पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

उकडीचे मोदक प्रकार १

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ जानेवारी २००८

मोदक

उकडीचे मोदक प्रकार १ - [Ukadiche Modak Type 1] महाराष्ट्रातील कोकण भागात खासा प्रसिद्ध असलेला एक अस्सल मराठमोळा महाराष्ट्रीयन पदार्थ, तसेच सण-उत्सव आणि गणेश चतुर्थीस नैवेद्य म्हणुन बनवला जाणारा गोड पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक, त्यातील अनेक प्रकारापैकी हा प्रकार १.

जिन्नस


  • अर्धा किलो तांदळाचे पीठ
  • १ टेबलस्पून पातळ डालडा अगर तेल
  • १ मोठा नारळ
  • एक ते दीड वाटी गूळ
  • ७-८ वेलदोड्यांची पूड

पाककृती


तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवावे व दळून आणावे.प्रथम सारण तयार करून घ्यावे. पिवळ्या रंगाचा गूळ आणावा. तो विळीवर हलके हलके चिरावा. नंतर वाटीने मोजून साधारणपणे जेवढे ओले खोबरे मोजून भरेल त्याच्या निम्मा गूळ पुरतो. म्हणजे ३ वाट्या ओले खोबरे असेल तर दीड वाटी बारीक चिरलेला गुळ लागतो.

खोबरे व गूळ हाताने कालवावे. गॅसवर ठेवून शिजवावे. नंतर खाली उतरवून त्यात वेलदोड्याची पूड घालावी व सारण थंड होऊ द्यावे. जरा मोठ्या व जाड बुडाच्या पितळेच्या पातेल्यात उकड काढण्यासाठी पाणी तयार करावे. वाटीने तांदळाचे पीठ मोजून घ्यावे. (सपाट) व जेवढे पाण्यातच तेलाचे किंवा तुपाचे मोहन पीठ असेल तेवढे मोजून पाणी ठेवावे व मीठ घालावे. पाण्याला उकळी आली की त्यात वरील तांदळाचे पीठ वैरावे. उलथन्याच्या टोकाने ढवळावे. गॅस लहान करून झाकण ठेवावे व चांगली वाफ येऊ द्यावी. नंतर पातेले खाली उतरवावे.

जरा वेळाने त्यातली थोडी उकड ताटात काढून हाताला थोडे तेल व पाणी लावून मळावी. नंतर त्याचा मोठ्या लिंबाएवढा गोळा घेऊन वाटीसारखा आकार करावा. त्यात वरील नारळाचे पुरण भरावे. नंतर मुखऱ्या करून मोदकाचे तोंड बंद करावे. असे ७।८ मोदक झाले की मोदकपात्रातील चाळणीवर कपड्याचा तुकडा किंवा केळीच्या पानाचा तुकडा घालून त्यावर ठेवून १० मिनिटे वाफवावे. वरील प्रमाणात साधारण २१ मोदक होतात.

उकडीचे मोदक प्रकार १ - संबंधित उपयुक्त लेखन/दुवे


Book Home in Konkan