तीर्थक्षेत्रे - महाराष्ट्र

तीर्थक्षेत्रे, महाराष्ट्र - [Tirthakshetre, Maharashtra] धार्मिक वास्तू व मंदिरे यांचा विचार करताना प्रारंभीच्या कालखंडात राष्ट्रकूटांच्या वेरूळ व अजिंठा येथील वास्तूंचा विचार होतो.

धार्मिक वास्तू व मंदिरे यांचा विचार करताना प्रारंभीच्या कालखंडात राष्ट्रकूटांच्या वेरूळ व अजिंठा येथील वास्तूंचा विचार होतो

महाराष्ट्राच्या वास्तुशिल्प परंपरेत डोंगर, शिखरे किंवा महत्त्वाची धार्मिक स्थाने यांवर बांधलेल्या देऊळवाड्यांचे स्थान फार महत्त्वाचे आहे.

धार्मिक वास्तू व मंदिरे यांचा विचार करताना प्रारंभीच्या कालखंडात राष्ट्रकूटांच्या वेरूळ व अजिंठा येथील वास्तूंचा विचार होतो. सातव्या व आठव्या शतकांत कोरलेल्या या लेण्यांची जागा शेव पंथीयांचे एक महत्त्वाचे धार्मिक स्थान होते. नंतरच्या सतराव्या व अठराव्या शतकांतील मराठा व पेशवाई अमदानीत राजेरजवाडे व सरदारांनी मंदिरवास्तुकलेला सक्रीय प्रोत्साहन दिले. त्यामुळे अनेक मंदिरांवर या कालखंडात निर्माण झालेल्या मराठा वास्तुकलेचा ठसा स्पष्टपणे दिसून येतो.

मराठा वास्तुकलेची जडणघडण अनेक वास्तुपद्धतींच्या सम्मिश्रणातून झालेली आहे. उत्तरेकडील वास्तुशिल्पांत भुवनेश्वर, कोणार्क, खजराहो वगैरे मंदिरसमुच्चय त्या मंदिरांचे आकार व वास्तुशिल्पकलेमुळे प्रसिद्ध आहेत. त्या उलट, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या ‘ठेविले अनंते तैसेची रहावे । चित्ती असो द्यावे समाधान ॥’ या अल्पसंतुष्ट राहण्याच्या उपदेशामुळे महत्त्वाच्या मंदिरांची वास्तुशिल्पकलाही खास उल्लेखनीय नाही. शिवाय मराठ्यांना व नंतरच्या पेशव्यांना राजकीय स्थैर्य व शांतता नसल्यामुळे मोठी मंदिरे किंवा इमारती बांधण्याच्या योजना हाती घेता आल्या नाहीत. या मंदिरावर उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय व प्रादेशिक स्थानिक लोककलांचा प्रभाव पडलेला दिसतो.

छत्रपती शिवाजी महाराजांचा व नंतर पेशवे व मराठे सरदार यांचा काळ मोगल, निजाम व इतर अनेक शत्रूंशी लढण्यातच गेला व या अस्थिर परिस्थितीचे प्रतिबिंब आमच्या जेजुरी, शिखर-शिंगणापूर, पुण्यातील पर्वती वगैरे मंदिरांच्या बाहेरच्या दगडी तटबंदीच्या स्वरूपात दिसून येते. परंतु या ओबडधोबड दगडी तटबंदीच्या आत मात्र सुंदर, सुबक, प्रादेशिक शैलातील डौलदार मंदिरे आहेत. मराठी वास्तुकलेला उत्तर भारतीय, यादव, भूमिज व प्रादेशिक वास्तुकलेचा वारसा लाभला आहे.

पेशवाईच्या उत्तर कालखंडात थोडे स्थैर्य लाभल्यावर नागपूर, पुणे, वाई, नाशिक वगैरे शहरांतून मंदिरांचे बांधकाम व त्यांच्या सुधारणेचे काम चालू असे. त्यासाठी उत्तर भारत, पूर्व भारत किंवा ओरिसा व दक्षिणेकडील स्थपतींना पाचारण करण्यात येई. राजपूत दरबारांतील अनेक स्थपती पेशव्यांच्या दरबारी असत. भौगोलिक परिस्थित्यनुरूप नागपूरकडे नागपूरकर भोसल्यांच्या छत्राखाली नागपूर शैलीचा उगम झाला.

[next]

मराठी देउळवाडा


मराठी देऊळवाड्याचे स्वरूप खास महाराष्ट्रीय शैलीचे आहे. अशा देऊळवाड्याची काही ठळक वैशिष्टये असून बाहेरच्या तटबंदी व्यतिरिक्त मुख्य महाद्वार, पायऱ्या, दीपमाळा, देऊळ व स्नानाचे घाट किंवा तळे अशी त्याची प्रमुख अंगे आहेत.

पायऱ्या व स्मारक द्वारे व कमानी


जेजुरीचा खंडोबा वगैरे सारख्या डोंगरावरील देवळांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक दगडी पायऱ्या, उजेडासाठी दीपमाळा व अनेक कमानी उभारण्याची प्रथा आहे. भक्ती संप्रदायाप्रमाणे भाविकांना देवळापर्यंत नेणाऱ्या पायऱ्या व कमानी बांधणे हे दात्याला प्रत्यक्ष शिखर उभारण्याहूनही जास्त पुण्यदायी गणले जाते. यामुळेच अनेक देवळांना भक्तांनी पायऱ्या बांधल्या आहेत.

नगारखाना, दीपमाळा यातूनपायऱ्या मुख्य देऊळवाड्याच्या महाद्वारापर्यंत नेलेल्या असतात. देऊळवाड्याच्या तटबंदीमुळे जसे आतल्या मूर्ती, दागिने व इतर मौल्यवान वस्तुंचे रक्षण होते तसेच आतल्या बाजूला असलेल्या ओवऱ्यांना मजबूत आधारही मिळतो.

सभामंडप, अंतराळ व गाभारा किंवा गर्भगृह हे प्रत्यक्ष देवळाच्या वास्तूचे तीन घटक आहेत. उत्कृष्ट कोरीव काम असलेले खांब किंवा पितळेच्या पत्र्याने मढवलेले दगडी खांब सभामंडपासाठी वापरतात. लाकडी सुरूचे खांब राजपूत व गुजराती कारागिरांनी अठराव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात महाराष्ट्रात उपयोगात आणले.

यात्रा


उत्सव, पूजाअर्चा, मिरवणुका, भजन, पूजन वगैरे भक्तिमार्गी परंपरा महाराष्ट्रातील बहुतेक महत्त्वाच्या देवळांशी निगडित आहेत. काही नवसांच्या पूर्तीसाठी किंवा आशीर्वादप्राप्तीसाठी अनेक लोक पंढरपूरसारख्या यात्रेला नित्यनियमाने जातात. पंढरपूरची यात्रा आषाढी एकादशीला आणि कर्तिक व माघ महिन्यात होते. तर जेजुरीची यात्रा चैत्री व पौष पौर्णिमेला आणि सोमवती अमावास्येला असते. काही हजारांपासून लाखापर्यंत भाविक यात्रेला व नंतरच्या जत्रेला जमतात. उत्सवाचा भाग म्हणून मंदिरासमोर किंवा पायथ्याशी जत्रा भरते. जत्रेत फुले, अत्तर, गुलाब, हळद, कुंकू, खेळणी, पितळी पूजेचे सामान, मूर्ती, बैलांसाठी झुली व दागिने अशा अनेक वस्तूंची तात्पुरती दुकाने बसतात.

[next]

कोल्हापूरची अंबाबाई


कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरेल. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे.

मुसलमानांनी देवळाचा विध्वंस केला तेव्हा मूर्ती अनेक वर्षे पुजाऱ्याने लपवून ठेवली होती. पुढे संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत इ. स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा.

महालक्ष्मी ही विष्णूची भार्या व म्हणून समोर गरुडमंडपात विष्णुवाहन गरूडाची स्थापना केली आहे. तर मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील शिवलिंगामुळे देवी अनेकांच्या मते पार्वतीचे रूप आहे.

मंदिराची वास्तू


मंदिर पश्चिमाभिमुख असून महाद्वार पश्चिमेकडे आहे. पारंपारिक मराठा शैलीचा, लाकडी सुरूच्या खांबांचा व इस्पिदार कमानी असलेला, सभामंडप प्रवेश केल्यावर दिसतो. गेल्या दहा शतकांत मंदिराची अनेकदा वाढ झाली. मंदिराचे चार महत्त्वाचे भाग आहेत. पूर्व भागातील गाभारा व रंगमंडप हा सर्वात पुरातन भाग आहे. देवीचा गाभारा येथेच आहे. उत्तरेकडे महाकालीचा गाभारा तर दक्षिणेकडे महासरस्वतीचा गाभारा असून या तीन अंगांना जोडणाऱ्या सभामंडपास महानाटमंडप असे नामाभिमान आहे.

हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेबरोबर मंदिरासही देवपण येते व म्हणूनच देवळाची डागडुजी किंवा वाढ करणे सम्मत असले तरी कोणताही भाग काढून टाकणे किंवा पाडणे मान्य नाही. यामुळे जुन्या देवळांची मोठी वाढ झालेली दिसते. चैत्री पौर्णिमेच्या वेळी एका मागे एक अशा चढत जाणाऱ्या व दीपांनी पाजळेल्या तीन शिखरांचा देखावा अवर्णनीय दिसतो.

देवळाच्या भिंतीवर नर्तिका, वाद्ये वाजविणाऱ्या स्त्रिया, मृदंगी, टाळकरी, वीणावादी, आरसादेखी, यक्ष, अप्सरा, योद्धे व किन्नर कोरलेले आहेत. माघ शुद्ध पंचमीला सूर्यास्ताचे किरण बरोबर देवीच्या मुखावर पडतील असे उत्तम दिग्‌साधन, विनाचुन्याचे जोडीव-घडीव दगडी बांधकाम, व नक्षत्रावर अनेक कोनाचा पाया ही मंदिराचे वास्तुवैशिष्ट्ये होत. देवळाच्या प्राकारात शेषशायी, दत्तात्रेय, विष्णू, गणपती वगैरे अनेक देवतांची देवळे आणि काशी व मनकर्णिका कुंडे आहेत.

महालक्ष्मी हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळे नवस फेडण्यासाठी सर्वकाळ जनतेचा ओघ असतो. बाळाजी बाजीराव पेशव्यांची बायको गोपिकाबाई हिने नवस फेडण्यासाठी पावणेचोवीस तोळे ( जवळजवळ पाव किलो) वजनाचे सोन्याचे चार चुडे वाहिल्याचा उल्लेख सापडतो.

शुक्रवार, मंगळवार हे देवीचेदिवस मानले जातात. दर शुक्रवारी व आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष व माघ या चारही पोर्णिमेस व चैत्र वद्य प्रतिपदेस देवीच्या पितळी मूर्तीची पालखीप्रदक्षिणा काढली जाते. पालखीबरोबर देवीचे भालदार-चोपदार व पालखीचे भोई असतात. पूर्वी संस्थान असताना पालखीकरिता हत्ती, घोडे वगैरे सर्व लवाजमा असे. पालखीच्या सर्व टप्प्यांवर नायकिणींचे गाणे व नाच होत असे.

नवरात्रात नऊ दिवस देवीची वाहनपूजा बांधतात. घरच्या पूजेत कलश, फुलांची माळ, काळ्या मातीत पेरलेले धान्य वगैरे वापरण्यात येते. अष्टमीला देवीची नगरप्रदक्षिणा होते. नवसाप्रीत्यर्थ मंगळवारी व शुक्रवारी देवीचा जोगवा मागण्याची प्रथा आहे. आश्विन महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे. देवीला हळदकुंकू वाहून तांब्यापितळेच्या किंवा मातीच्या घागरी विस्तवावर ऊद घालून उदवायच्या व देवीसमोर फेर धरून फुंकावयाच्या असतात. या घागरी फुंकणाऱ्या काही स्त्रियांचे अंगात प्रत्यक्ष महालक्ष्मीचा संचार होतो. व त्या भविष्याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे सांगतात. इच्छा असल्यास पूर्ण होण्याचा उपाय सांगतात, असा समज आहे. एकंदर कोल्हापूरच्या अंबाबाईचा देऊळवाडा आणि संबंधित उत्सव व पूजाअर्चा महाराष्ट्रीय मंदिर-प्रथांचे उत्तम उदाहरण आहे.

[next]

जेजुरीचा खंडोबा


जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पुण्याजवळच्या जेजुरी ह्या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे हे जागृत देवस्थान आहे. धनगर, कोळी व इतर अनेक लोकांचे हे आरध्यादैवत असून इ. स. १६०८ मध्ये या देवळाचे बांधकाम झाले. सभामंडप व इतर काम इ. स. १६३७ साली राघो मंबाजी या मराठा सरदाराने केले, तर सभोवारच्या ओवऱ्या व इतर वास्तू होळकरांनी बांधल्या. इ. स. १७४२ मध्ये होळकरांनी दगडी खांब बांधले आणि सभोवारच्या तटबंदीचे व तलावाचे काम इ. स. १७७० मध्ये पूर्ण झाले.

निसर्गाच्या सन्निध्यात नैसर्गिक रीत्या वाढणाऱ्या वास्तूकलेचे जेजुरीचा खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे. खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे व म्हणूनच खंडोबाचा उपास रविवार व सूर्याचे वारी करण्याचा प्रघात असावा. कडेपठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्लाकोटा हे महत्त्वाचे स्थान खाली आहे.

गेल्या अनेक शतकात धनगर व इतर जमातींच्या भक्तांनी दगडी पायऱ्या, दीपमाळा, व कमानी उभारल्या आहेत. या सर्व बांधकामात मराठी वास्तुकला व निसर्गाशी समरसता दिसून येते. दीपमाळांचे अनेक प्रकार, कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे व नक्षी हे पाहिल्यावर जेजुरीच्या गतवैभवाची थोडी कल्पना येते.

देऊळ व परिसर


जेजुरीचे शिखर व समोरच्या मोठ्या दगडी कमानी यांचे प्रमाण व तोल मराठी वास्तुकारांनी उत्तम साधला होता. दुर्दैवाने शिखर-शिंगणपूर प्रमाणेच येथेही दाक्षिणात्य शैलीचे या वास्तूशी पूर्ण विशोभित शिखर नव्याने बांधण्यात आले आहे. देवळाच्या ओवऱ्या व समोरचा ओटा यांवर टोकदार दगडी कमानी आहेत.

देवळात प्रवेश करताना उत्तरेच्या दरवाजावरच देवाचा नगारखाना आहे. पूर्वाभिमुख देवळासमोर सात मीटर व्यासाचे आणि पितळी पत्र्याने मढवलेले मोठे कासव आहे. यावर भंडारा व खोबरे उधळण्याचा नवस फार लोक करतात. चांगभले खंडोबांचा येळकोट असा जयघोष करीत या भंडाऱ्यांची उधळण होते . तळी भरणे हा एक विधी असतो. ताटात खोबरे व भंडारा घ्यावयाचा, पूजा करून तळी त्रिवार डोक्यावर घ्यावयाची व मग खोबऱ्याची उधळण करावयाची.

खंडोबा ही सकाम देवता आहे. नाना फडणविसांनी नवसाप्रीत्यर्थ एक लाख रूपये देवालावाहिले होते. पंचवीस हजाराच्या मूर्ती केल्या, दगडी मंडपी रुप्याने मढवली व उरलेल्या रकमेतून सोन्याचे मुखवटे वगैरे सामुग्री वाहिली. मंदिरात चांदी-पितळेचे तीन मूर्ती जोड होते. एक सोन्याचा जोड १९४२ च्या सुमारास चोरला गेला; बाकी शिल्लक आहेत.

खंडोबाची यात्रा व जत्रा


खंडोबाची यात्रा व जत्रा चैत्र, पौष व माघ या तीन महिन्यात शुद्ध १२ ते वद्य १ पाच दिवस मार्गशीर्ष शुद्ध १ते ६ अशी सहा व सोमवती अमावस्या आणि आश्विनी शुद्ध १ते १० अशी दहा दिवस असतात. देवास वाहिलेल्या मुला-मुलींचे वाघ्या-मुरळींत रुपांतर होते. कावडी घालणे किंवा नियत संख्येच्या पाण्याच्या कवडी वाहणे, वाघ्या-मुरळींकडून जागरण किंवा तळी भरणे-उचलणे, बगाड किंवा गळ टोचून टांगून घेऊन देवास प्रदक्षिणा, लंगर साखळी तोडणे, वारी किंवा भीक मागणे व हाळावरून (विस्तवारून) चालणे अशा अनेक प्रकरे नवसपूर्ती करण्यात येते. पौषी व माघी पौर्णिमांच्या यात्रांसाठी वऱ्हाड, खानदेश, कोकण इत्यादी भागांतून उपासक येतात. खैरे, होलम व होळकर यांच्या काठ्या म्हणजे लाल पागोट्याचे फडके गुंडाळलेले ऊंच कळक मिरवणुकीने वद्य द्वितीयेस कोटात येतात व शिखरास स्पर्श करून आपापल्या गावी परत जातात. नवरात्रातही देवाचा मोठा उत्सव असतो. जेजुरीस अनेक भक्तगण महाराष्ट्रातून नियमाने येतात व खंडोबाच्या कृपेने व यात्रेत संतुष्ट होऊन परत फिरतात.

[next]

परशुराम क्षेत्र


परशुराम क्षेत्र हे कोकणातील सर्वात महत्त्वाचे व महाराष्ट्रात प्रसिद्ध असे देवालय आहे. परशुराम किंवा भार्गवराम हे कोकणस्थ ब्राह्मणांचे दैवत आहे. परशुराम हे श्रीविष्णूचा सहावा अवतार असून त्यांनी एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करण्याचा पराक्रम केला व त्यानंतर पृथ्वीचे कश्यप ऋषींना दान केले.

परशुराम हा विष्णूच्या दशावतारापैकी चिरंजीव अवतार समजला जातो. अंशात्मक रीत्या परशुरामाचे वास्तव्य चिपळूण जवळील महेंद्र पर्वतावर आहे असा भक्तांचा समज आहे. परशुराम क्षेत्र चिपळूणपासून चार किलोमीटर अंतरावर डोंगरावर आहे.

या देवळाचा इतिहास, यात्रा व जत्रा सर्वधर्मसमभावाचे द्योतक आहे. विजापूरच्या आदिलशहाने मुसलमान असूनही या देवळाच्या बांधणीसाठी खर्च केला.

वास्तुस्थापत्यात्मक वैशिष्ट्ये


या देवळाच्या घुमटांचा आकार व मांडणी आदिलशाही काळात झाल्यामुळे त्याची शैली वेगळीच आहे. शिखरावर मोठे कलश असून त्याखाली उतरत जाणारे अष्टकोनी अर्धगोलाकार घुमट व नंतर कंगोऱ्याची घुमटाची कडा असून त्याखालचा चौथरा अष्टकोनी आहे. घुमटांत चार दिशांना झरोके असून घुमटाभोवती चार टोकांना लहान छत्रीवजा आकार आहेत. प्राकाराच्या दगडी भिंती व कमानींमध्ये हिंदू व मुसलमानी वास्तुकलेचा संगम दिसून येतो. वास्तुशैलीवर येथील जांभा दगड, लाकूडकाम, व जोरदार पाऊस यांचा परिणाम झालेला दिसतो.

घुमटांचा अंतर्भाग व आतील लाकडी कोरीवकाम खास कलेचा नमुना आहे. तिसऱ्या घुमटाला वेगला इतिहास आहे. धर्मच्छल करणाऱ्या जंजिऱ्याच्या सिद्दीच्या मुलीने हा घुमट बांधला. तिचा नवरा गलबतासह समुद्रावर बेपत्ता असता, श्री ब्रम्हेंद्रस्वामी या छत्रपती शाहू व पेशवे यांच्या गुरूंच्या सांगण्यावरून तिने नवस केला. पती परत आल्यावर विश्वास बसून तिने घुमट बांधला व दररोज चौघडा वाजविण्यासाठी नेमणूक करून दिली. ती आजही चालू आहे.

गाभाऱ्यांत काम, परशुराम व काल यांच्या मूर्ती आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे ते अवतार होत. काळ ही मृत्युदेवता आहे. परशुरामांनी मृत्यूला जिंकले व वासनारहित होऊन कामासही जिंकले म्हणून ही प्रतीके येथे स्थापिली आहेत.

उत्सव व प्रघात


मुख्य अक्षय तृतीयेचा (परशुराम जयंतीचा) असतो. या सर्व सोहळ्यास येणारी माणसे, केले जाणारे उपचार, वागणे यामुळे खास कोकणातील वातावरण निर्मिती होते. हा उत्सव वैशाख शुद्ध प्रतिपदा, द्वितीया व तृतीया असा तीन दिवस असतो. जन्मकाळ तृतीयेचे सायंकाळी दिवस मावळल्यावर होतो. पारंपारिक पद्धतीचे रंगीत कागद, बेगड, बांबू कापड, पुठ्ठे वगैरे वापरून गणपतीच्या देवळासमोर सुंदर मखर व मांडव केला जातो. मंडपाला छत लावतात. या मंडपात कीर्तने गाण्याचे कार्यक्रम, जन्मकाळ, लळीत, भजने असे कार्यक्रम होतात. गावातील प्रत्येक माणसाला प्रसादाचा नारळ वाटण्यात येतो.

देवळाच्या प्राकाराबाहेर देवाची बाग आहे. त्यांत एक तोफ आहे व रोज दोनदा आवाज काढण्याची पद्धत होती. याला परशुरामाचे भांडे वाजले असे म्हणतात. देवाची त्रिकाळ पूजा होते. प्राकारात रेणुका, गणपती, बाणगंगा तलाव, गंगेचे देऊळ या सर्व वास्तूंच्या परिसरात जांभ्या दगडाच्या लाद्यांनी व त्यांच्या वास्तुस्थापत्यामुळे सतराव्या शतकातील वास्तुस्थापत्याची प्रचीती येते. रेणुका मंदिरात व इतरत्र असलेले कोरीवकाम, लाकूडकाम यावर प्रादेशिक कुणबी कलेची छाप दिसते. लाल कौलारू छपरे, हिरवी गर्द झाडी, लाल माती, लाल जांभळट जांभ्या दगडाच्या भिंती व जमिनी यामुळे संपूर्ण परशुराम क्षेत्रासच निसर्गसंतुलनाचा व सौंदर्याचा वरदहस्त लाभला आहे याची प्रचीती येते.

मार्गशीर्ष वद्य एकादशीला येथे मोठी यात्रा भरते. या दिवशी पंढरपूरचा विठोबा येथे असतो असा दृष्टांत सुमारे शंभर वर्षापूर्वी एका पंढरीच्या वारकऱ्यास झाला. या यात्रेला अनेक यात्रेकरू येतात व सात दिवस नामसप्ताह करतात. येथे महाशिवरात्रीचाही उत्सव होतो. भाविक हिंदू मने देवापासून दूर असल्यास आपला देव कोठेही कल्पून त्याची पूजा करतात. विठ्ठलाकडे नाही पोहोचता आले तर कोकणातच विठ्ठल येतो व त्याची पूजा होते. हे हिंदू मनोवृतीचे वैशिष्ट्य आहे.

हे देवस्थान जागृत असल्यामुळे पुष्कळ भाविक लोक येथे दर्शनास येऊन नवस करतात व परत येऊन नवस फेडतात.

[next]

पंढरपूर


अंनत तीर्थाचे माहेर
अंनत रुपांचे सार
अनंता विठ्ठलाची पंढरी म्हणजे महाराष्ट्राची धार्मिक राजधानी आहे. हजारोंच्या संख्येने येणाऱ्या पालख्या, वारकरी व दिंड्या आषाढी व कार्तिकी एकादशीला नित्यनियामाने पंढरपूर व सोलापूर तालुक्यातील चंद्रभागेच्या काठच्या गावी येतात. विठ्ठलाचे पादस्पर्शदर्शन केल्याशिवाय या वारकऱ्यांना चैन पडत नाही.

देऊळवाडा


पंढरपूरचे देवालय व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराचे संवर्धन झालेले आहे. शालिवाहन प्रतिष्ठान राजाने पंढरपुराचे इ. स. ८३ मध्ये संवर्धन केले. ताम्रपत्रावरून इ. स. ५१६ मध्ये राष्ट्रकूटांच्या काळात पंढरपूर हे चांगली लोकवस्ती असलेले ग्राम असल्याचा पुरावा मिळतो. इ. स. १२३९ च्या लेखावरून देवगिरीच्या यादवांनी या स्थळास भेटा दिल्याचा दावा आहे. पादुका-प्रदक्षिणेची वहिवाट इ.स. १२९६ मध्ये चालू झाली; तर इ. स. १६५० मध्ये हैबतबाबांनी आळंदीहून पंढरीच्या पालखीची प्रथा पाडली.

देऊळ व मूर्ती यांवर अनेकदा मुसलमानी आक्रमणे झाली व प्रत्येक वेळी मंदिर परत बांधण्यात आले. काहींच्या मत हे स्थान मूलतः शिवाचे होते तर वैष्णव पंथीय हे विष्णूचे स्थान मानतात. जैन धर्मीय यास नेमीनाथ समजतात तर बौद्धांच्या मते हा अवलोकितेइश्वर आहे. सूर्याचा अंशही या दैवतास मानतात.

चंद्रभागेच्या वाळवंटापलिकडून नदीच्या पात्रातून उंच शिखरे, सपाटा कौलारू छपरे, धर्मशाळा, झाडे व त्या सर्वावर उठून दिसणारी विठ्ठल, रखुमाई व पुंडलिक मंदिरांची उंच शिखरे व कलश हा सर्व देखावा फारच मनोहारी वाटतो. दगडी तटबंदीमागे हे देवालय एका टेकडावर आहे. सुमारे ५२ मीटर रूंद व १०६ मीटर लांब अशी ही जागा असून सभोवार अरूंद फरसबंद रस्ते आहेत. पूर्वेकडे तीन, उत्तरेकडे तीन व दक्षिण व पश्चिमेकडे प्रत्येकी एक द्वार आहे. महाद्वार पूर्वेकडे असून, ज्या अकरा पायऱ्या चढून गेल्यावर ते लागते त्यांना ‘नामदेव पायरी’ म्हणतात. कोपऱ्यात देवळीमध्ये गणपती असून वरती नगारखाना आहे. महाद्वारावर चुनेगच्ची सिंह, कमानी, वेकपत्ती वगैरे नक्षीकाम आहे.

मंडप १८ मीटर रूंद व ३७ मीटर लांब असून बाजूस ओवऱ्या व सुंदर लाकडी कोरीवकाम दिसून येते. सुमारे १० मीटर उंचीच्या दोन दीपमाळा व जवळच विष्णुवाहन गरुड व हनुमान यांची मंदिरे आहेत. पुढील सोळा-खांबीत एका लहान सभामंडपातून जाता येत. येथील दाराचे बाजूस सुरेख जय-विजय व तीन पायऱ्या असून त्यापैकी एक पितळी पत्र्याने मढवली आहे. डाव्या बाजूस खजिन्याची खोले आहे. सोळा-खांबीचे दगडी खांब कोरीव असून भाविकांच्या आशयाचा गरुडस्तंभ चांदीच्या पत्र्याने मढविला आहे. सभामंडपाच्या उत्तरेकडे एक ओवरी असून त्यात काशीविश्वनाथ, राम-लक्ष्मण, काळभैरव, रामेश्वर, दत्तात्रेय आणि नरसोबा यांच्या देवळ्या आहेत. चांदीचे नक्षीदार पत्रे चौखांबीच्या दरवाजास लावले आहेत. पूर्वेकडे शेजघर असून एका लहान अंतराळानंतर दोन मीटर चौरस गाभारा लागतो. रूक्मिणी मंदिरासारखी इतर लहान मंदिरे परिसरात आहेत. विठ्ठलाच परमभक्त पुंडलिक याची समाधी महाद्वार घाटावर आहे. त्रैलोक्यनाम भवन, तनपुरे मंडप वगैरे इतर महत्त्वाच्या वास्तू पंढरपुरात आहेत.

देवळास समांतर पूर्वेकडे जाणाऱ्या गल्ल्या घाटाकडे जातात. सर्व बाराही घाटांचा वापर वारकरी करतात. त्यातील उद्धव, चंद्रभागा, दत्ता व अमळनेरकर घाटांचा वापर प्रामुख्याने होतो. महाद्वार घाट हा उत्सवासाठी महत्त्वाचा आहे. नदीला पाणी कमी असताना नदीच्या पात्राजवळची जागा वारकरी उतरण्यास तसेच भजनकीर्तनास वापरतात. मठ, देवळे, आखाडे, धर्मशाळा, फड वगैरेमधून अनेक भक्त व वारकऱ्यांची सोय होते व सर्व पंढरपुरात भाविकांची वर्दळ असते.

वारकऱ्यांच्या दिंड्या


वारकऱ्यांची टाळमृदंगाच्या गजरात., विठ्ठलाच्या नामघोषात पंढरीच्या वाटेवर चाललेली दिंडी हे अखिल महाराष्ट्राचे भूषण आहे. त्यावेळी या भजनात, नामघोषात वरकरणी निमग्न दिसणाऱ्या वारकऱ्यांच्या चित्ताची खरी एकतानता विठ्ठलापाशीच असते. वारीचा देखावा अवर्णनीय असतो. झेंडे, तुताऱ्या. सजवलेला स्वारीचा घोडा, अब्दागीर, पालख्या, घोडे, बैलगाड्या यांचे ताफे व डोक्यावर तुळशीवृंदावन किंवा सामानाची गाठोडी घेतलेल्या मराठमोळ्या स्त्रिया या सर्वांची गर्दी पंढरपूरच्या वाटेवरील निरनिराळ्या गावात ज्यावेळी पोहोचते त्यावेळी गावकरी वारकऱ्याचे अनेक प्रकारे स्वागत करण्यास सिद्ध असतात.

चैत्री वारीच्या वेळी पंढरपुरात म्हशी-गाईंचा मोठा बाजार भरतो. यात्रेच्या वेळी उदबत्ती, हळद, कुंकू, खेळणी, फुले, माळा, बांगड्या, देवाच्या मूर्ती, तांब्या-पितळेची भांडी वगैरे अनेक वस्तूंची दुकाने सर्व ठिकाणी मांडली जातात व मोठा व्यापार होतो.

इ. स. १८१० मध्ये सांगलीच्या पटवर्धनांच्या प्रोत्साहनाने रथयात्रा व राजपूजा होऊ लागली. आषाढी व कार्तिकी एकादशीला दुपारी खाजगीवाले वाड्याजवळ ग्रामप्रदक्षिणेला सुरवात होते. समोर हत्ती व घोडे असलेला हा रथ भाविक ओढतात. आंत विठ्ठल, राही व रुक्मिणीच्या मूर्ती असतात.

पंढरपूर गावाचे मूळचे मराठमोळे वास्तूशिल्प तेथील अनेक देऊळे, मठ, फड व घरे यांतून दृग्गोचर होत होते. दुर्दैवाने नव्या व अविचाराने वेगळ्याच शैलीत बांधल्या जाणाऱ्या वास्तूंमुळे अशा सुंदर शहराचे मूळचे वास्तुवैभव नष्ट होत आहे. आज देऊळ नीट पहाण्यासाठी सभोवार मोकळी जागाच उरली नाही. पण या सर्वातूनही पंढरपूरचा अनुभव हा अविस्मरणीय व वेगळ्या भावक्षेत्रातील ठरतो.

[next]

श्री चांगदेव मंदिर


दक्षिण-उत्तरेला जोडणारा खानदेश हा दुवा असल्यामुळे मुसलमानी हल्ल्यांचा व आक्रमणाचा सर्व जोर या भागावर पडला. त्यामुळे तेराव्या शतकानंतर या भागात महत्त्वाच्या नवीन धार्मिक वास्तू निर्माण झाल्या नाहीत. खानदेशच्या वास्तुशैलेचे व मांडणीचे चांगदेवाचे मंदिर हे उत्तम उदाहरण आहे. गुरुकुल पद्धतीचा या भागात प्रसार होता व त्याप्रमाणेच मुख्य मंडप व बाजूला ओवऱ्यांची मांडणी, तसेच समाधीसाठी खास योजना चांगदेव परिसरात दिसून येते. बौद्धधर्मीयांच्या गुंफा व वास्तुस्थापत्य यांचा परिणाम येथील वास्तुकलेवर आहे. मंदिराची घडण उत्तर व पूर्व भारतीय वास्तूकारांच्या मार्गदर्शनाखाली झाल्यामुळे वास्तूवर प्रादेशिक कलेप्रमाणे त्या त्या भागातील कलेचाही ठसा दिसतो. उथळ शिल्पे, आडवे पाषाणपट्ट, वेलपत्ती, तोरणे, शंकरपाळ्यासारख्या आकृती व सुंदर मूर्ती यांचा अंर्तबाह्य वापर केला आहे.

मंदिर दगडी असल्यामुळे कोरीव काम स्पष्ट व टिकून राहिले आहे, चांगदेवाचे मंदिर जळगांव जिल्ह्यातील चांगदेव गावी आहे. चांगदेव गांव (भुसावळ-इटारसी रेल्वेमार्गावर) सावदा रेल्वे स्टेशनापासून सुमारे आठ किलोमीटर दूर तापी व पूर्णा नद्यांच्या संगमावर वसले आहे.

हिंदू धर्माप्रमाणे योग, मंत्र, तंत्र यांच्या साह्याने साधकाची मानसिक उन्नती होऊन क्रमाक्रमाने तो मोक्षाप्रत पोहोचतो. या क्रिया अत्यंत शांत व पवित्र वातावरणात होणे आवश्यक आहे, त्यासाठी मठांची योजना करण्यांत येते. अकराव्या व बाराव्या शतकांत मठांचा या भागात मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. महामंडलनाथ सेऊना किंवा सेनू दुसरा या देवगिरीच्या यादव सम्राटाचा मांडलिक गोविंदराजा याने हे मंदिर अकराव्या शतकात बांधले असावे. वाघुलीचे सूर्यमंदिर व संगमश्वराचे महादेवाचे मंदिर ही चाळिसगाव जिल्ह्यातील देवळे या राजाच्या कारकीर्दीत झाली.

चांगदेव हे नांव योगी चांगदेवाशी संबंधित नाही. चांगदेव हा निकुंभ राजा गोवन याचा सरदार होता व त्यासंबंधीचा आलेख चाळीसगावहून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर पाटण गावच्या महेश्वर मंदिरावर आहे, या चांगदेवाच्या कारकीर्दीत हे देऊळ बांधले गेले असावे असा समज आहे. चांगदेव हे नांव प्रसिद्ध ज्योतिषी व खगोलशास्त्र भास्कराचार्य यांच्या नातवाचेही होते. यादव राजा सिंधन याने मोठ्या जमिनी इ. स. १३०६ मध्ये चांगदेवास इनाम दिल्या. शिल्परत्नाकर वगैरे वास्तुशिल्पावरील ग्रंथ येथे शिकविण्यात येत व त्यामुळे येथे एका जोमदार नव्या वास्तुप्रकारच्या उगम झाला.

अर्धस्तंभ, मूर्ती, अंतराळाचे सुंदर कोरीव छत, वेलपत्ती व आडवे शिल्पपट्ट, बाहेरील सज्जाजवळ लाकडी वास्तुकलेप्रमाणे वापरलेल्या दगडी लोलकाकृती नक्षी अशी अनेक वास्तुवैशिष्ट्ये या भागात दिसून येतात.

देवळाची वास्तू


चांगदेवाचे मंदिर दगडात बांधलेले आहे. दगडांचा वापर चुन्याशिवाय करण्यात आला आहे. दगड घोटून व घडवून एकावर एक बसवून मंदिराच्या भिंती उभारल्यामुळे वास्तू फार मजबूत आहे. देऊळ ३२ मीटर लांब व सुमारे ४० मीटर रुंद आहे. सभामंडप सुमारे १४ मीटर उंच असून प्रत्येक कोपऱ्यात चार पूर्ण स्तंभ व चार अर्ध स्तंभ आहेत. या सोळा पूर्ण स्तंभ व सोळा अर्ध स्तंभावर मजबूत छत असून त्यावर दगडी कलशाची योजना असावी. परंतु परचक्रामुळे किंवा राजकीय परिस्थितीमुळे काम अर्धवट सोडावे लागून नंतर वरचा शिखराचा भाग विटांचा बांधला असावा, अंतराळावर अंडाकृती, नक्षीदार उतरते छत आहे डॉ. हेन्‍री कुझिन्सच्या मते वरचा भाग विटांचा बनविण्याचीच योजना असावी.

शंकरपाळ्याच्या आकाराची नक्षी, उथळ शिल्प आडवे पट्टे. उभी शिल्पे सामाऊन घेणारी वेलपत्ती वगैरे खुब्यांचा वापर दर्शनी भागावर करण्यात आला आहे. खांबाचे आकार व कोरीव काम लक्षणीय आहे.

चांगदेवाचा उत्सव


प्रत्येक खानदेशकर एकदा तरी बैलगाडीत बसून चांगदेवाच्या यात्रेला गेलेला असतो. गाड्या सोडून नदीच्या वाळवंटातच अनेक लोक मेळ्यासाठी जमतात. यात्रेच्या काळात शिवरात्री निमित्त शंकराची आराधना केल्यावर डाळबट्टीच्या नैवेद्यानेच उपासाची सांगता होते. भरड्या डाळीच्या व गव्हाच्या पिठापासून केलेल्या व उघड्या विस्तवावर भाजलेल्या व शिजवलेल्या या प्रकाराला वेगळीच असते. यात्रेत अनेक प्रकारची दुकाने- विशेषतः पितळी भांड्याची दुकाने- रामायण व महाभारत गाऊन दाखविणारी नाटकपथके, ही वैशिष्ट्ये असतात. माघातील तिसऱ्या दिवसापासून अमावास्येपर्यंत हा उत्सावाचा काळ असतो. चंद्र व सूर्यग्रहणाच्या काळांत नद्यांचा संगम असल्यामुळे येथे जत्रा भरते. खानदेशातील खास देवस्थानात चांगदेवाचे स्थान आहे.

[next]

रामटेक


रामटेक हे नागपूरच्या ईशान्येस सुमारे ५४ किलोमीटर अंतरावर आहे. या नावाचा अर्थ "रामाचा डोंगर" असाच होतो. सिंदूरगिरी किंवा शेंदराचा डोंगर व तपोगिरी किंवा तपस्या करण्याचा डोंगर नामाभिधान या डोंगरास पूर्वी असावे. तशा प्रकारच्या शिलालेख चौदाव्या शतकांतील लक्ष्मण मंदिराजवळ आहे.

शहराच्या जवळ सुमारे १०० मीटर उंच टेकाडावर हा अनेक मंदिराचा समुच्चय आहे. टेकाडाची दक्षिण व पश्चिम बाजू नैसर्गिक रीत्याच संरक्षित आहे. उत्तरेकडे दुहेरी भिंत बांधून तटबंदी केली आहे. बाहेरील भिंत आधीच्या गवळी राजांनी बांधली असावी; तर इतर काम नंतरचे आहे. देऊळ पश्चिमेकडच्या सर्वात उंच भागात असून अंबाला तलावाच्या पश्चिम टोकाकडून टेकडीवर चढण्यास पायऱ्या आहेत. वर पोहोचल्यावर दगडी भिंत असलेले एक जुने तळे आहे. जवळच नरसिंहाची मोठी मूर्ती असलेले देऊळही आहे.

आख्यायिका


आख्यायिकेप्रमाणे हिरण्यकशिपूरचा नाश केल्यावर नरसिंहाने येथे आपली गदा फेकली व त्यायोगे देवळाजवळ हे तळे निर्माण झाले. पूर्वी एका शूद्राने तपस्या करून मोठे जपजाप्य केले . वरच्या वर्गाच्या या धर्माचरणाच्या शम्बुकाने केलेल्या गैर वापरामुळे अनर्थ ओढवला. त्यामुळे रामाने शम्बुकाला ठार मारले. अशा प्रकारे प्रत्यक्ष श्रीरामाच्या हातून मरण प्राप्त झाल्यामुळे त्यास अत्यानंद झाला व त्याने रामाकडून रामटेकला कायमचे वास्तव्य करण्याचा वर मागून घेतला. त्यास रामाने अनुमती दिली व शम्बुकाचीही येथे पूजा होईल असे सांगितले. त्याप्रमाणे धुमेश्वर महादेवाचे मंदिर शूद्राची आठवण म्हणून बांधण्यात आले व त्याची पूजा रामाबरोबरीने होते.

देऊळवाडा


नागपूरचा रघूजी पहिला याच्या हातून देवळाच्या बाहेरच्या मजबूत तटबंदीचे काम झाले. मुख्य वराह दरवाजा संबोधला जातो. कारण लगेच आत वराह या विष्णूच्या अवताराची मोठी मूर्ती आहे. त्यापलीकडे आणखी तीन दरवाजे आहेत. सिंधपूर दरवाजा या रेषेतील दुसरा दरवाजा असून त्यातून आतल्या तटबंदीत प्रवेश मिळतो तर भैरव दरवाजातून आतल्या शेवटच्या तटबंदीत प्रवेश मिळतो.

आत राजा दशरथ व वसिष्ठ मुनी यांची देवळे आहेत. लक्ष्मणाचे मंदिर समोरच आहे व त्यामागे राम व सीतेचे मोठे देऊळ उभे दिसते. मुख्य वास्तूच्या सभोवार इतर अनेक देवतांची मंदिरे आहेत. नागपूरची खास वास्तुशैली रामटेकलाही दिसून येते. उत्तर व पूर्वेकडील भिंती, शिखरे, उपशिखरे, कलश व खांबाच्या बांधणीचे बारकावे य वास्तूत द्रुग्गोचर होतात. छोट्या छत्र्या, उलट्या कमलकळीची नक्षी, जाळीदार खिडक्या, सज्जे व उथळ देवळ्या यामुळे देवळावर उजेड व सावल्यांचा नयनमनोहर खेळ दिसतो. शिखरे भूमिज प्रकारची आहेत.

मध्यमयुगीन ब्राह्मणी प्रकारचे वास्तुशिल्प येथे दिसते. गोकुळ दरवाजा व लक्ष्मण मंदिरावरील कोरीवकाम खास उल्लेखनीय आहे.

यात्रा व जत्रा


रामटेकला दोन यात्रा भरतात. त्रिपुरी पौर्णिमेला एक व दुसरी रामनवमीच्या वेळेला असते. पिवळा पीतांबर रामाच्या देवळावर जाळण्याची पद्धत त्रिपुरासुराच्या शिवाने केलेल्या संहाराची निदर्शक आहे. या जत्रेत भांडी, खाद्यपदार्थ, शोभेच्या वस्तू विक्रीस असतात.

एकूण मराठी देवळांची बांधणी व वास्तुकला यांवर येथील हवापाणी, डोंगरदऱ्या व धार्मिक वापर यांचा परिणाम दिसून येतो. विशेषतः वारकरी सांप्रदायाचा मोठा पगडाच या वास्तूकलेवर आहे. भक्तिमार्गामुळे अनेक जत्रा व यात्रांच्या प्रथा आजतागायत उभ्या महाराष्ट्रात चालू आहेत.

- गो. कृ. कान्हेरे


संपादक मंडळ | Editors
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.