सिनेमा १०० वर्ष - एक प्रवास

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ जुलै २०१५

सिनेमा १०० वर्ष  - एक प्रवास | Cinema 100 Varsha - Ek Pravas

‘मोरया मोरया’ च्या गजरात कार्यक्रम संपला! आणि टाळ्यांचा कडकडाट सुरु झाला! पहिले मराठी विश्व साहित्य संमेलनाच्या opening ceremony ला प्रेक्षकांचा हा प्रतिसाद होता.

महाराष्ट्रापासून ८००० मैल लांब ह्या परप्रांतात अस्स्ल मराठीपण जागवणारी विठूच्या गजरात चाललेली दिंडी त्यांनी नुकतीच पाहिली होती. अंबाबाईचा बेभान करणारा जोगवा पहिला होता. रंगमंचावर खास मराठी मंगळागौरीचा सण साजरा केलेला पाहिला होता. आपण Bay Area, California मध्ये आहोत ह्यावर त्यांना विश्वासच वाटेना. हातचं न राखून त्यांनी कार्यक्रमाची भरपूर प्रशंसा केली आणि यातून मिळालेले यश आणि आत्मविश्वासाची पुंजी घेऊन मोनिका मुटाटकर यांच्या Mudra Performing Arts ची घोडदौड चालु झाली. ‘धमाल चिंटूची’, ‘कृष्णरंग’, आपल्या सर्वांचं लाडकं - ‘दुर्गा झाली गौरी’ हे नृत्यनाटक असे एकामागून एक कार्यक्रम Houseful झाले!

अजय - अतुल यांच्या गाण्यांवर आधारित ‘नटरंग’ तर लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला आणि पुन्हा प्रयोग करण्यास भागच पाडलं! पुढचं पाऊल सिमोलंघनाचं! ‘जमेका’ च्या Indian Cultural Society ने आमंत्रण दिलं आणि अवघ्या नऊ मुलींना घेऊन मोनिका मुटाटकर यांनी जमेकाच्या Indians ना Classical पासून लावणी, भांगडा, Bollywood अफलातून नृत्यांची मेजवानीच खिलवली!

हा प्रवास चालू असतांनाच मराठी सिनेमा शतक महोत्सव सुरु झाला! या शतकाच्या प्रवासावरच एक कार्यक्रम बसवावा अशी कल्पना आली... आणि तयारी सुरु झाली. गेले काही महिने कलाकार अविश्रांत मेहनत घेत आहेत, १७ जून २०१५ रोजी ‘बे एरिया’ मध्ये आणि ३ जुलै रोजी बृहन महाराष्ट्र मंडळाच्या २०१५ च्या Los Angeles च्या Convention Center मध्ये ‘Cinema 100 Varsha - एक प्रवास’ हा कार्यक्रम सादर होत अहे. कार्यक्रमाची ‘Concept & Choreography’ आहे मोनिका मुटाटकर यांची तर सूत्रसंचालन करतील आपल्या खुमासदार शैलीत श्रीयुत प्रशांत दामले!

दोन तासांच्या अवधीत १०० वर्षाचा प्रवास दाखवणं मुश्किलच पण त्यातून वेचून वेचून काही गाणी नृत्याच्या माध्यमातून सादर केली जातील. अनेक दिग्गज संगीतकारांचे व कलाकारांचे ऋण मानून प्रशांत दामले आपल्याला काही खास किस्से आणि गाणी ऎकवतील. दादासाहेब फाळके ते सिनेसृष्टीतल्या अगदी अलीकडच्या काळातल्या गाजलेल्या व्यक्ती, गाणी आणि नृत्यावर आधारलेला हा कार्यक्रम प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करनार यात शंकाच नाही.