मेथीचे गोड अप्पे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १७ जानेवारी २००८

मेथीचे गोड अप्पे

मेथीचे गोड अप्पे - [Methiche God Appe] मुळचा दक्षिण भारतातला परंतु सर्वत्र प्रसिद्ध असलेला ‘मेथीचे गोड अप्पे’ हा तांदूळ, मेथी दाणे व गुळ यापासून बनविला जाणारा हलका फुलका व सर्वजण खाऊ शकणारा पदार्थ आहे.

जिन्नस


  • २ वाट्या तांदूळ
  • २ लहान चमचे मेथी दाणे
  • आवडीनुसार गूळ
  • चवीपुरते मीठ
  • किंचित खाण्याचा सोडा

पाककृती


आदल्या दिवशी सकाळी तांदूळ आणि मेथी दाणे भिजत घालावे (जसे आपण ईडलीचे साहित्य पाण्यात भिजत घालतो तसे). रात्री ह्या मिश्रणात आवडीनुसार गूळ घालून किंचित जाडसर (ईडलीच्या पीठासारखे) वाटावे व एका भांड्यात ठेवावे.

त्यामध्ये चवीपुरते मीठ व सोडा टाकून चांगले ढवळुन झाकून ठेवावे. दुसर्‍या दिवशी सकाळी अप्प्याचे भांडे धुवून कोरडे करुन त्याला तेल लावून ठेवावे.

न्याहरीच्या वेळी अप्प्याचे भांडे गॅसवर ठेवावे, गॅस मोठा करून भांडे गरम करुन घ्यावे. गरम झाल्यावर गॅस मंद ठेवावा. अप्प्याच्या भांड्याच्या गोल गोल वाटीमध्ये थोडं-थोडं तेल ओतावे व त्यामध्ये वरील पीठ ओतावे.

भांड्यावर झाकण ठेवावे. पाच मिनिटांनी चांगले शिजल्यावर ते गोल अप्पे त्यामध्येच परत उलटावेत व दोन मिनीटे दुसरी बाजू भाजून ते भांडयातून काढावेत.

ह्याच कृतीप्रमाणे सर्व पीठांचे अप्पे भाजून घ्यावेत आणि गरमागरम अप्पे ओल्या खोबर्‍याच्या चटणीसोबत किंवा सांबारासोबत खावेत.