हे चारच फोन नंबर माझ्या डायरीत आहेत, तेवढ्यांचीच नोंद घे
हे चारच फोन नंबर माझ्या डायरीत आहेततेवढ्यांचीच नोंद घे
म्हणजे बाकी तसे माझे मित्रच आहेत पण
मी इथे बहुधा सापडू शकतो
अमुक अमुक वारी
तमुक कविता कशी असावी? ह्यावर
आमची चर्चा असते आणि पहाटे पर्यंत
हाती शब्द लागत नाहीच
एखाद्या अपरिहार्य संकटाच्या वेळीच इथे फोन कर
नाहीतर चर्चा अर्धवट सोडली म्हणून काळजाशी
बेईमानी केल्यासारखं होईल
दुसरा नंबर आहे प्रेयसीच्या हॉस्पिटलचा
तिचे सर्व प्रियकर माझ्याच चेहऱ्याचे आहेत
आणि ओळीने अॅडमिट होतात
मीच पुन्हा पुन्हा अॅडमिट झाल्यासारखे
हे तुला मी पहिल्या रात्री प्रेमपूर्वक सांगितलंय
एका प्रकाशकाचाही नंबर लिहून ठेव
पण त्याचे इतके महत्त्वाचे नाही
मी तिथे किचिंत रमतो, चांगले हे की
तेथून मी नंतर कुठे जातो हे मात्र तो
कुणालाच सांगत नाही
आणि हा नंबर
या पैकी मी कुठेच नसली तर
माझ्या संथ ठप्प ऑफिसचा
मालक खरोखरच रसिक आहे
म्हणून तर कवितेसाठी त्यांनी
मला असे वाऱ्यावर सोडले आहे