ओम पुरी - सशक्त अभिनेता काळाच्या पडद्याआड

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ जानेवारी २०१७

ओम पुरी - सशक्त अभिनेता काळाच्या पडद्याआड | Actor Om Puri Passes Away

ओम पुरी - सशक्त अभिनेता काळाच्या पडद्याआड [Actor Om Puri Passes Away] - लुधियानामध्ये एका चहाच्या टपरीवर चहाचे कप विसळणारा हा अनाथ मुलगा...

कॉलेजात प्रवेश घेतल्यावर नाटकात काम करु लागला. कॉलेजातच लॅब असिस्टंट म्हणून नोकरी करायचा.

शिक्षण, नाटक आणि नोकरी करायचा.नाट्यस्पर्धेच्या दिवशी त्याला सुटी मिळाली नाही. विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना विनंती केली आणि त्याला सुटी मिळाली. त्या स्पर्धेत त्याला पारितोषिक मिळालं. परिक्षकांनी सल्ला दिला दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण घे. आपल्या गुणांचं चीज कर.

पण खर्च कसा करू? ओमचा प्रश्न होता.

ते स्टायपेंड देतात त्यात भागेल तुझं पण प्रवेशासाठी कसून मेहनत कर, परीक्षक म्हणाले. इब्राहिम अल्काझी संचालक होते. त्यांनी ओम पुरीला प्रवेश दिला. तिथलं शिक्षण इंग्रजी भाषेत होतं. अल्काझी ओमला म्हणाले, तू हिंदीमध्येच प्रश्न विचार आणि हिंदीमध्येच बोल. इंग्रजीचं दडपण घेऊ नकोस.

तिथे त्याची भेट झाली नसीरुद्दीन शहाशी. घट्ट मैत्री झाली.

‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ चं शिक्षण पूर्ण झाल्यावर नसीरुद्दीने फिल्म इन्स्टीट्यूटमध्ये प्रवेश घेतला. त्याने ओमला कळवलं तूही या संस्थेत शिकायला ये. कर्ज काढ, उधारी कर किंवा चोरी पण तू इथे यायलाच हवं.

आर्थिक ओढगस्त असतानाही ओमने फिल्म इन्स्टीट्यूटमध्ये प्रवेश घेतला.

चित्रपटात काम मिळवण्याची उमेदवारी करताना शबाना आझमी या दोघांकडे पाहून म्हणाली, “अशी थोबाडं असणारे कसे हिरो होणार हिंदी चित्रपटात...”

मात्र अभिनयात ते अव्वल होते.

त्यावेळी हिरोच्या कल्पना वेगळ्या होत्या. अमिताभने गुलछबू, सुंदर चेहेर्‍याच्या, केसांचा कोंबडा ठेवण्याच्या हिरोंच्या कल्पनांना छेद दिला होता. आम्ही कोणत्याही भूमिका साकार करायचा कारण आम्हाला आमचा चेहेरा नव्हता. म्हणजे व्हायचं असं की आम्ही कोणत्याही भूमिकेत फिट्ट बसायचो. तीच आमची शक्ती होती.

याच शक्तीच्या जोरावर आम्ही नावारुपाला आलो, असं ओम पुरी सांगायचा. ओम पुरीचा आवाज, वाक्याची फेक खास होती.

हिंदी सिनेमा, हिंदी नाटक यावर आपला ठसा त्याने उठवला आणि हॉलीवूडच्या चित्रपटांमध्येही काम केलं.

गोविंद निहलानी, श्याम बेनेगल या दोन दिग्दर्शकांनी ओम पुरीच्या अभिनय गुणांचा पुरेपुर उपयोग केला. त्यांचा तो फेवरिट म्हणण्यापेक्षाही हक्काचा अभिनेता होता. श्याम बेनेगलच्या भारत की खोज या अजरामर मालिकेत, ओम पुरीने अनेक भूमिका साकारल्या आहेत. त्याने उभा केलेला ‘सम्राट अशोक’ कायमचा ध्यानी राहतो.

‘मालामाल विकली’ या चित्रपटात त्याने केलेली विनोदी भूमिकाही थोर आहे. विनोदी भूमिका समर्थपणे करणारा अभिनेताच सदासर्वकाळ स्मरणात राहतो.

ओम पुरीच्या स्मृतींना अभिवादन.