सदानंद भावसार

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २७ फेब्रुवारी २०१४

सदानंद भावसार | Sadanand Bhavsar

सदानंद भावसार(Sadanand Bhavsar) यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षकापासून समाजसाधना, समाजभूषण, ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्व अशा १२ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

२७ फेब्रुवारीला साजरा होणार्‍या जागतिक मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने मातीतले कोहिनूर सदानंद भावसार यांच्याविषयी मराठीमाती डॉट कॉमसाठी खास लेख.

मराठीचा आत्यंतिक आदर आणि प्रेम मनात ठेऊन आजच्या मोबाईल युगात पत्रसंस्कृती टिकवून ठेवण्याची धडपड करणारे पारोळा येथील सत्तरीचे व्यक्तिमत्व पत्रलेखन संस्कृतीचे पुरस्कर्ते सदानंद भावसार. त्यांचे संवेदनशील मन, दुसऱ्याच्या प्रगतीबद्दल आनंद व्यक्त करणारे, मराठीचे पुरस्कर्ते आणि पत्रसंस्कृती टिकवून ठेवण्यासाठी प्रामाणिक धडपड ते करीत आहेत. भावसार यांनी मराठी भाषा वृद्धीसाठी गत ३८ वर्षांपासून कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याला त्रिवार वंदन.

सदानंद भावसार राहणारे मुळचे पारोळा तालुक्यातील बहादरपूरचे. वडील सर्वसामान्य शेतकरी होते. परिस्थिती तशी बेताची. बहादरपूरला अकरावीपर्यंत शिक्षण झाले. मॅट्रीकला ७२ टक्के गुण मिळवून अमळनेर केंद्रात प्रथम आले. मात्र, पैशाअभावी पुढे शिकता आले नाही. शालेय काळात चित्रकलेची इंटरमिजिएट परीक्षा दिलेली असल्याने कृषी खात्यात ट्रेसरची नोकरी लागली. नोकरी करता करता पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे पदवीचे शिक्षण घेतले. पदवीच्या आधारावर तामसवाडीच्या नागरिक शिक्षण मंडळाने माध्यमिक शिक्षकाची नोकरी त्यांना देऊ केली. अन्‌ ते शिक्षक बनले. त्यांनी उर्वरीत नोकरी पारोळ्याला केली. आपल्या ३८ वर्षांच्या नोकरीत एम.ए.बी.एड पर्यंत शिक्षण त्यांनी पूर्ण केले. कला शाखेचे एम.ए. शिकलेले हे शिक्षक मात्र गणिताचे अध्यापन करीत राहिले. या अध्यापनाबरोबर त्यांनी वृत्तपत्र वाचन, लेखन, गुणीजनांचा सत्कार, पत्राव्दारे अभिनंदन, शुभेच्छा पत्र पाठविण्याच्या १९७६ पासून असलेल्या छंदास अधिक वेळ ते देऊ लागले. शहर, तालुका, जिल्हा राज्य येथे काही चांगले घडले असेल तर वाचण्यात आलेल्या त्या व्यक्तीस अभिनंदनाचे पत्र ते पाठवित. २०१३ अखेर त्यांनी ३० हजार ३११ अभिनंदनपर पत्रे पाठविली असून, त्यास ९ हजार ३७३ जणांकडून उत्तरे देखील आली आहेत.

२००५ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर असलेल्या छंदाला त्यांनी अधिक वेळ देऊ केला. ३८ वर्षांपासूनच्या या पत्रलेखन छंदाची लेखी नोंद घेतलेली आहे. अत्यंत सुटसुटीत आणि त्यांनी पाठविलेल्या व आलेल्या पत्रांच्या आवक जावक क्रमांकानुसार नोंदणी केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील माहेरवाशीण असलेल्या सौ. मंदाकिनी वसंतराव पाटील या गुजरातमधील सोनगडच्या नगराध्यक्ष बनल्या. आपल्या गावाकडील लेक नगराध्यक्ष झाली म्हणून जिल्हावासीय नागरिक या नात्याने अभिनंदन पत्र त्यांनी पाठविले. महाराष्ट्रातून एकही अभिनंदन पत्र न गेलेल्या मंदाकिनी त्या चहार्डीला आल्या असता पारोळ्यास घर शोधत भेटण्यास गेल्या. त्यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांचा हा पत्रप्रपंच फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादीत ठेवला नाही तर इतर राज्यांत देखील त्यांची अभिनंदनाची पत्रे रवाना झाली आहेत. मध्यप्रदेश, राजस्थानच्या मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी ते पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल यांनी भावसारांनी पाठविलेल्या अभिनंदन पत्रास उत्तरे देखील पाठविली आहेत.

आजवर ८४ व्यक्ती व संस्थांना ८१ हजार ६८१ रुपयांची आर्थिक मदत केली आहे. गेल्या २१ वर्षांपासून दहावी, बारावीतील सर्वप्रथम उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा तालुकास्तरीय बक्षीस समारंभ ते आयोजित करीत असतात. आतापर्यंत ११५ विद्यार्थ्यांना ९३ हजार ६१७ रुपये रोख व गौरवपत्र देऊन या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा यावा यासाठी पारोळा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा त्यांनी सुरू केली. यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना सानेगुरूजी यांचे ‘श्यामची आई’ आणि महेश गोरडे यांचे ‘या टी.व्ही.चं करायचं काय’ तसेच मी लिहिलेल्या ‘घडवा सुंदर हस्ताक्षर’ आदी पुस्तके भेट देतात. आतापर्यंत ३२१ मुलांना ही ४८ हजार ४७१ रुपयांची पुस्तके त्यांनी भेट दिली आहेत. आपल्या आईच्या स्मृतिदिनी (१५ फेब्रुवारी) ते विद्यार्थ्यांना पुस्तके भेट देतात.

भावसारांकडे आर्थिक श्रीमंती नसली तरी मनाची श्रीमंती आहे. सेवानिवृत्तीनंतर मिळणारे निवृत्तीवेतन हाच त्यांचा केवळ एकमात्र उत्पन्नाचा स्त्रोत आहे. तरी आपण काही सामाजिक - शैक्षणिक देणे लागतो याचे त्यांना संपूर्ण भान आहे. भावसार यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षकापासून समाजसाधना, समाजभूषण, ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्व अशा १२ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.