दिलपसंद केळ्याचे वडे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ फेब्रुवारी २००८

दिलपसंद केळ्याचे वडे

दिलपसंद केळ्याचे वडे - [Dilpasand Kelyache Vade] केळ्यात असणारे जीवनसत्वं आणि अंडे मिळून तयार झालेले चटपटीत असे ‘दिलपसंद केळ्याचे वडे’ वेगळी पाककृती म्हणून सर्वांना आवडेल.

जिन्नस


 • ९ पिकलेली केळी
 • अर्धा नारळ
 • ८ हिरव्या मिरच्या
 • दीड वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
 • ७-८ लसूण पाकळ्या
 • १ चमचा मीठ
 • अर्धा चमचा मिरेपूड
 • १ चमचा जिरे
 • तळणीसाठी तेल किंवा तूप
 • ४ अंडी
 • १ वाटी वाळलेल्या ब्रेडचा चुरा
 • १ लिंबू

पाककृती


नारळाचा चव, मिरच्या, कोथिंबीर, लसूण, मीठ, जिरे, मिरेपूड एकत्र करून याची चटणी वाटावी.

त्यावर लिंबाचा रस घालून चटणी मिसळावी. अंडी खूप फेटून ठेवावी.

प्रत्येक केळ्याचे तीन तुकडे करावे. प्रत्येक तुकडा मधे अर्धा चिरावा व त्यात थोडी चटणी भरावी.

असे सर्व तुकडे तयार ठेवावे. कढईत तेल तापत ठेवावे.

केळ्याचा तुकडा ब्रेडच्या चुऱ्यात घोळवावा.

फेटलेल्या अंड्यात बुडवावा व जरा निथळून कढईत तळावा.

हे तिखट-गोड वडे सर्वांना आवडतात.