MarathiMati.com - Android App on Google Play Store

कच्छी दाबेली

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २००८

कच्छी दाबेली

कच्छी दाबेली - [Kacchi Dabeli] मुळात कच्छ(गुजरात) येथील सुप्रसिद्ध ‘कच्छी दाबेली’ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतासह अनेक देशात देखील तितकीच प्रसिद्ध आहे. न्याहारीला किंवा मधल्या वेळेत करता येणारा हा पदार्थ घरी नक्की करुन बघा.

जिन्नस


 • ६ - ८ लादी पाव
 • २ मध्यम उकडलेले बटाटे
 • ३/४ कप डाळिंबाचे दाणे
 • १० ते १२ द्राक्षे
 • ३/४ कप बारीक चिरलेला कांदा
 • १/२ कप रोस्टेड (मसाला) शेंगदाणे
 • बारीक शेव
 • १ १/२ टेस्पून दाबेली मसाला
 • १/२ टिस्पून चाट मसाला
 • २ टिस्पून तेल
 • हळद
 • तिखट
 • हिरवी चटणी
 • चिंचगूळाची चटणी

पाककृती


सर्वात आधी दोन्ही चटण्या तयार करून घ्याव्यात.

बारीक चिरलेल्या कांद्याला थोडा चाट मसाला लावून घ्यावा. प्रत्येक द्राक्षाचे दोन तुकडे करावे.

उकडलेले बटाटे सोलून किसून घ्यावेत.

कढईत तेल गरम करून त्यात ४-५ चमचे चिंचगूळाचे पाणी घालावे. १ १/२ टेस्पून दाबेली मसाला घालावा. मिश्रण ढवळावे. नंतर किसलेला बटाटा घालावा. चवीनुसार मीठ घालावे.

थोडीशी हळद - तिखट टाकावे. त्यानंतर थोडे पाणी टाकून एकजीव करून घ्यावे. चांगले शिजले कि गॅसवरुन खाली उतरावे.

एका ताटलीत तयार बटाट्याचे मिश्रण थापून घ्यावे. त्यावर कापलेली द्राक्षं, डाळींबाचे दाणे आणि शेंगदाणे आवडीनुसार पसरवावे. थोडी शेव आणि कोथिंबीर घालून सजावट करावी.

आता पावाला तीन बाजूंनी चिर द्यावा. त्यात एका बाजूला चिंचगूळाची चटणी आणि दुसर्‍या बाजूला हिरवी चटणी लावावी. मध्ये बटाट्याचे तयार सारण घालावे. अजून हवे असल्यास थोडे डाळींबाचे दाणे, रोस्टेड शेंगदाणे घालावेत आणि कांदा भरावा.

तव्यावर १/२ टिस्पून बटर घालावे त्यावर दाबेली दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावी. नंतर दाबेलीची तिन्ही बाजूची किनार बारीक शेवमध्ये बुडवून गरम गरम खायला द्यावी.

MarathiMati.com - Android App on Google Play Store