वारसा भाग १ (अखेरचे पत्र) - मराठी कथा

वारसा भाग १,अखेरचे पत्र,मराठी कथा - [Varsa Part 1,Akherche Patra,Marathi Katha] मातीशी ऋणानुबंध ठेवुन दिलेल्या संस्कारांचा,परंपरेचा व माणुसकीचा वारसा.
वारसा भाग १ (अखेरचे पत्र) - मराठी कथा | Varsa - Part 1 (Akherche Patra) - Marathi Katha

आपल्या मातीशी ऋणानुबंध कायम ठेवुन शिकवलेल्या संस्कारांचा, समजावलेल्या परंपरेचा आणि माणुसकीचा वारसा


उन्हाची तलखी थोडी कमी झाली. दुपारी घेतलेल्या गोळीमुळे आलेली झोप, करकरीत आलं घालून केलेल्या चहाच्या कपाने पूर्ण निघून गेली. थोडी तरतरी आली आणि अनिरुद्ध सरनोबतांनी आपल्या स्टडी टेबल पाशी बसत निग्रहाने हातात पेन घेऊन लिहायला सुरवात केली.
श्री । मुंबई । २२ मार्च २०२०

प्रिय आदित्य यास,
अनेक प्रेमळ आशीर्वाद!

फोन, स्काईप, फेसबुक चॅट सारखे पर्याय उपलब्ध असताना मी आज तुला हे पत्र लिहित आहे याचे कदाचित तुला आश्चर्य वाटेल. याला काही कारणं आहेत, ती पत्र वाचताना तुला लक्षात येतीलच. पण मी आज जे तुला सांगणार आहे तो विषय आणि त्याचा इतिहास एवढा सविस्तर आहे, की फोनवर कींवा स्काईपवर तो सांगणे शक्य नाही आणि बोलताना सगळे मुद्दे सर्व गोष्टी मला आठवतील असे नाही.

असो! हे पत्र तुझ्या हातात मीळेपर्यंत मी ह्या जगात नसेन कींवा हे पत्र मिळायच्या आधीच मी गेलो तर तुला कोणीतरी फोन करेलच कींवा मी अखेरच्या घटका मोजत असेन. माझ्या आजारपणाबद्दल मी तुला आधी किंवा फोनवर का सांगितले नाही म्हणून तुला माझा राग येणे साहजिक आहे. पण तू माझं पत्र संपूर्ण वाचलंस तर कदाचित तुला मी हा निर्णय का घेतला या मागचे कारण समजेल.

काही दिवसांपूर्वी मला डोळ्यांनी अंधूक दिसायला लागले, डोक्यात चमक मारणें, थोडा विसरभोळेपणा असा त्रास झाला होता. एक दोन वेळा थोडा लघवी वरचा कंट्रोल कमी झाल्यासारखे वाटले. आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने, मी सर्व टेस्ट करुन घ्याव्यात म्हणून मी ब्लड, युरीन, लिपीड अशा स्टॅन्डर्ड टेस्ट बरोबर ECG आणि CT Scan पण करुन घेतल्या. CT Scan मधे right frontol lobe वरचा ट्युमर स्पष्ट दिसत होता व चांगलाच वाढला आहे असे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार वेदना रहित ट्युमर हा पुष्कळदा मॅलिग्नंट असायची शक्यता असते. त्यांनी मला जे सांगितले त्यावरुन माझ्या कडे दोन पर्याय ऊपलब्ध होते. एक म्हणजे त्वरित आँपरेशन करुन घेणं व नंतर केमो आणि रेडीएशन ने कॅंसरशी युध्द सुरू करणं. व दुसरा पर्याय म्हणजे काहिही न करणे, ट्युमर वाढेल तसा तसा शरिरावर परिणाम होइल तो स्विकारणे आणि मृत्युला सामोरे जाणे. ऑपरेशन केले तर काही महिने, ऑपरेशन नाही केले तर काही दिवस माझे आयुष्य सुरळीत चालू राहील. तुला माहित आहे की दररोज वाट बघायला लावणारं आणि गळीतगात्र करणारं मरण मला कधीच पटलेलं नाही. निसर्गाने प्रत्येकाची वयोमर्यादा आखली आहे. उगाचच औषधं गिळून कृत्रिम आयुष्य जगणं माझ्या विचारात बसत नाही. माझी सत्तरी झाली आहे. मी पूर्णपणे समाधानी आहे. मला जसे आयुष्य जगायचे होते तसे मी आत्तापर्यंत सुखाने जगत आलेलो आहे. तुझी आई, भार्गवी गेल्या पासून माझ्या आयुष्यातला चार्म, आनंद निघून गेलेला आहे. कुठल्यातरी पर्पज - हेतू करता अजून काही वर्षे अर्थहीन जगावं असं मला अजिबात वाटत नाही. तु अमेरिकेत लग्न करुन सुखी संपन्न आयुष्य जगत आहेस. This is the right time for me to exit! आपले घर, माझी सगळी Investment, shares, भार्गवीचे दागिने वगैरेंची वासलात काय करायची हे will मधे लिहुन ठेवलेच आहे. बँक अकाऊंट डिटेल्स व इंटरनेट बॅंकींग व त्याचे पासवर्ड्स हे देखील तुला लॉकरमधे ठेवलेल्या माझ्या फाईलमधे मिळतील. तसेत या पत्राच्या सोबत जी will ची प्रत आहे त्यातही.

आत्ताची जगभरातील परिस्थिती बघता, चीन, युरोप व अमेरीकेत मांडलेले मृत्युचे थैमान बघता, तुला भारतात अजून सहा महिने तरी येता येईल असे मला वाटत नाही. माझी काळजी घेण्यासाठी मी पूर्णवेळासाठी एका तरुण मुलाला नियुक्त केले आहे. गरीब पण होतकरू आहे तो. नर्सिंग कॉलेजमधे शिकतो आहे, आत्ता कॉलेज बंद म्हणून तो आपल्याकडेच रहाणार आहे. स्वयंपाकासाठी कुसुमताई येत आहेच. मुलाजवळ मी सर्व इमर्जन्सी नंबर देऊन ठेवले आहेत. मी अगदीच unconscious झालो तर त्याने माझ्या डॉक्टरला फोन करुन मला हॉस्पिटलमधे अ‍ॅडमिट करायचे आहे. तो पर्यंत शहरातली हॉस्पिटल Covid पेशंट्सनी फुल झालेली असतील. मला त्यांच्यावर फार भार टाकायचा नाही. कुठल्याही परिस्थितीत मला व्हेंटीलेटर लावायचा नाही कींवा मला जगवण्याकरता कुठल्याही कृत्रिम गोष्टी, नळ्या वैगरे लावायच्या नाहीत हे मी लिहुन ठेवले आहे व डॉक्टरांना कळवून ठेवले आहे. माझ्या दहना नंतर माझे कुठलेही विधी करायचे नाहीत तसेच दिवस - वार करायचे नाहीत हे देखील मी माझ्या इच्छा पत्रात लिहिले आहे व तेच तुलाही सांगत आहे.

माझ्याकडे वेळ कमी आहे. डॉक्टरनी स्टेरॉइड दिली आहेत. त्यामुळे आत्तातरी मेंदु काम करतो आहे व आठवणी जिवंत आहेत तोवर मला हे सर्व तुला सांगितले पाहिजे. खूप वेळ बसलं की पाठ दुखते. लिहीताना आणि वाचताना डोळे दुखून येतात म्हणून आता जास्त नमनाला घडाभर तेल न घालता मूळ विषयाला सुरवात करतो!

“तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तु तेव्हा चौदा - पंधरा वर्षांचा असशील. आपल्या कोकणातली ट्रीप आटपून आपण परत आलो होतो. तिकडे समुद्रात पोहताना तू बुडता बुडता वाचला होतास.आपण परत आलो आणि तू तापाने फणफणलास. टायफॉइड कींवा मलेरिया असा कुठलाच ताप नव्हता. इन्फेक्शन कींवा व्हायरल असावा असं डॉक्टरांना वाटत होतं. एकवीस दिवस झाले तरी ताप उतरेना. तुझं दहावीचं वर्षे आणि शाळा, क्लासेस बुडत होते. तुझी आई घाबरून गेली होती. तुला माहीत आहेच ती कीती सेन्सेटीव होती ते. डॉक्टर बदलले, तुला आयुर्वेदिक औषध चालू केलं. तुझी आई तेव्हा दररोज मठात जात असे. एकदा तिकडे भेटणाऱ्या एका जेष्ठ भक्तांनी तुझी पत्रिका मागितली. माझा या सर्व गोष्टींवर कधीच विश्वास नव्हता पण तुझ्या आईचा होता. तू १५ वर्षांचा होईपर्यंत तुझ्यावर प्राणघातक संकटं आणि आजारपणं आली होती आणि ती मनातून घाबरलेली होती.”

ती पत्रिका घेऊन दाखवायला गेली. बराच वेळ त्याचा अभ्यास केल्यावर त्या ग्रृहस्थांनी तिला सुचवले की नाशकास त्र्यंबकेश्वरी एक मोठे साधु आहेत. त्यांना ही पत्रिका दाखवावी म्हणजे ते त्यातील दोष आणि कायमस्वरूपी उपाय सांगतील. मी कधीही या गोष्टीना राजी होणार नाही हे माहीत होतं तिला. म्हणून तिने त्याची प्रत काढून त्यांच्या बरोबर पत्र व्यवहार केला. इकडे तुझी ट्रीटमेंट सुरु होतीच. हळूहळू आराम पडत होता. एक दोन आठवडे गेले. भार्गवी ने मला नाशिकला साधूंना भेटायला जाऊया असा आग्रह धरला. तिचा आणि त्यांचा पत्र व्यवहार झाला होता. पण त्यांना मुलाच्या वडीलांनाच भेटायचे होते. काही गोष्टी माझ्या बरोबर बोलायच्या होत्या. मला हे बिलकुल पसंत नव्हते. तू पूर्ण बरा झाल्याशिवाय मी कोठेही जाणार नाही यावर मी ठाम होतो. भार्गवी ने जप, पोथी आणि उपास तापास यावर जोर धरला होता. शेवटी एकदाची तुझी दहावी झाली. तू अगदी खडखडीत बरा झाला नव्हतास तरी बराच बरा होतास.

भार्गवीला दिलेल्या शब्दानूसार आणि हवापालट चांगला म्हणून आपण सगळेच नाशिकला गेलो. एक दिवस तुम्हाला दोघांना पांडव लेण्याला पाठवून मी एकटाच त्र्यंबकेश्वरला त्या साधूंच्या आश्रमात गेलो. माझी पत्रिका, तुझी पत्रिका बघत त्यांनी मला बरेच प्रश्न विचारले मग बराच वेळ ते डोळे मिटून ध्यानस्थ बसले. जवळपास पंधरा मिनिटांनी त्यांनी माझ्याशी धिरगंभीर आवाजात बोलायला सुरूवात केली...

त्यांनी मला जे काही सांगितले ते सर्व लिहायला मला आज जमणार नाही कारण ते फार विस्तृत आहे. त्याकरता मला दिडशे वर्षे मागे जावे लागेल. पाठ आणि हात दुखून आले आहेत रे. आता या पुढचे उद्या लिहीन. पुढच्या काही दिवसात तुला हे पोस्ट करेन. संध्याकाळचे पाच वाजत आहेत. मोदीजींनी आवाहन केल्याप्रमाणे आज पाच वाजता सर्वजण टाळ्या, घंटानाद, करणार आहेत. माझ्यात जोर नाही पण आमचा परशुराम (माझी काळजी घेणारा मुलगा) उत्साही आहे. बघ... सगळीकडून आवाज येऊ लागले...! लोकं गॅलरीत येउन थाळ्या, टाळ, घंटा... जेजे मिळेल ते वाजवत आहेत! कोणी शंख पण फुकतायत! युद्धाला सुरूवात झालीये... रणभेरी वाजल्या, लोकांमधे विरश्री संचारली आहे! कोरोना विरुद्ध लढा द्यायला आता आम्ही सज्ज झालो आहोत...!

क्रमशः


स्वाती नामजोशी | Swati Namjoshi
पुणे, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.