पुरण पोळी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ जानेवारी २००८

पुरण पोळी

पुरण पोळी - [Puran Poli] गोड पदार्थ म्हणून महाराष्ट्रात सणासुदीला पुरण पोळी आवर्जून खाल्ली जाते.

जिन्नस


  • १ किलो हरभऱ्याची डाळ
  • १ किलो उत्तम पिवळा गुळ
  • १०-१५ वेलदोड्यांची पूड
  • अर्ध्या जायफळाची व थोडी केशराची पूड
  • चवीसाठी १ चमचा मीठ
  • १ फुलपात्र बारीक रवा
  • १ फुलपात्र मैदा
  • २ फुलपाते चाळलेली कणीक
  • १ वाटी तेल व मीठ
  • लाटण्यासाठी तांदळाची पिठी.

पाककृती


हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून पाणी घालून शिजवून घ्यावी. नंतर चाळणीवर ओतून निथळावी

नंतर त्यात चिरलेला गूळ घालून पुरण शिजवून घ्यावे. गूळ घातल्यानंतर सर्व मिश्रण पातळ होईल. पण जरा वेळाने पुनः घट्ट होईल. मिश्रण सतत हलत रहावे.

चांगले घट्ट झाले म्हणजे त्यात उलथने उभे करून पहावे. उलथने पडले नाही म्हणजे पुरण चांगले शिजले असे समजावे व उतरवावे.

नंतर गरम आहे तोवरच पुरणयंत्राला बारीक जाळी लावून त्यातून वाटून घ्यावे. त्यात चवीसाठी मीठ, केशर, वेलदोडे, जायफळ यांची पूड घालून बाजूला ठेवावे.

परातीत प्रथम रवा घ्यावा. त्यावर थोडे पाणी घालून ठेवावे. नंतर त्यात मैदा, कणिक, मीठ घालून पीठ भिजवावे. थोडे थोडे तेल घालून कणीक चांगली तिंबून घ्यावी.

पुरण पोळीची कणीक नेहमीच्या पोळ्याच्या कणकेपेक्षा थोडी सेल असते. नंतर कणकेच्या पारीत पुरण भरून उंडा तयार करावा.

हलक्या हाताने तांदळाच्या पिठीवर पोळी लाटावी. लाटण्याला तेल लावून त्याला गुंडाळून अगर वर्तमानपत्रच्या चौपदरी घडीवर पोळपाट उलटा करून पोळी काढावी.

आजूबाजूची पिठी मऊ कपड्याने बाजूला करावी. पुरण पोळीच्या तापलेल्या तव्यावर दोन्हीकडून लालसर भाजावी व अर्धी घडी करून उलथन्याने पोळी अलगद खाली काढावी. तवा पुसुन घ्यावा. अशाच सर्व पोळ्या कराव्या.

गरमागरम पोळी दूध किंवा कटाच्या आमटीसोबत खाण्यास द्यावी.

पुरण पोळी - संबंधित उपयुक्त लेखन/दुवे