ओल्या मातीचा सुवास - मराठी कविता

ओल्या मातीचा सुवास, मराठी कविता - [Olya Maticha Suvas, Marathi Kavita] आज दुपारी सूर्य एकाकी नाहीसा झाला, माध्यान्हीच्या वेळी देखील संध्येचा भास झाला.

आज दुपारी सूर्य एकाकी नाहीसा झाला, माध्यान्हीच्या वेळी देखील संध्येचा भास झाला

आज दुपारी सूर्य एकाकी नाहीसा झाला
माध्यान्हीच्या वेळी देखील संध्येचा भास झाला
पाहता पाहता ढगांनी गर्दी केली नभात
काय सांगू तुला, आज भिजले मी पावसात

मोत्यांची माळ तुटावी, तशी सर धरणीवर आली
फुले, पाने सारी मग चिंब न्हाऊन गेली
चिंब झाले मीही, उतरला पाऊस रोमारोमात
काय सांगू तुला, आज भिजले मी पावसात

थेंब अंगावर नाचवत आज रस्ताही भिजला
ओल्या मातीचा सुवास, आसमंतात भरून गेला
प्राजक्ताचा गंध गुंतला, माझ्या ओल्या केसांत
काय सांगू तुला, आज भिजले मी पावसात

थेंब थेंब ओवून ठेवत, पावसाची लडी आली
पाना-पानाच्या देठात हिरवा चुडा भरून गेली
अन् मी चढवला अंगावर, हा हर्ष सप्तरंगात
काय सांगु तुला, आज भिजले मी पावसात

आई म्हणाली, “मोठी झालीस, तरी अजून पावसात भिजतेस ?”
मी म्हणाले, “अगं आई, पावसाला वयाचे बंधन नसतेच...”
मग मी तरी का अडकावं जगाच्या या बंधनात
काय सांगू तुला, आज भिजले मी पावसात


श्रद्धा नामजोशी | Shraddha Namjoshi
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.