MarathiMati.com - Android App on Google Play Store

पुरणपोळी

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | १३ जानेवारी २००८

पुरणपोळी

पुरणपोळी - [Puranpoli] सण-उत्सवाच्या काळात घरोघरी हमखास केला जाणारा अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ. पुरणपोळी दुधासोबत, तुपासोबत किंवा कटाच्या आमटी सोबत छानच लागतो. सर्व वयोगटातील खवैयांचा हा एक आवडीचा पदार्थ आहे.

जिन्नस


  • १ किलो हरभर्‍याची डाळ
  • १/२ किलो उत्तम पिवळा गुळ
  • १/२ किलो साखर
  • १०-१२ वेलदोड्यांची पुड
  • थोडेसे केशर
  • १/४ जायफळाची पूड
  • १ फुलपात्र रवा
  • १ फुलपात्र कणीक
  • २ फुलपात्रे मैदा
  • १ वाटी तेल
  • मीठ

पाककृती


हरभर्‍याची डाळ स्वच्छ धुवुन शिजत घालावी. शिजतांना त्यात थोडे तेल व हळद घालावी. डाळ चांगली शिजली, की टोपलीत उपसून टाकावी. सर्व पाणी निथळले, की त्यात चिरलेला गूळ व साखर घालून शिजवावे, पुरण चांगले घट्ट शिजले पाहिजे.

उलथणे पुरणात न पडता उभे राहिले, म्हणजे पुरण शिजले, असे समजावे.

नंतर त्यात १/४ चमचा मीठ, जायफळ, वेलदोड्याची पूड व केशर घालावे. नंतर पुरणयंत्रावर किंवा पाट्यावर पुरण वाटावे.

परातीत रवा घेऊन त्यात थोडे पाणी घालावे व रवा भिजत ठेवावा, नंतर त्यात मैदा, कणीक व मीठ घालून पीठ जरा सैलसर भिजवावे.

नंतर त्यात थोडे - थोडे तेल घालून कणीक चांगली तिंबून घ्यावी.

पुरणपोळीची कणीक नेहमीच्या पोळ्यांच्या कणकेपेक्षा सैलच असते.

नंतर कणकेच्या पारीत पुरण भरून हलक्या हाताने तांदुळाच्या पिठीवर पोळ्या लाटाव्यात.

पुरणपोळी - संबंधित उपयुक्त लेखन/दुवे


MarathiMati.com - Android App on Google Play Store