रव्याचे लाडू

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २३ जानेवारी २००८

रव्याचे लाडू

रव्याचे लाडू - [Ravyache Ladoo] झटपट घरच्या घरी करता येणारे ‘रव्याचे लाडू’ सणासुदीला गोड पदार्थ म्हणून केले जातात.

जिन्नस


  • ४ वाट्या (भरून) बारीक रवा
  • दीड वाटी तूप किंवा डालडा
  • ४ वाट्या साखर
  • १ नारळ
  • ५-६ वेलदोडे (पूड) चारोळा
  • बेदाणा व काजूचे काप (ऐच्छिक)

पाककृती


रवा चाळून घावा. नारळ खवून पांढरे खोबरे घ्यावे. करवंटीजवळचा काळसर भाग वेगळा खरवडावा व त्याचा उपयोग भाजी-आमटीसाठी करावा.

जाड बुडाच्या पातेल्यात तूप तापले की मध्यम आंचेवर रवा त्यात घालून भाजावा. सुमारे पंधरा मिनिटांनंतर रवा भाजत आला की त्यात खोबरे घालून आणखी पाच मिनिटे भाजावे व खाली उतरवून मिश्रण ताटात ओतावे.

दुसऱ्या पातेल्यात साखर घालून त्यात दोन वाट्या पाणी घालावे व चुलीवर ठेवावे. उकळी आली की तीन चमचे दूध घालावे व आंच कमी करावी. मळी येईल ती काढून टाकावी.

पाक उकळून ठेवावा. एकतारी पाक झाला की रव्याचे मिश्रण त्यात घालावे. दोन मिनिटे चुलीवर ठेवून खाली उतरवावे व झाकून ठेवावे. त्यात वेलचीपूड, मेवा घालून दर पाचदहा मिनिटांनी मिश्रण ढवळावे.

मिश्रण कोमटसर झाले व लाडू वळण्याइतपत आळले की लहान लहान लाडू वळावे. दुसऱ्या दिवशी मुरल्यानंतर खायला द्यावे.

ओला नारळ वापरल्यामुळे चार दिवसानंतर फ्रिजमध्ये ठेवावे. नाहीतर खवट वास येऊ लागतो.