MarathiMati.com - Android App on Google Play Store

संत्र्याचा केशर भात

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १० जानेवारी २००८

संत्र्याचा केशर भात

संत्र्याचा केशर भात - [Keshar Rice With Oranges] स्वादिष्ट, पौष्टिक आणि हलकाफुलका असा ‘संत्र्याचा केशर भात’ सण-उत्सवानिमित्त केला जाऊ शकतो, संत्र्याचा चटकदार स्वाद असल्याने बालगोपाळांना देखील हा पदार्थ अत्यंत आवडीचा आहे. सणा-उत्सवाला तर एकवेळ नक्की करून पाहावा असा हा भाताचा प्रकार आहे.

जिन्नस


 • १ वाटी बासमती तांदूळ
 • २०० ग्रॅम साखर
 • १ मोठे किंवा २ लहान संत्री
 • ३ मोठे चमचे लोणकढे तूप
 • ४ दालचिनीचे लहान तुकडे
 • ४ लवंगा
 • ४ वेलदोडे
 • पाव चमचा केशर (दुधात भिजवावे)
 • १ मोठा चमचा संत्राच्या सालीचा कीस
 • ८-१० बदाम व काजूचे काप
 • १०-१२ बेदाणे
 • खास प्रसंगी चांदीचा वर्ख व चेरीज
 • ३-४ थेंब ऑरेंज रंग

पाककृती


तांदूळ धुवून तासभर बाजूला ठेवावे. ४ कप आधण पाण्यात तांदूळ वैरावे व १२-१३ मिनिटे प्रखर आंचेवर अर्धवट शिजवावे.

चाळणीवर निथळावे व त्यावर थोडे गार पाणी ओतावे. एका ताटात भात पसरून गार करत ठेवावा.

साखरेत एक वाटी पाणी घालून एकतारीपेक्षा जरा कमी असा पाक करावा.

एका जाड बुडाच्या पातल्यात तूप तापले की त्यावर लवंगा, दालचिनी व वेलदोडे फोडणीस टाकून त्यावर गार झालेला भात, संत्र्याच्या सालीचा कीस व पाक घालावा.

संत्र्याचा रस काढावा व ताजा रस भातात घालावा. रंगाचे थेंब व काजूबदाम, बेदाणे (निम्मे) घालावे झाकण ठेवावे.

पाच मिनिटांनंतर वाफ आली की पातेल्यासारखी एक तवा ठेवावा. केशर शिंपडावे व मंद आंचेवर भात पुरता शिजवावा.

उरलेले काजू, बेदाणे, वर्ख, चेरीज इत्यादी सजावट करून शोभिवंत भांड्यात भात ठेवावा.

MarathiMati.com - Android App on Google Play Store