नव्या युगाच्या विद्यार्थिनींची राष्ट्रीय परिषद

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १७ मार्च २०१५

नव्या युगाच्या विद्यार्थिनींची राष्ट्रीय परिषद | Smart Gennext Event - SNDT Women's University, Pune

एस. एन. डी. टी विद्यापिठाच्या पुणे आवारात विद्यार्थिनींच्या नेतृत्वाखाली विद्यार्थिनींसाठी SMART GENNEXT- Opportunities and Challenges या विषयांवर दिनांक १३ व १४ मार्च २०१५ रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ डॉ.दिपक शिकारपूर यांच्या हस्ते झाले.

या विद्यार्थी परिषदेत “युवक आणि माहिती तंत्रज्ञान”, “संस्कृती - सामाजिक जबाबदारी” आणि “उच्च शिक्षणाबाबत युवकांच्या अपेक्षा” या विषयांवर विद्यार्थिनींनी प्रकल्प सादर करून आपापली मते मांडली.

उद्घाटनपर भाषणात डॉ.दिपक शिकारपूर यांनी मानवी जीवनातील माहिती तंत्रज्ञान आणि संगणकाचा वापर यांचे महत्व सांगितले. या परिषदेचे अध्यक्षस्थान विद्यापिठाच्या प्रा. कुलगुरू डॉ. वंदना चक्रवर्ती यांनी भुषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी एस. एन. डी. टी विद्यापिठातील नवे उपक्रम, कोर्सेस आणि विद्यापिठाची प्रगती याचा परिचय करून दिला. डॉ. प्रविण सप्तर्षी, डॉ. महेंद्र दामले, डॉ. नितीन मुळे यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली तसेच समारंभाच्या समारोपामध्ये सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी “आयुष्यातील सुरूवातीची वर्षे शिक्षणामागे व्यर्थ घालविण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन जीवन कसे समृद्ध होऊ शकते” या बद्दलचे विचार आपल्या खुमासदार शैलीत विषद केले. डॉ.मधुरा केसकर यांनी या परिषदेमुळे विद्यार्थिनींना एक नवे व्यासपीठ निर्माण झाले असून त्यांनी पुढे अशाच पद्धतीने सक्रिय होऊन संशोधनाकडे वाटचाल करावी, असे सांगितले.

या परिषदेमध्ये एस. एन. डी. टी विद्यापिठाच्या कला, वाणिज्य, गृह विज्ञान, सामाजिक शास्त्रे, संप्रेषणशास्त्र, शिक्षणशास्त्र इ.. पदवी आणि पदव्युत्तर शाखेतील ५०० हून अधिक विद्यार्थीनी सहभागी झाल्या आणि एकूण ८४ विद्यार्थिनींनी आपले शोधनिबंध सादर केले.