एस. एन. डी. टी येथे आंतरराष्ट्रीय भूगोल परिषद संपन्न

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ नोव्हेंबर २०१५

एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, पुणे येथे आंतरराष्ट्रीय भूगोल परिषद संपन्न | IGU Conference inaugurated at S.N.D.T. Pune

एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठ, पुणे येथील भूगोल पदव्युत्तर विभागा तर्फे, ‘बदलत्या नागरी परिस्थितीतील भूपृष्ठ, पाणी, हवामान आणि आरोग्य विषयक स्थिती’ या विषयावर आधारित तीन दिवसीय परिषदेची दिनांक ६/११/२०१५ रोजी सांगता झाली. या प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्रीयुत कुणाल कुमार प्रमुख पाहुणे म्हणून आणि उपकुलगुरू प्रो. वंदना चक्रवर्ती, प्रो.बलेझा इटली, प्रो. आर. बी. सिंग, भूगोल विभागप्रमुख प्रो. नगराळे, प्रो. देवरे इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

पर्यावरणाची हानी ही सध्याच्या काळातील ज्वलंत समस्या आहे. जोडीला हवामानाचे असंतुलन आणि लोकसंख्येचा प्रश्न आहेच. या सर्वच बाबींचा उहापोह या परिषदेमधे करण्यात आला.

अमेरिका, भारत, इंग्लंड, रशिया, जपान, इस्त्रायल अशा विविध देशातील अभ्यासकांनी या परिषदेमधे भाग घेऊन परिषदेचे उदिष्ट पूर्ततेस नेले.

एस.एन.डी.टी.कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. वाय. शितोळे यांनी स्वागत केले. प्रो. देवरे यांनी तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा अहवाल सादर केला. या परिषदेमधे एकूण १२० शोधनिबंध सादर केले गेले आणि १९२ अभ्यासकांनी सहभाग घेतला. पैकी ७ आंतरराष्ट्रीय अभ्यासक होते.

पुणे महानगपालिकेचे आयुक्त कुणालकुमार यांनी स्मार्ट सिटी समोरील आव्हाने विशद केली, परंतु त्यावर मात करण्याचा निर्धारही व्यक्त केला. नागरिकांनी त्यांच्या सूचना जरूर द्याव्यात असे आवाहनही या प्रसंगी केले. उत्तम संरचना म्हणजे केवळ स्मार्ट सिटी नसून उत्तम नागरिकत्व म्हणजे स्मार्ट सिटी असेही त्यांनी नमूद केले. उपकुलगुरू प्रो. वंदना चक्रवर्ती यांनी या परिषदेच्या संपन्नतेबाबत समाधान व्यक्त केले. पर्यावरण विषयक समस्यांवर अनेक उपाययोजना या परिषदेमधून निष्पन्न झाल्या असणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भूगोल विभागाचे प्रमुख प्रो. नगराळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे अत्यंत प्रभावी सूत्रसंचालन प्रा. दत्तात्रय तापकीर यांनी केले.