दलदल

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १२ सप्टेंबर २०१५

दलदल - मराठी कथा | Daldal - Marathi Katha

लग्नाच्या आमिषाने फसवणुक करुन कोठ्यावर विकल्या गेलेल्या एक तरुणीच्या स्वप्नांची राख रांगोळी झाल्यावर आपल्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली जाण्यापेक्षा त्या तरुणीने मृत्युला जवळ करणे पसंत केले. आपल्या सारख्या इतर दुर्दैवी मुलींना वासनेच्या व्यापारी गिधाडांपासुन वाचवण्यासाठी तिच्या मृत्युनंतर सुरु झालेल्या रक्तरंजित लढ्याची रोमांचक कहाणी म्हणजे दलदल.

स्थळ: हॉटेल मुन लाईट
वार: शनिवार
वेळ: रात्री १२:४०

“तुझे नाव काय आहे? काल रात्री हॉटेल मुन लाईट हॉटेलमध्ये तु काय करत होतीस? पवन आणि फिरोजचा खुन कसा झाला?” “तुझा त्यांच्याशी काय संबंध? तु त्या दोघांना मारलेस की दुसऱ्या कोणी? तुमच्या तिघांशिवाय रूम मध्ये इतर कोण कोण होते? ते मेल्यावर तु रूममध्येच का थांबलीस? पळून का नाही गेलीस?”

“सर, आम्हाला एकुण दोन मेल डेड बॉडीज मिळाल्या. त्यापैकी एक बेडवर पडली होती तर दुसरी बाथरूमच्या दरवाज्यात. पहिल्या डेड बॉडीवर कसल्याच खुणा आढळल्या नाहीत. बाहेर आलेले डोळे आणि लटकणारी जीभ मात्र व्हिक्टीमला फाशी दिले असावे असेच सुचित करते. पण आम्हाला ना दोर सापडला, ना एखादा स्टुल, ना गळ्यावर बोटांचे ठसे आढळले. मान मात्र आवळल्यासारखी स्पष्ट दिसते. पंखा लटकवलेल्या हुकावर दोरीचे धागे वगैरे काही सापडतात का म्हणुन चेक केले पण काहीच सुगावा लागला नाही. आम्हाला रुममध्ये हातांचे काही ठसे मिळाले, ते दोन्ही व्हिक्टिम्सच्या हातांच्या ठश्यांशी मॅच होत आहेत. दुसऱ्या डेड बॉडीची अवस्था फारच वाईट होती. शरीरातील बहुतेक हाडे मोडली होती. जणु कोणी प्रचंड ताकदीने त्याला उचलुन उचलुन आपटला होता. डोक्याचा पुरा चेंदा मेंदा झालेला होता. बाथरूममध्ये सगळीकडे रक्तच रक्त पसरले होते. माझ्या इतक्या वर्षाच्या करीयरमध्ये मी पहिल्यांदाच इतकी निर्घृण हत्या पाहिली. आम्हाला रूममधील एका कोपऱ्यात, अर्धवट शुद्धीतील एक मुलगी सापडली. आम्ही घटनेबद्दल प्रश्न विचारले पण ती प्रचंड शॉकमध्ये असल्याने तिने काहीच उत्तर दिले नाही. ती बोलण्याच्या अवस्थेत नसल्यामुळे आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये भरती केलय. बेडवरील बॉडीची ओळख पटली आहे. खिशातील कागदपत्रांवरून कळले की ती बॉडी एका बिल्डरची आहे आणि त्याचे नाव पवन कुमार आहे. बाथरूम मधील बॉडी एका एजंटची आहे ज्याचे नाव फिरोज आहे. तो कस्टमर्सना मुली पुरवतो. आम्ही बरेच दिवस त्याला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करत होतो. एकंदर प्रकारावरुन ती मुलगी एक कॉलगर्ल असावी, पण चेहऱ्यावरून चांगल्या घरातील वाटते. कदाचित ह्युमन ट्रॅफिकिंग मध्ये फसली असेल. तिचा एजंट फिरोज, तिला पवन कुमारला डिलिव्हर करण्यासाठी आला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. खुनाबद्दल कोणालाच काहीच माहिती नाही. पंचनामा झाल्यावर दोन्ही बॉडीज आम्ही पोस्ट मॉर्टेमसाठी पाठवल्या आहेत. हॉटेलच्या स्टाफबरोबर आमची चौकशी सुरु आहेच. खुन कसे घडले हे ती मुलगी स्टेबल झाल्यावरच कळु शकेल कारण ती एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. मी तुम्हाला अपडेट्स देत राहीनच”. हॉटेल मुन लाईट मधुन बाहेर पडणारे इन्स्पेक्टर माने आपल्या वरिष्ठाना रिपोर्ट करत होते.

डॉक्टरांनी झोपेचे इंजेक्शन दिल्यामुळे निशा रात्रभर गाढ झोपेत होती. सकाळी इंजेक्शनचा परिणाम ओसरु लागल्यावर निशा हळुहळु शुद्धीवर येऊ लागली, तसा तिच्या डोळ्यासमोर आदल्या रात्री घडलेला प्रसंग जसाच्या तसा ऊभा राहीला. सगळे आठवुन ती आणखीनच भयभीत झाली. नर्सने तिला शांत होण्याच्या गोळ्या दिल्यावर ती थोडी नॉर्मल झाली. आपण हॉस्पिटल मध्ये असल्याचे जाणवताच तिला थोडे हायसे वाटले पण अजुनही तिचे सर्वांग थरथरतच होते. डॉक्टरांनी परवानगी दिल्यावर निशाचा कबुली जबाब नोंदवण्यासाठी इन्स्पेक्टर माने दोन लेडी कॉन्स्टेबल्स सोबत सकाळी दहा वाजता निशाच्या रूममध्ये आले. त्यांनी निशाला पोलिसी स्टाईलमध्ये प्रश्न विचारायला सुरवात केली, “तुझे नाव काय आहे? काल रात्री हॉटेल मुन लाईट हॉटेलमध्ये तु काय करत होतीस? पवन आणि फिरोजचा खुन कसा झाला?” “तुझा त्यांच्याशी काय संबंध? तु त्या दोघांना मारलेस की दुसऱ्या कोणी? तुमच्या तिघांशिवाय रूम मध्ये इतर कोण कोण होते? ते मेल्यावर तु रूममध्येच का थांबलीस? पळून का नाही गेलीस?” प्रश्नांच्या भडिमाराने निशा पुरती भांबावुन गेली. काय उत्तर द्यावे ते न कळल्यामुळे बिचारी रडु लागली. डॉक्टरांनी समज दिल्यावर इन्स्पेक्टर मानेना आपली चुक उमजली. त्यांनी निशाला विश्वासात घेतले. निशाची कहाणी ऐकुन बेडर असलेले इन्स्पेक्टर मानेही क्षणभर हादरले.