सुडचक्रभेद

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३० ऑगस्ट २०१५

सुडचक्रभेद - मराठी कथा | Sudchakrabhed - Marathi Katha

सुड’ आणि ‘प्रतिशोध’ला मिळालेल्या अभुतपूर्व प्रतिसादानंतर वाचकांच्या आग्रहास्तव ‘सुड’ या मुळ कथेचा तिसरा भाग सादर करतोय. ज्या वाचकांनी माझ्या सुड आणि प्रतिशोध ह्या कथा अजुन वाचल्या नाहीत त्यांनी आधी त्या वाचुन मगच सुडचक्रभेद ही कथा वाचावी अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे जेणेकरून कथेचे तिन्ही भाग सलग वाचल्यामुळे कथेचा पुरेपुर आनंद लुटता येईल.

दोन मित्रांच्यात जिवंतपणी सुरु झालेले सुडचक्र त्यांच्या मृत्युनंतरही सुरु राहीले. दोन्ही कुटुंब सर्वनाशाच्या सीमेवर पोहोचल्यामुळे त्या सुडचक्राचा भेद करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी लढवलेल्या अजब शक्कलेची रंजक कहाणी म्हणजेच सुडचक्रभेद.

सात्विक आणि गोपाळरावांच्या या सुडचक्रात त्या दोघांचे आणि रुबीचे अशी तीन कुटुंब उध्वस्त झाली. खरच, काय साध्य झाले यातुन? आणि जे काही साध्य झाले त्याचे मुल्य सात्विक, रूबी आणि गोपाळरावांच्या जीवापेक्षा का अधिक होते? एवढे करूनही हे सुडचक्र इथेच थांबले असते तरी ठीक होते पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

एक सुडचक्र पुर्ण झाले होते, खरच?
सात्विकने आपल्या वडिलांच्या मृत्युचा, भगवानदासांकडुन बदला घेण्यासाठी त्यांच्या मुलाचा म्हणजे आपल्याच शालेय मित्र गोपाळचा, त्याच्या मैत्री आणि विश्वास या पैकी कशाचाही मुलाहीजा न बाळगता अमानवीय ताकदींच्या मदतीने खुन करवला. रुबी, जिच्या मदतीने गोपाळरावांचा सर्व पैसा काबीज करुन त्यांना भिकेला लावले; तिलाही त्याने आपल्या मार्गातुन अत्यंत हुशारीने दुर केले. दहा एक वर्ष मनात खदखदत असलेल्या सुडाला खतपाणी घालुन इतके वाढवले की भगवानदासांच्या संपुर्ण कुटुंबाची वाताहात लावली. एवढे करूनही त्याने काय साधले? त्याच्या पापांचा घडा भरल्यावर त्यालाही अत्यंत पिडादायक पद्धतीने मृत्युला सामोरे जावे लागले. गोपाळरावांनी वडीलांच्या सल्ल्याला धुडकावून स्वत:च्या पायावर स्वतःच कुऱ्हाड मारून घेतली. सात्विकच्या नादाला लागून केवळ कमावलेला पैसा, इज्जत, पित्याचा आणि पत्नीचा दोघांचाही विश्वासच नाही तर स्वत:चा जीव पण गमावुन बसले. सात्विकचा सुड उगावल्यावर स्वत: मुक्त झाले पण मागे मात्र आपल्या पत्नी, मुलगा आणि वडीलांच्याही सर्व इच्छा आकांक्षाना तिलांजली देऊन त्यांना दु:खाच्या आगीत होरपळायला सोडुन गेले. सात्विक आणि गोपाळरावांच्या या सुडचक्रात त्या दोघांचे आणि रुबीचे अशी तीन कुटुंब उध्वस्त झाली. खरच, काय साध्य झाले यातुन? आणि जे काही साध्य झाले त्याचे मुल्य सात्विक, रूबी आणि गोपाळरावांच्या जीवापेक्षा का अधिक होते? एवढे करूनही हे सुडचक्र इथेच थांबले असते तरी ठीक होते पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. आपल्या नशिबात पुढे काय वाढुन ठेवले आहे याची पुसटशी कल्पनाही सात्विक आणि गोपाळरावांच्या कुटुंबियांना नव्हती.

सात्विकच्या मृत्युची बातमी भगवानदासांना मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. मुलाचे वर्षश्राद्ध करताना आपल्या मुलाला एक वर्षानंतर का होईना, पण न्याय मिळाला या भावनेने त्यांचे डोळे भरून आले. गोपाळरावांच्या आत्म्याला आता शांती मिळाली असेल या विचाराने त्याचे दु:ख थोडे हलके झाले. श्राद्धाचा कार्यक्रम उरकुन महादेवासह जड अंत:करणाने ते आपल्या घरी परतले. दरवाज्यातून त्यांनी पाऊल आत टाकले तोच त्यांचा लाडका कुत्रा शेरू विचित्रपणे गुरगुरु लागला. भगवानदासांपाठोपाठ महादेव आत आल्यावर तर तो बेफाम झाला आणि मोठ मोठ्याने भुंकु लागला. शेरुच्या या विचित्र वागण्याचे भगवानदासांना मोठे आश्चर्य वाटले. त्याला चुचकारत ते झोपाळ्यावर बसले आणि महादेव हातातील सामान ठेवण्यासाठी घरात गेला. शेरू अजुनही दरवाज्याकडे पाहात गुरगुरत होता. कधी दोन पावले पुढे जाऊन जोरजोरात भुंकायचा तर कधी घाबरुन मागे यायचा. जसे त्याचे भुंकणे वाढले तसे भगवानदास वैतागले, “अरे कशाला भुंकतोस एवढा? कोणी नाही तिथे! चल जा घरात”! असे म्हणत त्याला हाकलण्यासाठी हात वर करत ते झोपाळ्यावरून उठले, इतक्यात थंड वाऱ्याचा एक जोरदार झोत उघड्या दारातून आत शिरला तो एवढा वेगात आला की त्यामुळे तोल जाऊन भगवानदास मागच्या मागे झोपाळ्यावर पडले आणि त्यांच्या डोक्याला झोपाळ्याची लोखंडी कडी लागुन खोक पडली आणि भळाभळा रक्त वाहू लागले. ते पडतात तोच तो वारा शेरुकडे वळला आणि पापणी लवायच्या आत ऑलसेशियन जातीचा आडदांड शेरू एखाद्या चेंडु सारखा सोफ्याखाली फेकला गेला.

भगवानदासांचा वेदनेने भरलेला आवाज ऐकुन राधाबाई आणि महादेव धावतच बाहेर आले. आपल्या सासऱ्यांना रक्ताने भिजलेले पाहुन राधाबाईंना भोवळच आली. त्यांच्या मागुन धावत आलेल्या गंगुने त्यांना वेळीच पकडले म्हणुन बरे नाहीतर त्या जमिनीवरच कोसळायच्या. महादेवाने भगवानदासांना उठवुन बसवले आणि शेवंताला पटकन किचनमधुन हळद आणायला सांगितले. तिने हळद आणताच त्याने चिमुटभर हळद आपल्या मालकांच्या जखमेवर दाबुन धरली. थोडे पाणी प्यायल्यावर भगवानदासांना थोडी हुशारी वाटु लागली. शेरुच्या विव्हळण्याचा आवाज ऐकु आल्यावर त्यांची नजर त्याला शोधु लागली. सोफ्याखाली अंगाचे मुटकुळे करुन विव्हळत असलेल्या शेरुला पाहुन ते लगबगीने उठले व त्याला बाहेर बोलवु लागले. कसाबसा खुरडत लंगडत तो बाहेर आला. त्याचे पुर्ण शरीर थरथरत होते. त्याला प्रेमाने उचलुन घेतल्यावर तो वेदनेने विव्हळला म्हणुन त्यांनी नीट पाहीले तर शेरुच्या पायाला झालेली भली मोठी जखम पाहुन त्यांचा जीव वरखाली झाला. शेरुला ते पोटच्या पोरासारखी माया करत असत आणि शेरुचाही त्यांच्यावर तेवढाच जीव होता. तातडीने ते शेरुला जनावरांच्या डॉक्टरकड़े घेऊन गेले. डॉक्टरांनी शेरुला तपासले. एक्स रे मधे शेरुच्या मागच्या डाव्या पायाचे हाड मोडल्याचे निदर्शनास आले. लगेच त्याच्या पायावर प्लास्टर चढवण्यात आले. तिथुन परतत असताना महादेवाच्या आग्रहाखातर त्यांनी आपल्या फॅमिली डॉक्टर कडुन स्वत:च्या जखमेचेही ड्रेसिंग करुन, खबरदारी म्हणुन टिटॅनसचे इंजेक्शन पण घेतले.