Download MarathiMati.com's New Android App from Google Play

ध्यास

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २७ नोव्हेंबर २०१४

ध्यास - मराठी कविता | Dhyas - Marathi Kavita

जरी मी संपलो इथे
प्रवास संपणार नाही
चार लाकडांसोबत
माझा ध्यास जळणार नाही
राख निजेल मातीच्या कुशीत
स्वप्ने निजणार नाही
राहतील रेंगाळत येथेच
पण सावली दिसणार नाही

अगणित आकांशा
क्षणात संपत नसतात
पेटतात मंद चांदण्यांसारख्या
पेटतात तेजस्वी ताऱ्यांसारख्या
मावळतील दिवे
अंधार पसरेल चहुबाजू
सायंकाळ येईल
काळे वस्त्रे परिधान करून
त्याच क्षणी
सूर्य उगवलेला असेलच कोठेतरी
त्याची आग विझणार नाही

विझलेली मशाल
पुन्हा पेटवतील
असंतोषाचे हात
होईल सुरु
एक नवा प्रवास
तीच वाट धरून
पोहोचेल तो
परिवर्तनाच्या क्षितिजावर
तोपर्यंत त्याची पापणी
तुफानातही लवणार नाही

Download MarathiMati.com's New Android App from Google Play