपग्रहाकडे वेगाने येत असतो. त्या उपग्रहावर नजर ठेवून असलेल्या शास्त्रज्ञांना कोणतीतरी गोष्ट उपग्रहाकडे येत आहे, हे अस्पष्ट दिसत असते. ते त्या वस्तूची माहिती मिळविणार इतक्यात संपूर्ण अमेरिकेची ‘इंटरनेट’ सेवा अचानक जागेवरच ठप्प होते व तो लघुग्रहाचा तुकडा उपग्रहाला एक जोरदार धडक देतो आणि सिक्यॉर - १ हा उपग्रह आपल्या कक्षेतून काही काळासाठी भरकटतो.

जगाची रडार यंत्रणा बर्फ गोठल्यासारखी जागेवर थांबते. या सर्व घटनांचा मानवी जीवनावर अत्यंत गंभीर परिणाम होतो. बॅंकींग क्षेत्रापासून हॉस्पिटल, एअरपोर्ट सर्वच गोष्टींवर या घटनांचा परिणाम होतो. सुर्यावर एक मोठे सौरवादळ सुरू होते. त्याची अतिनील किरणे पृथ्वीचे हवामान भेदून उत्तर अटलांटिक महासागराच्या विशाल जलाशयात एक समूह होऊन घुसतात. सर्व जग अचानक थांबल्यामुळे मानवी मनात एकच प्रश्न निर्माण होतो; हे काय होत आहे? ती उष्ण अतिनील किरणे अटलांटिक महासागराच्या तळाशी पोहचतात जिथे सर्व महासागरांतील कचरा एकत्र झालेला असतो.

[next] महासागराचे खारे कडवट पाणी मानवनिर्मित कचरा व सुर्याची अतिनील किरणे यांपासून एक महाकाय जीव समुद्राच्या खोल तळाशी तयार होऊ लागतो. विजा कडकडू लागतात. मोठ्या पावसाला सुरुवात होते. संपूर्ण जगात भयानक वातावरण तयार झालेले असते. सर्व लोक जमेल त्या ठिकाणी एकत्र येऊन परमेश्वराला प्रार्थना करत असतात. छोटी अस्मी भगवान श्रीकृष्ण यांच्या फोटोसमोर उभी राहून आपले हात व डोळे घट्ट मिटून प्रार्थना करत असते. इथे भारतात राजेंद्र शर्मा यांना सर्व गोष्टींची कल्पना येते. ‘आरोयन’ (कालपुरूष) तयार होत आहे, असे म्हणत ते एका मोठ्या फोटोजवळ येतात व त्या फोटोवरील कापड ओढतात. तो मोठा फोटो भगवान विष्णूंच्या कल्की अवताराचा असतो. त्यांना त्या फोटोमध्ये कालपुरूषाचा चेहरा दिसू लागतो. अमेरिकेच्या एका मोठ्या चर्चमध्ये कॅंडल घेऊन प्रे करायला निघालेल्या लोकांच्या हातातील कॅंडल्स विझून जातात व चर्चचे दार आपोआप बंद होते.

इकडे त्या महासागरात कालपुरूषाचे प्रथम दोन भलेमोठे पाय तयार होतात नंतर त्याचे शरीर कमरेपर्यंत तयार होते. नंतर त्याचे महाकाय हात तयार होतात. हा कालपुरूष हिंदू पुराणातील उल्लेखानुसार मानवनिर्मित प्रदुषण - कचर्‍याने व निसर्गाच्या प्रकोपाने त्याचे संपूर्ण शरीर तोंडापासून पूर्ण तयार होते. तो पूर्ण तयार झाल्यावर सुर्याची किरणे यायची बंद होतात. पण पृथ्वीवरील वातावरण मात्र अजून जैसे थे असते.

[next]कालपुरूषाची उंची एक हजार फुट असते. तो उठून उभा राहत असताना तितक्याच मोठ्या उंचीची लाट तयार होऊन किनार्‍यावर आदळते. त्याचे संपुर्ण शरीर काळ्या केसाळ रंगाचे, धिप्पाड जाडजुड असते. त्याचे दोन सूळे दात असतात. नाक बसके असते. त्याचे लाल भडक रंगाचे डोळे तो उघडतो आणि आसपास चौफेर नजर फिरवतो. परमेश्वराने बनविलेल्या पृथ्वीमातेची अशी वाईट अवस्था पाहून तो फार भावूक होतो. नंतर त्या भावूकतेचे रुपांतर प्रचंड अश्या रागात होते.

तो भलीमोठी गर्जना करतो आणि या कलयुगी मानवजातीचा विनाश करण्यासाठी आपले पहिले पाऊल पुढे टाकतो. हळुहळु परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागते. नासाचा कॉम्प्युटर लॅब सुरू होतो. पण त्यांना अवकाशात सिक्यॉर - १ या उपग्रहाचे अवशेष कुठेच दिसत नाहीत. सर्व शास्त्रज्ञ बुचकाळ्यात पडतात. आता जे काही झाले होते हा त्याचाच परिणाम आहे, त्याची त्यांना खात्री पटते. तरीही ते उपग्रहाचे अवशेष शोधू लागतात.

इकडे अटलांटिक महासागराच्या पूर्वेहून ‘पिरॅमिड’ नावाचे जहाज किनार्‍याकडे येत असते. त्या जहाजावर चार ते पाच लोकं असतात. त्यातला मॅक नावाचा व्यक्ती जहाज चालवत असतो. जे काही घडलं होतं त्याचा परिणाम या जहाजावर देखील झालेला असतो म्हणून ते पाचही जण फार घाबरलेले असतात. त्यातला मॅक त्या बाकीच्यांना म्हणतो की, ‘अरे यार! अभी हम भटक गये थे, मुझे लगा हम ‘बर्म्युडा ट्रॅंगल’ में फ़से हुए है। लेकीन अच्छा हुआ हमे सिग्नल मिल गया और हम बच गये।’

[next]जॉय नावाचा इसम काही बोलणार इतक्यात त्यांना एक भली मोठी कंपन पावणारी ध्वनी ऐकू येते. ‘ये क्या? ये क्या था यार?’ जॉय अडखळत त्यांना विचारतो. ‘तू इसे संभाल, मै देखता हूँ।’असे म्हणून मॅक काय प्रकार आहे ते पहायला जातो. बाहेर चहुबाजूला पाहतो तर त्याला काहीच दिसत नाही. वर आकाशाकडे पाहतो तर आकाशातील भयानक परिस्थिती पाहून त्याला काहीच सुचत नाही.

इतक्यात एक मोठी वीज कडाडते. तिचा आवाज हृदय चिरणारा असतो व त्या वीजेच्या प्रकाशात मॅकला कालपुरूषाची महाभयानक सावली नजरेस पडते. तो मोठ्याने किंचाळत आत पळत सुटतो. बाकीचे साथीदार त्याला काय झाले विचारत असतात. तो जॉयला लाईट बंद करायला सांगतो. कालपुरूष त्या जहाजाच्या मागे उभा असतो. ते पाच जण फार घाबरलेले असतात. मॅक काही सांगणार इतक्यात त्याचे जहाज अटलांटिक महासागराच्या आग्नेय दिशेला फेकले जाते आणि जहाजासोबत सर्व प्रवासी जलसमाधीस प्राप्त होतात आणि कालपुरूष एक मोठी उडी घेतो.

न्युयॉर्क शहरातील सर्व नागरिक ब्रुकलिन ब्रीज वर उभे असतात, त्यांच्यात दहशतीचे वातावरण पसरलेले असते. सर्वजण जगाचा विनाश होणार ‘गॉड प्लीज सेव्ह मी’ अशी प्रार्थना ईश्वराला करत असतात. पावसाची रिपरिप, विजांचा कडकडाट सुरूच असतो. श्रेया घाबरलेल्या अस्मीला सावरत असते. इतक्यात तिथे जॅक्सन व विल्यम्स हे दोघे येतात. त्या दोघांना पाहून विक्रमला थोडे हायसे वाटते. ’विक्रम, आपल्याला इमिजिएटली इंडियाला जायला हवे. तिथेच आपल्याला सर्व प्रश्नांची उकल होईल.’ विक्रम क्षणभर विचार करतो आणि विल्यम्सला म्हणतो ‘पण आपण जायचं कसं? विमानसेवा तर ठप्प पडली आहे?’ ‘आपण माझ्या खासगी विमानात बसून इंडियाला जाऊ शकतो.’ जॅक्सन लगेच हा प्रॉब्लेम सोडवतो. तसे ते सहाजण वेळ न दवडता इंडियाकडे रवाना होतात.

[next]अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सर विस्टन चर्चिल एका लाईव्ह सभेद्वारे अमेरिकेतील नागरिकांना संबोधित करतात की - आज जे नैसर्गिक संकट आपल्यावर ओढावले आहे त्याचा सर्वांनी एकजूट होऊन सामना करायला हवा. मी लष्करला आदेश देतो की जिथून हा क्रिचर आला आहे त्याला तिथेच नष्ट करा. या आदेशावरून तीन अण्वस्त्रधारी लढाऊ विमाने अटलांटिक महासागराच्या दिशेने रवाना होतात.

कालपुरूष अटलांटिक महासागराच्या सीमा ओलांडून वॉशिंग्टन डि. सी व आसपासच्या शहरात दाखल होतो. त्याची प्रत्येक हालचाल विध्वंसच करत असते. तो समोर येणार्‍या प्रत्येक गोष्टीचा अशाप्रकारे विनाश करत असतो की जेणेकरून विश्व निर्मात्याने त्याला असा आदेशच दिला आहे की ‘जा आणि संपूर्ण मानवजातीचा आणि त्याच्या साम्राज्याचा विनाश कर.’ वॉशिंग्टन शहरातील सर्व इमारती अगदी पत्त्याप्रमाणे कोसळतात आणि तेथील लोक त्या ढिगार्‍याखाली चेंगरून मरण पावतात.

तेवढ्यात ती तीन लष्करी विमाने कालपुरुषाच्या समोर एक ठराविक अंतर ठेवून उभी राहतात. त्यांना पाहून तर कालपुरूष आणखीच चवताळतो. प्रथम ते तिघेही वैमानिक त्याला पाहून फार घाबरतात. पण नंतर ते तिघे एकमेकांना धीर देऊन आपल्या मिशनची आठवण करुन देतात. F. A. I या विमानाचा वैमानिक कालपुरुषाच्या दिशेने एक मिसाईल सोडतो. पण ते मिसाईल एका ठराविक अंतरावर जाऊन मध्येच नष्ट होते. हे पाहून ते तिघे वैमानिक चकीत होतात. इतर दोन वैमानिक देखील कालपुरूषाच्या दिशेने मिसाईल्स सोडतात. पण व्यर्थ! ती देखील तशाच प्रकारे फुटून नष्ट होतात. नंतर ते गोळ्यांचा वापर करतात. पण गोळ्याही ठराविक अंतरावर जाऊन खाली पडतात. समोरचा प्रकार पाहून त्या वैमानिकांना काहीच समजत नसते. F. A. I या विमानाचा वैमानिक तात्काळ रडार यंत्रणेसाठी संपर्क साधून त्यांना त्या घटनेची माहिती देतो की आमच्याद्वारे सोडलेली बुलेट अथवा मिसाईल्स त्या क्रिचरजवळ जात नाही आहेत, आम्ही काय करु? तर त्यांना रडार यंत्रणेकडून ताबडतोब मागे फिरण्याचे आदेश मिळतात. ते तिघेही वैमानिक आपले विमानमागे फिरवणार इतक्यात कालपुरूष त्यांच्या दिशेने एक भलीमोठी इमारत उचलून फेकतो आणि त्या इमारतीच्या खाली सापडून त्या तिनही विमानांचा चक्काचूर होतो.

[next]इकडे विल्यम्स, जॅक्सन, विक्रम इ. भारतातील राजस्थान राज्यातील रकाबगढ या गावी पोहचतात. त्यांचे विमान राजेंद्र शर्मा यांच्या घरापाशी येऊन लॅंड होते. ते घर पाहून विक्रम विल्यम्सला म्हणतो की हे तर माझेच घर आहे. ‘व्हॉट? म्हणजे राजेंद्र शर्मा तुझे वडील?’ विल्यम्स आश्चर्याने विक्रमला म्हणतो. ‘येस सर! दहा वर्षापुर्वीच मी त्यांच्याशी व या घराशी असलेले सर्व संबंध तोडून यू. एस. ए. मध्ये आलो होतो.’ ‘पण का?’ विल्यम्स त्याला विचारतो. ‘सर, माझे वडील नेहमीच ग्रह - तारे पृथ्वीची उत्पत्ती यांवर संशोधन करत असत. एके दिवशी रात्री मी बाहेरगावी गेलो होतो. बाबा कुठल्यातरी गूढ विषयावर संशोधन करत होते व आईला त्याच रात्री हृदयविकाराचा तीव्र झटका आला. बाबा संशोधनात इतके व्यस्त झाले होते की आईला काय होतेय हे त्यांना कळलेच नाही व आई त्या झटक्यातच गतप्राण झाली.’

‘दुसर्‍या दिवशी घरी परतलो तेव्हा लोकांच्या सानिध्यात माझ्या आईचे गतप्राण शरीर पाहून मला फार मोठा धक्का बसला. बाबा एकेठिकाणी खाली मान घालून बसले होते. तेव्हा इतर लोकांनी धीर देत मला सर्व घटना सांगितली. तेव्हा मला बाबांचा फार संताप आला होता. आईचा दहनविधी उरकून मी बाबांशी या विषयावर शेवटचं बोलायचं ठरवलं तेव्हा आमच्या दोघांत फार मोठा वाद झाला व रात्रीच मी घर सोडले. पण दैवदुर्विलासाने याच क्षेत्रात मला आवड निर्माण झाली व नोकरी करावी लागली.’ हे सांगत असताना विक्रमच्या डोळ्यातून अश्रू ओघळत असतात. श्रेया त्याला धीर देते. ‘पण सर तुम्ही माझ्या बाबांना कसे ओळखता?’ आपले डोळे पुसत विक्रम विल्यम्सला विचारतो.

[next]त्याच्या थोडे जवळ जाऊन विल्यम्स त्याला म्हणतो, माझ्या संशोधनावर, लिखित पुस्तकांवर मि. शर्मा यांचा त्यांच्या विचारांचा फार पगडा आहे. जॅक्सन व मी कॉलेजजीवनापासून त्यांचे विचार वाचत आलो आहे व आज या समस्येवर तेच आपल्याला उपाय सांगतील, असे म्हणून ते दार ठोठावतात. बेल वाजवतात पण आतून काहीच रिस्पॉन्स येत नाही.

नाईलाजाने जॅक्सन व विल्यम्स यांना दार तोडावे लागते. ते दार तोडून आत प्रवेश करतात तर त्यांना टेबलावर राजेंद्र शर्मा यांचा मृतदेह दिसतो. त्या सर्वांना यायला फार उशीर झालेला असतो. समोरील दृष्य पाहून सर्वजण फार गहिवरतात. विक्रमला फार वाईट वाटते. त्याला लहानपणीचे दिवस आठवू लागतात. त्याला रडू कोसळते. श्रेया व जॅक्सन त्याला सावरू लागतात. त्याच टेबलावर विल्यम्सला एक पुस्तक सापडते, जे मरणाच्या आधी राजेंद्र शर्मा यांनी लिहून ठेवलेले असते. त्या पुस्तकात आता जे काही घडत आहे व पुढे जे काही घडणार असते त्याचा सर्व तपशील लिहून ठेवलेला असतो. म्हणजे कालपुरूष कसा तयार होणार आहे? तो कोणाच्या चुकीमुळे तयार झाला आहे? मानवाच्या की निसर्गाच्या इ. विल्यम्स त्या पुस्तकातील पाने पलटू लागतो.

[next] “आता जर कोणी हे पुस्तक वाचत असेल त्याने समजावे की कालपुरूष पूर्ण तयार होऊन मानवी संहारासाठी पुढे सरसावला आहे. त्याला मानवाची विज्ञान शक्ती थांबवू शकत नाही. तो विश्वनिर्मात्याच्या आदेशावर काम करत आहे. त्याला या पृथ्वीवरून संपूर्ण जीवनसृष्टीचा नाश करून पुन्हा नवीन सजीवसृष्टी निर्माण करायची आहे. पण त्याच्या या प्रचंड नरसंहारात अनेक निष्पाप सजीव मारले जातील आणि विश्वनिर्माता इतका निष्ठूर नाही. कालपुरुषाला थांबवण्यासाठी मानवी विज्ञान नाही तर अध्यात्माची गरज लागेल. विश्वनिर्माताच्या आदेशावर चालणार्‍या कालपुरुषाला विश्वनिर्माताच थांबवू शकेल. अहिंसेची देवता जी आपले दोन्ही हात पसरवून संपूर्ण जगाचे पाप क्षम्य करून त्याला मिठीत घ्यायला उभी आहे. ती अहिंसेची देवताच त्या कालपुरुषाला थांबवू शकेल. पण हे काम वाटते तितके सोपे नाही. विल्यम्स पुढे वाचणार इतक्यात त्या घराला खालून भुकंपाचे धक्के बसायला लागतात व ते घर भूमिगत व्हायला लागते.

तसे ते सर्वजण तिथून बाहेर पडू लागतात. अचानक विल्यम्सच्या पायाखालची जमीन खचू लागते. तो खाली पडणार इतक्यात जॅक्सन व विक्रम त्याला पकडतात पण ते पुस्तक मात्र विल्यम्सच्या हातून खाली पडते. ते तिघे तशाच अवस्थेत घराबाहेर पडतात व बघताक्षणी ते घर भूमीत गडप होते. विल्यम्स त्या सर्वांना म्हणतो की आपल्याला ताबडतोब अमेरिकेला जाऊन मि. प्रेसिडेंट यांच्या कानावरही बातमी घालायला हवी. पण विल्यम्स, या पृथ्वीवर अशी कोणती अहिंसेच्या देवतेची मूर्ती आहे, जी त्या हिंसक कालपुरुषाला थांबवून परत पाठवेल? जॅक्सनच्या या प्रश्नावर विल्यम्स त्याला उत्तर देतो की जॅक्सन इथे आपल्याला ‘जिजस क्राईस’ मदत करतील. आपले दोन हात पसरवून संपूर्ण जग मिठीत घेणार्‍या मूर्तीचे नाव आहे Christ the redeemer, तेव्हा सर्वांच्या लक्षात येते आपल्याला तो ईश्वर वाचवू शकेल.

[next] ताबडतोब ते सर्वजण अमेरिकेला रवाना होतात. इकडे कालपुरुषाचा उच्छाद सुरूच असतो. त्याच्या कहरामुळे संपूर्ण न्युयॉर्क शहर जलमय होते. Staue of Liberty पाण्यात बुडुन जाते. संपूर्ण अमेरिकेची लष्करी ताकद त्या प्रचंड कालपुरुषासमोर तोकडी पडते. या गोष्टीवर काय तोडगा काढायचा या विषयावर अमेरिकेचे राष्ट्रपती, कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष, रशियाचे राष्ट्राध्यक्ष बैठकीसाठी व्हाईट हाऊसमध्ये बसले असता व्हाईट हाऊसच्या परिसरात भूस्खलन होऊ लागते आणि बघता बघता संपूर्ण व्हाईट हाऊस व त्या सभोवतालचा परिसर भूमीत गाडला जातो. इकडे जॅक्सनचे विमान भारताहून अमेरिकेला पोहचतच असते की अचानक त्यांच्या विमानात काही अनवॉंटेड बदल होऊ लागतात. त्यांच्या विमानाचा कंपास त्यांना योग्य दिशा न दाखविता गरागरा फिरू लागतो.

‘विल्यम्स, हे अचानक काय होत आहे? तू थोडं चालव.’ असे म्हणून जॅक्सन विल्यम्सच्या हाती विमानाचे स्टेअरिंग देतो. तरीही विमानातील कंपास यंत्रणा त्यांना वेगळीच दिशा दाखवू लागते. विमानातील बल्ब ऑन - ऑफ होऊ लागतात. त्यांच्या काहीच लक्षात येत नसते. अचानक त्यांच्या विमानाचा रडार यंत्रणेशी असणारा संपर्क तुटतो. त्यांचे विमान भरकटते. ते सर्वजण फार घाबरतात व अचानक विमानातील सर्व लाईट्स ऑफ होतात. इमर्जन्सीचा एकच लाईट सुरू असतो.

[next] विमानातील तापमान अचानक थंड होते व त्या थंड वातावरणामुळे विमानाच्या काचेवर आतून बाष्प तयार होऊन साठते. विल्यम्स आपल्या हाताने काचेवरील बाष्प थोडे साफ करतो. अचानक त्याला समोर ढगांची पोकळी दिसते व हळूहळू त्यांचे विमान त्या पोकळीत प्रवेश करू लागते. त्या सर्वांना जाणवते की हे विमान आपण नाही तर कोणी दुसरेच चालवत आहे. कारण इंधन संपूनही विमान पुढे जातच असते. ‘जॅक्सन, विक्रम हे ठीक होत नाही आहे. विमान आपल्या कंट्रोलच्या बाहेर गेले आहे,’ विल्यम्स त्यांना चेतावनी देतो व पुन्हा ते विमान आपल्या कंट्रोलमध्ये घ्यायचा प्रयत्न करतो पण त्यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ होतात.

अचानक विल्यम्सची नजर काचेवर जाते तर समोर एक काळी आकृती तयार होऊ लागते. विल्यम्स घाबरून जॅक्सन व विक्रमकडे पाहतो तर ते दोघेही मान हलवून आपणही ती आकृती पाहिली आहे असे त्याला सांगतात. ती आकृती पूर्ण रुप धारण करते व आपला तीन बोटांचा हात पुढे करून त्यांना इशार्‍याने आपल्याकडे बोलवू लागते. ते सर्वजण फार घाबरतात. त्यांचे विमान हेलकावे खाऊ लागते व पुढच्या क्षणाला त्यांचे विमान अचानक गायब होते. पाण्यात जसे मीठ विरघळते तसे त्यांचे विमान त्या ढगांच्या पोकळीत विरघळते. जॅक्सन, विक्रम, विल्यम्स, श्रेया व अस्मी आणि कालपुरूषला थांबवण्याच्या माहितीसह त्यांचे विमान गुढरित्या गायब होते.

[next] संपूर्ण अमेरिकेतील सजीवांचा नाश करून कालपुरुष कॅनडा, ग्रीनलॅंड, नॉर्वे, युनायटेड किंग्डम, पेरू, फ्रान्स इ. देशांमधील मानव व मानवनिर्मित साधनांचा सर्वनाश करत शेवटी चीनच्या वेशीवर येऊन धडकतो. एका धडक्यात चीनची भिंत पार करून त्या देशातील सर्व नागरिकांचा नाश करून कालपुरूष भारतात आसाममार्गे दाखल होतो. भारतातील सर्व सभ्यता नाश करून कालपुरूष जगातील शेवटच्या ऑस्ट्रेलिया खंडाकडे वळतो. ऑस्ट्रेलिया खंडातील निम्मी लोकसंख्या सुर्याच्या तप्त ज्वाळांनी नष्ट झालेली होती व निम्मी लोकसंख्या कालपुरूषाच्या हातून नष्ट होते. कालपुरूषाच्या तावडीतून कोणताच सजीव प्राणी सुटत नाही, तो सर्वांचा नाश करतो.

जगातला शेवटचा सजीव कालपुरूषाच्या हातून यमसदनी धाडल्या गेल्यावर पृथ्वीवर फक्त कालपुरूषच उभा असतो. थोडावेळ थांबून तो त्याचे पुढचे काम सुरू करतो. जी पृथ्वी विश्वनिर्मात्याने दोन पायांच्या, दोन हातांच्या मानवाच्या राहणीमानासाठी बनवलेली असते त्या पृथ्वीची रचना कालपुरूष बदलू लागतो. आज जिथे भारत, चीन, रशिया हे देश आहेत तिथे अंटार्टिका खंड येतो. कॅनडा या दुसर्‍या मोठ्या देशाची बारा लहान देशात विभागणी होते. हिंदी महासागराची जागा अमेरिका, ग्रीनलॅंड ई. देश घेतात. पॅसिफिक महासागराच्या जागी भली मोठी पर्वतरांग निर्माण होते. हे सर्व बदल करण्यात कालपुरूषाला हजारो वर्षे लागतात. पृथ्वीवरील शेवटचा बदल करून कालपुरूष हवेत विरून जातो.

नंतर लाखो वर्षानंतर पृथ्वीवर एक नवीन सुर्योदय होतो. तारीख ०१-०१-०००१ हा दिवस उजाडतो व पुन्हा एकदा पाण्यातून एक नवीन सजीवसृष्टी श्वास घेऊ लागते.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.