पाखरांची कलकल - मराठी कविता

पाखरांची कलकल, मराठी कविता - [Pakharanchi Kalkal, Marathi Kavita] पाखरांची कलकल, गेली दूर देशी, गांव पांगतोना, गहिवरल्या वेश.
पाखरांची कलकल - मराठी कविता | Pakharanchi Kalkal - Marathi Kavita

पाखरांची कलकल, गेली दूर देशी, गांव पांगतोना, गहिवरल्या वेश

पाखरांची कलकल
गेली दूर देशी
गांव पांगतोना
गहिवरल्या वेशी

नाही लहरत वारा
अंगणात झाड मुके
वाट पायाखालची
रोज रोज चुके

ओसाड भकास रस्ते
गाव अंधारून जाई
कोऱ्या कागदाच्या वर
जशी सांडली शाई

तिन्ही सांजेच्या वेळेला
नाही हंबरत गाय
गोठा रिकामाच राही
तिथं उमटले पाय

नाही राहिला महादेव
गेली सुकून तुळस
माळावरच्या देवाचा
कोणी तोडिला पळस

जुन्या काळची माणसे
आता राहिलीत कुठे
भाकरीच्या साठी
घर गावातून उठे

गाव विसरत आले
जाती उसवून धागे
जुन्या आठवात मन
वळू वळू बघे

कधी वाटते मला
माझ्या गावात जावं
कूप ओलांडत नाही
तरी सरड्याची धावं

भकास वाड्याच्या भिंती
आता कोसळल्या पार
तुटे लेकरांचा लळा
फिरे एकलीच घार

गाव दूरदूर माझे
नाही घेणार नाव
काळजाच्या कोपऱ्यात
एक वसविलं गाव

वाट चुकली माझी
गेलो भटकत असा
नव्या गावात पाहुणा
जाई बावरून जसा

कशी झाली ताटातूट
काही राहीलेन याद
तुझ्या आर्त किंकाळीला
माझी कासाविस साद
संतोष सेलुकर | Santosh Selukar
परभणी, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
लिखाणाची आवड असणारे आणि व्यवसायाने शिक्षकी पेशात असलेले संतोष सेलुकर यांचा ‘दुरचे गाव’ हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.