जमदग्नीकुळभूषण मुक्ताफळदशना, अतिसज्जन मनमोहन रजनीकरवदना
जमदग्नीकुळभूषण मुक्ताफळदशना ।अतिसज्जन मनमोहन रजनीकरवदना ॥
अगणित महिमा तुझा न कळे सुरगणा ।
वदतो कंठी वाणी सरसीरुहनयना ॥ १ ॥
जय राम श्रीरम जय भार्गवरामा ।
नीरांजन करु तुजला परिपूर्णकामा ॥ ध्रु० ॥
सह्याद्रिगिरिशिखरी शर घेउनि येसी ।
सोडुनि शर पळवीसी पश्चिमजलधीसी ॥
तुजसम रणधीर जगी न पडे दृष्टीसी ।
प्रताप थोर तुझा नकळे कवणासी ॥ जय० ॥ २ ॥
तव कोप बहु पापी बाणे संहारी ।
दानवदहन करुनी वससी गिरिशिखरी ॥
क्षत्रिय मारुनि अवनी केली निवैरी ।
सात्त्विक राजस तामस त्रिगुणा उद्धरी ॥ जय० ॥ ३ ॥
द्रुढ भावे तव वंदन करिती जे चरणी ।
त्याते भवभय नाही जंववरि शशितरणी ॥
शर मारुनी उद्भविली गंगा जनतरणी ।
चिंतामणि शरणागत निश्चित तव चरणी ॥ जय राम श्रीराम० ॥ ४ ॥