लॉंग ड्राईव्ह

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २१ जून २०१५

लॉंग ड्राईव्ह - मराठी कथा | Long Drive - Marathi Katha

बऱ्याच लोकांना रात्री लॉंग ड्राईव्हवर जायची हौस असते. खुप रोमॅंटिक वाटते म्हणे. अशीच एक पौर्णिमेच्या रात्री केलेली लॉन्ग ड्राइव जय आणि सरिताच्या अशी काही अंगाशी आली की ती रोमॅंटिक न ठरता जीवघेणी कशी ठरली याची ही कहाणी.

रत्नागिरीला कोल्हापुरमार्गे जाताना आंबा नावाचे एक गाव लागते. गाव संपताच चौदा किलोमीटर लांबीचा जबरदस्त वळणांचा एक घाट लागतो. आंबा गावावरून त्याचे नाव आंबाघाट असे पडले असावे. तर अशा या आंबा गावात छोटी - मोठी खुप रिसॉर्ट्स आहेत कारण पावसाळ्यात चिल करण्यासाठी येणाऱ्या अनेक पर्यटकांचे हे लाडके ठिकाण आहे. धो धो कोसळणाऱ्या पावसात मनसोक्त आणि चिंब भिजल्यावर सभोवतालच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटत दोन चार पेग लावुन मस्त गरमा-गरम गावरान चिकन किंवा बोकडाचे मटण, तांदळाची भाकरी आणि सोलकढीवर ताव मारण्याची मजा काही औरच आहे. आंबाघाटातुन हिरव्यागार दरीचे दिसणारे विहंगम दृश्य, शेकडो छोटे - मोठे धबधबे आणि दाट धुके अक्षरशः वेड लावते. घाटात दोन - तीन वॉच पॉइंट्स बनवले आहेत जिथे पर्यटक आपल्या गाड्या थांबवुन सृष्टिसौंदर्याच्या आनंद लुटू शकतात.

जय आणि सरिता दरवर्षीप्रमाणे पावसाळा एन्जॉय करायला एम.टी.डी.सीच्या रिसोर्टमधे उतरले होते. हे रिसॉर्ट मुख्य रस्त्यापासून थोडे आत असल्यामुळे इथे इतर अती हौशी पर्यटकांचा त्रास नव्हता. तिथली शांतता आणि प्रायव्हसी त्यांना खुप आवडायची. त्या दिवशी पाऊस जरा नेहमीपेक्षा जास्तच कोसळत असल्यामुळे ते दिवसभर रिसॉर्टमधे बसुन कंटाळले होते. त्यात चार वाजल्यापासून लाईट गेली होती. एक भले मोठे झाड कोसळल्यामुळे वायर्स तुटल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत लाइट यायची काही लक्षणे दिसत नव्हती. खानसामा सहा वाजताच जेवण बनवुन निघुन गेला होता कारण झाड कोसळल्यामुळे ट्रॅफिक जाम झाले होते आणि त्याला खुप उलटा सुलटा प्रवास करत घरी जावे लागणार होते. नाईट शिफ्टच्या वॉचमॅनने आठ वाजता त्यांना जेवण गरम करून वाढले. पाऊस आता थांबला होता तेव्हा थोडे पाय मोकळे करावे असा विचार करून ते रिसॉर्ट बाहेर पडले पण सर्वत्र चिखल झाला होता त्यामुळे त्यांनी तो बेत रद्द केला व व्हरांड्यात खुर्च्या टाकुन बसले. जयने सिगरेट शिलगावली आणि धुराची वलये तो हवेत सोडू लागला.