MarathiMati.com - Android App on Google Play Store

शाही पुलाव

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १७ जानेवारी २००८

शाही पुलाव | Shahi Pulao

शाही पुलाव - [Shahi Pulao] उपयुक्त भाज्या आणि पनीरयुक्त असलेला ‘शाही पुलाव’ घरातील काही मंगल प्रसंगी करण्यासाठी अत्यंत उत्तम पर्याय आहे, लहानांपासून ते मोठ्यांनादेखील हा शाही पुलाव नक्की आवडेल.

जिन्नस


  • २ वाटी तांदूळ
  • १०० ग्रॅम पनीर
  • १ वाटी मटार
  • १ गाजर
  • ३ कांदे
  • ४-६ कळी लसूण
  • १ तुकडा आले
  • २ हिरव्या मिरच्या
  • १/२ वाटी अननस चिरलेला
  • १ मोठा चमचा काजू
  • १ मोठा चमचा बेदाणे
  • १ चमचा जीरे
  • ४ लवंग
  • ३ हिरवी वेलची
  • २ तुकडे दालचिनी
  • ६ आख्खी काळी मिरी
  • मीठ चवीप्रमाणे
  • १/४ चमचा केशर
  • ६ चमचे तूप

पाककृती


तांदूळ धुऊन तासभर पाण्यात भिजवा. पातेल्यात चार कप पाणी टाकून गॅसवर ठेवा.

भिजवलेले तांदूळ पाणी काढून गॅसवरील पातेल्यात शिजवा. तांदूळ शिजल्यावर गॅस बंद करा.

पनीरचे चौकोनी तुकडे करा. गाजर सोलून चिरुन घ्या. मटारचे दाणे काढा. कांदा-लसूण व आले सोलून घ्या. कांदा बारीक चिरावा. आले-लसूण व हिरवी मिरची मिक्सरमधून काढा. केशर २ चमचे पाण्यात भिजवा.

एका कढईत तूप गरम करून काजू तळून घ्या. त्याच कढईत जिर्‍याची फोडणी देऊन कांदा परतून घ्या. नंतर लवंग, हिरवी वेलची, दालचिनी व काळी मिरी वाटून टाका.

आता आले-लसूण-हिरवी मिरचीची पेस्ट टाकून परता. पेस्ट चांगली परतल्यावर मटार, गाजर, पनीर, अननस, काजू, बेदाणे व चवीनुसार मीठ टाकून एकत्र करा.

दोन मिनीटे परतून शिजलेले तांदूळ व केशर टाकून नीट एकत्र करा, गॅस बंद करून गरमा-गरम वाढा.

MarathiMati.com - Android App on Google Play Store