MarathiMati.com - Android App on Google Play Store

हरभरे बटाट्याची चटपटीत भाजी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ जानेवारी २००८

हरभरे बटाट्याची चटपटीत भाजी

हरभरे बटाट्याची चटपटीत भाजी - [Harbhare Batatyachi Chatpatit Bhaji] सण, उत्सव किंवा आप्तेष्टांसोबत जेवणाचा प्रसंग असो अशा वेळी ‘हरभरे बटाट्याची चटपटीत भाजी’ हा नक्कीच एक उत्तम पर्याय ठरू शकेल, मोठ्यांसोबत लहानग्यांना देखिल भाजीचा हा प्रकार फारच आवडेल.

जिन्नस


  • दीड वाटी चणे (हरभरे)
  • ३०० ग्रॅम बटाटे
  • २ मोठे चमचे तेल
  • २ तमालपत्रे
  • १ चमचा जीरे
  • ३ हिरव्या मिरच्या
  • ३ लाल मिरच्या
  • ७-८ लसूण पाकळ्या
  • थोडेसे आले
  • १ वाटी चिरलेली कोथिंबीर
  • अर्धी वाटी सुक्या खोबर्‍याचा कीस
  • चवीनुसार मीठ
  • मोठ्या लिंबाएवढी चिंच
  • ४ चमचे गूळ

पाककृती


हरभरे रात्रभर भिजत घालावे व सकाळी उपसून चाळणीवर निथळावे. बटाटे उकडून सोलावे.

हरभरे कुकरमध्ये शिजवून घ्यावे. चिंच अर्धी वाटी पाण्यात तासभर भिजत ठेवावी.

आले, लसूण, लाल व हिरव्या मिरच्या, खोबरे, निम्मी कोथिंबीर व जीरे एकत्र वाटावे. चिंचेचा घट्ट कोळ काढावा.

जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापले की त्यावर तमालपत्र घालावे. वाटलेला मसाला त्यात घालून परतावा.

शिजलेले चणे पाण्यासकट त्यावर घालावेत. मीठ घालावे व मंद आंचेवर ७-८ मिनिटे उकळू द्यावे.

नंतर त्यात चिंचेचा कोळ, बटाटे, गूळ, उरलेली कोथिंबीर घालून आवश्यक वाटल्यास थोडे गरम पाणी घालावे.

पाच मिनिटे चुलीवर ठेवावे व नंतर खाली उतरवून जरा मुरले की पोळी, पुरीसोबत खायला द्यावे.

MarathiMati.com - Android App on Google Play Store