ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांचे पुण्यात निधन

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १९ मे २००८

ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांचे पुण्यात निधन | Vijay Tendulkar Passed Away in Pune

साहित्यविश्वातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व, ज्येष्ठ नाटककार, पटकथाकार विजय तेंडुलकर यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. स्नायुंच्या आजारामुळे काही दिवसांपासून ते पुण्यातील प्रयाग हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. परंतु, काल रात्रीपासून त्यांची तब्येत अचानक खालावली. औषधोपचार आणि व्हेंटिलेटर यंत्रणेलाही ते प्रतिसाद देईनासे झाले. अखेर, आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

‘मिस्थेनिया ग्राईस’ नं तेंडुलकर गेली काही वर्षं आजारी होते. १० एप्रिलपासून त्यांचं दुखणं वाढलं आणि तेव्हापासूनच ते प्रयाग हॉस्पिटलमध्ये होते. विश्रांती आणि उपचारांमुळे त्यांची तब्येत काहीशी सुधारतही होती. पण काल रात्री त्यांची शुद्ध हरपली आणि परिस्थिती हळूहळू हाताबाहेर जाऊ लागली. आज सकाळी त्यांची श्वसनक्रिया थांबली आणि सर्व आशा मावळल्या. डॉक्टरांनी त्यांच्या निधनाचं वृत्त दिलं, तेव्हा उपस्थित प्रत्येकजण हळहळला. तेंडुलकरांचे जवळचे नातेवाईक, सिने-नाट्य-साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते.

तेंडुलकरांच्या जाण्यानं सिने-नाट्य आणि साहित्यविश्वात तीव्र दुःख व्यक्त करण्यात येतंय. आता तेंडुलकर आपल्यात नसले तरी त्यांच्या नाटकांमधून, चित्रपटांमधून आणि त्यांनी मांडलेल्या परखड विचारांमधून ते सतत आपल्यासोबत राहतील, अशी भावना मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली.

'श्रीमंत' या नाटकापासून विजय तेंडुलकर या वादळाची झंझावाती वाटचाल सुरू झाली आणि 'गिधाडे', 'शांतता कोर्ट चालू आहे', 'सखाराम बाईंडर', 'घाशिराम कोतवाल', 'कमला' या नाटकांनी मराठी नाट्यसृष्टी अक्षरशः ढवळून निघाली. 'निशांत', 'आक्रोश', 'अर्धसत्य' या चित्रपटांच्या पटकथा तेंडुलकरांच्या लेखणीतूनच साकारल्या. मराठीतही 'सामना', 'सिंहासन', 'आक्रित', 'उंबरठा' हे त्यांनी लिहिलेले चित्रपट अजरामर ठरले आहेत.

राष्ट्रीय पातळीवर समकालीन नाटककारांच्या पंक्तीत तेंडुलकरांनी अव्वल स्थान पटकावलं होतं. त्यामुळे त्यांच्या जाण्यानं सारं सुनं-सुनं होऊन गेलं आहे. या महानायकला भावपूर्ण श्रद्धांजली..