जत्रा - मराठी कविता

जत्रा, मराठी कविता - [Jatra, Marathi Kavita] तर ही जत्रा, आणि जत्रेतील संथ गर्दी.

तर ही जत्रा, आणि जत्रेतील संथ गर्दी

तर ही जत्रा
आणि जत्रेतील संथ गर्दी
आस्तिकतेच्या एका सरळ पाईपातून मी वाहत जातो
देवळाच्या पायरीपर्यंत
कळसापेक्षा उंच उडत असतात नास्तिकतेचे फुगे
राहुटीच्या खाली प्रत्येकाने आपला डाव सजविलेला असतो
जत्रेत आपल्या डोक्यावर रडणारं मूल नसतं
ही खंत लाहीलाही करत असते
तकतकीत उन्हासारखी
चिल्लरवरून फिरत राहतो पुरून घेतलेला साधूचा हात
त्रस्त रोग्यासमोरील मळकट चांदरीतून
मायेचा धूर निघत असतो
तमाशातला चार आण्यात
माझ्या आयुष्याचा मूकपट
जत्रेतल्या तमाम पब्लिकला
सरसकट दाखवतो
गारुडी नपुंसक करण्यासाठी गर्दीतून
माझी निवड करतो
मागच्याने पाय दिलेली तुटकी चप्पल मी
घोळक्यात चतुराईने बदलतो
तर, जत्रेतल्या असलेल्या नसलेल्या ईश्वरा
तुझ्या नावाचं रोपटं मी उपटून टाकतो
मला माहित आहे
तमाशात वाजलेल्या शिट्टीने तुझ्या पावलांचे
ताल चुकत नसतात
मी तुझ्या चिमुकल्या विश्वातून हरवलोय केव्हाचा
म्हणून पुन्हा पुन्हा जत्रेत हरवण्याची भीतीच नसते मला
टेकव माझी पाठ आखाड्यातील
तांबड्या मातीला आणि उघल गर्दीचा अबीर बुक्का
तुझ्याच पायावर


संदेश ढगे | Sandesh Dhage
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.