MarathiMati.com - Android App on Google Play Store

शेफ देवव्रत जातेगावकर यांनी साकारली मार्जरीनची भव्य त्रिमूर्ती

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ मार्च २०१७

शेफ देवव्रत जातेगावकर यांनी साकारली मार्जरीनची भव्य त्रिमूर्ती | Margarine Trimurti by Chef Devvrat Jategaonkar

जेवण बनवणे ही जशी कला आहे तसेच ते सजवणे आणि त्यावर कार्व्हिंग करणे हा देखील शेफच्या प्रोफेशनमधील आगळा - वेगळा असा पैलू आहे. भारताचे प्रसिद्ध शेफ देवव्रत जातेगावकर यांनी या कलेत खूपच प्राविण्य मिळवले आहे. इतकेच नाही तर त्याही पुढे जाऊन मार्जरीन (कृत्रिम लोणी) शिल्पकार म्हणून ख्याती असलेले देवव्रत एका अद्भुत कलेचा नमुना आपल्यासमोर घेऊन आले आहेत. सांताक्रुज येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस आंतरदेशीय विमानतळाच्या आवारात शेफ देवव्रत जातेगावकर यांनी मार्जरीनची त्रिमूर्ती साकारली आहे.

घारापुरीची लेणी ऊर्फ एलिफंटा केव्ह्ज येथील सुप्रसिद्ध त्रिमूर्तीच्या शिल्पाची तब्बल ८ फुट रूंद आणि ६.५ फुट उंचीची प्रतिकृती मार्जरीन वापरून बनविण्यात आली आहे. या भव्य शिल्पासाठी तब्बल १५१२ किलो मार्जरीन वापरण्यात आले. नुकत्याच २४ फेब्रुवारीला झालेल्या महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर लोकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले असून या भव्य शिल्पाचे कामकाज अवघ्या १० दिवसात पूर्ण करण्यात आले. १४ फेब्रुवारी रोजी सुरु करण्यात आलेले हे कामकाज निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी दिवसाचे १४ तास देवव्रत या कार्व्हिंग कलाकारीसाठी सदर ठिकाणी व्यस्त असायचे.

याबद्दल आपले मत व्यक्त करताना शेफ देवव्रत जातेगावकर यांनी सांगितले की, भारतीय संस्कृतीत त्रिमूर्तीला अढळ स्थान आहे. ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांचे प्रतिक या त्रिमूर्तीत आहे. जे निर्मिती, संगोपन आणि विनाश ह्या जीवनातील महत्वाचे तीन पैलू स्पष्ट करतात, ज्या कधीच बदलत नाही, केवळ आपल्याच नव्हे तर जगातील इतर संस्कृतीला देखील ह्या पैलू लागू होतात. जगात येणाऱ्या प्रत्येकाला या घटकांमधून जावंच लागतं. आपल्या भारतीय संस्कृतीचे हे मूळ असून याची महती जागतिक पातळीवर करून देण्याचा माझा मानस आहे. शिवाय कार्व्हिंगची कला मला आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील जोपासायची असल्यामुळे, इतर कोणत्या शिल्पापेक्षा त्रिमूर्ती रेखाटून भारतीय संस्कृतीचे प्रतिक लोकांसमोर सादर करणे मला योग्य वाटले. ही मार्जरीनरुपी त्रिमूर्ती नागरिकांना विनामुल्य पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

फळे आणि भाज्या कार्व्हिंगमध्ये शेफ देवव्रत जातेगावकर यांनी कौशल्य विकसित करून ती आपली खासियत बनवली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या कौशल्याला राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत, तर मार्जरीन शिल्पकलेतदेखील सुवर्णपदक पटकावले आहे. महत्त्वाचे म्हणजे २०१२ साली जर्मनीमध्ये झालेल्या Culinary Olympics मध्ये शेफ देवव्रत जातेगावकर यांनी भारताला रौप्यपदक मिळवून दिले होते. महालासह सिंड्रेलाची संपूर्ण कथा दर्शविणारी कलाकृती शेफ देवव्रत जातेगावकर यांनी मार्जरीनमध्ये साकारली होती. महत्त्वाचे म्हणजे विविध देशातून या स्पर्धेत मोठ्याप्रमाणात भाग घेण्यार्‍या स्पर्धकांच्या यादीत भारतातर्फे सहभागी होणारे देवव्रत जातेगावकर हे एकमेव शेफ होते. देवव्रत जातेगावकर हे दूरचित्रवाणीवरील अनेक कार्यक्रमातून लोकांसमोर येत असून त्यांनी पुस्तक लिखाण, वृत्तपत्रीय लेखन देखील केले आहे. त्यामुळे त्यांना कार्व्हिंग मास्टर असे देखील संबोधले जाते. शेफ देवव्रत जातेगावकर यांची मार्जरीन कार्व्हिंगची हि कला स्थानिक मुंबईकरांसोबतच देश - विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी देखील एक मोठी पर्वणी ठरत आहे.

शेफ देवव्रत जातेगावकर यांनी साकारली मार्जरीनची भव्य त्रिमूर्ती - छायाचित्र १ | Margarine Trimurti by Chef Devvrat Jategaonkar - Photo 1
शेफ देवव्रत जातेगावकर यांनी साकारली मार्जरीनची भव्य त्रिमूर्ती - छायाचित्र २ | Margarine Trimurti by Chef Devvrat Jategaonkar - Photo 2
शेफ देवव्रत जातेगावकर यांनी साकारली मार्जरीनची भव्य त्रिमूर्ती - छायाचित्र ३ | Margarine Trimurti by Chef Devvrat Jategaonkar - Photo 3
शेफ देवव्रत जातेगावकर यांनी साकारली मार्जरीनची भव्य त्रिमूर्ती - छायाचित्र ४ | Margarine Trimurti by Chef Devvrat Jategaonkar - Photo 4
शेफ देवव्रत जातेगावकर यांनी साकारली मार्जरीनची भव्य त्रिमूर्ती - छायाचित्र ५ | Margarine Trimurti by Chef Devvrat Jategaonkar - Photo 5
शेफ देवव्रत जातेगावकर यांनी साकारली मार्जरीनची भव्य त्रिमूर्ती - छायाचित्र ६ | Margarine Trimurti by Chef Devvrat Jategaonkar - Photo 6
MarathiMati.com - Android App on Google Play Store