गावाची वाट घनदाट - मराठी कविता

गावाची वाट घनदाट, मराठी कविता - [Gavachi Vaat Ghandaat, Marathi Kavita] गावाची वाट घनदाट, गात मी चाललो, ऐटीत हात घुमवीत, रात मी चाललो.
गावाची वाट घनदाट - मराठी कविता | Gavachi Vaat Ghandaat - Marathi Kavita
गावाची वाट घनदाट, गात मी चाललो
ऐटीत हात घुमवीत, रात मी चाललो

त्या शितल चांदण्यांचा सांडलेला सडा
ओढ्याकाठी सळसळताहे वेळू खडा
मनात खळखळ अंतरी नादावलो
गावाची वाट घनदाट, गात मी चाललो

चंद्रकलेचे नभी देखणे रुप नवे
झाडांत मिणमिणते काजव्यांचे थवे
तेजशी उधळण पाहुनी सुखावलो
गावाची वाट घनदाट, गात मी चाललो

झुडपात वाजते रातकिड्यांची धून
भन्नाट वारे फिरले गारवा पिऊन
अंगाची थरथर श्वासात गंधाळलो
गावाची वाट घनदाट, गात मी चाललो

घुटमळली गावाच्या वेशीत पावले
प्रेमात पडावे असेच काही चालले
छेडूनी सरगम गाण्यात वेडावलो
गावाची वाट घनदाट, गात मी चाललो

गावाची वाट घनदाट, गात मी चाललो
ऐटीत हात घुमवीत, रात मी चाललो


उमेश कुंभार | Umesh Kumbhar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता आणि मराठी गझल या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.