प्रसाद कुमठेकर लिखीत बगळा कादंबरीचे प्रकाशन

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ नोव्हेंबर २०१६

प्रसाद कुमठेकर लिखीत बगळा कादंबरीचे प्रकाशन | Bagala Book Launch at Dadar - Mumbai

छबिलदास सभागृह दादर येथे महेश लीला पंडित यांच्या पार प्रकाशन संस्थेतर्फे प्रसाद कुमठेकर लिखीत ‘बगळा’ या कादंबरीचे प्रकाशन जयंत पवार, कृष्णा किंबहुने, मीनाक्षी पाटील आणि गणेश वसईकर यांच्या हस्ते करण्यात आले.

‘वनवास’ या कांदबरीनंतरच्या प्रदीर्घ कालावधीनंतर लहान मुलांचे भावविश्व चितारणारी, बोलीभाषेचा नेटका आणि समर्थं वापराने वाचकांना एका वेगळ्या जीवनाचा अनुभव देणारी ही कादंबरी म्हणून आपण ही कादंबरी प्रकाशित करीत असल्याचे पार प्रकाशनाचे महेश लीला पंडित यांनी सांगितले. सुरवातीला पटकथा म्हणून लिहिलेल्या या संहितेत कादंबरीची सखोलता आणि पात्राची वैशिष्ट्यपूर्ण रचना यातून उलगडत जाणारे लहान मुलांचे मराठी साहित्यात अभावानेच आढळणारे भावविश्व ‘बगळा’ या संहितेत आढळल्याने आपण प्रसाद कुमठेकरकडून या कादंबरीचे लेखन करून घेतल्याचे महेश लीला पंडित यांनी सांगितले.

कादंबरीची वेगवेगळी वैशिष्ट्ये अधोरेखित करीत कृष्णा किंबहुने यांनी ‘बगळा’ या कादंबरीचे कादंबरीचा निवेदक हे बहू असून या अनेक निवेदकाच्या वेगवेगळ्या दृष्टीमुळे, त्यांच्या अभिव्यक्त होण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे ही कादंबरी वैशिष्ट्यपूर्ण झाली आहे. एरव्ही लहान मुलांच्या भावविश्व चिरंतरताना एकच निवेदक असणाऱ्या मराठी कादंबरीत असे अनेक निवेदक असणे या ‘बगळा’ कादंबरीच्या निमित्ताने पहिल्यांदाच घडत आहे असे सांगून कादंबरीतून व्यक्त झालेले लहान मुलांचे भावविश्व, त्यांची निरागसता, बोलीतील लकबी, समाजातील विशिष्ट चालीरीती, शिक्षणातील दूराव्यवस्था या साऱ्याचे अगदी नितळतणे या कादंबरीतून दर्शन घडते असे त्यांनी सांगितले.

उदगीर प्रदेशातील बोली घेऊन वेगवेगळ्या निवेदकाद्वारे विकसित होणारी ही कादंबरी लहान मुलांची निरागसता व्यक्त करतेच आणि प्रकाश नारायण संत यांच्या लंपन आणि आर. के. नारायण यांच्या स्वामी या पात्रानंतर मराठीत ‘चिंत्या’ नावाच्या मुलाचे तसेच त्याच्या सभोवतीच्या अनेक मुलांचे भावविश्व समर्थपणे उदगीर भागातील बोलीतून आणि मुलांच्या भाषेतून व्यक्त करते आणि लेखकाच्या ठायी असलेली निरागसता पात्राच्या स्वभाव वैशिष्ट्यात पाहायला मिळते. कादंबरीतल्या पात्रांचा असलेल्या प्रामाणिकपणा हे कादंबरीचे विशेष असल्याचे सांगून त्यामुळे ‘बगळा’ ही कादंबरी सभोवतालच्या बऱ्या - वाईट वैशिष्टांना आपल्यात सामावून घेऊ शकली आहे आणि हे या कादंबरीचे यश आहे, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष, नाटककार, कथालेखक जयंत पवार यांनी सांगितले.

कवयित्री मीनाक्षी पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कादंबरीचे लेखक प्रसाद कुमठेकर यांनी ‘बगळा’ या कादंबरीतील उताऱ्याचे वाचन केले. कवी, समीक्षक गणेश वसईकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी प्रसाद कुमठेकर यांचे सिनेसृष्टीतील अनेक मित्र उपस्थित होते.