॥ बडव्यांना उद्देशून ! ॥
मुर्दाड मृतात्म्यांना आवाहन
करणाऱ्या समस्त मलमली बडव्यांनो
जिवंत आत्मयाची वाणी तुम्ही ऐकलीय काय ?
चंदेरी पुण्याच्या गाठीसाठी गंगेची ओंजळ
तर्पण करणाऱ्या भांगखाऊ भगीरथांनो
आमचे आकाशभर अश्रू तरी तुम्हाला पुरतील काय ?
आकाशातील सुष्ट दुष्ट ग्रहगोलांना
नितंबू स्तुतीने वश करणाऱ्या भाटांनो
काळोखात डुंबलेला `मानव्याचा सूर्य' तुम्हाला दिसेल काय ?
कुठल्या शिंच्यान निर्मिलेल्या स्वर्गी झरणाऱ्या क्षीरनद्यांची
लाळघोटी स्वप्ने पाहणाऱ्या भ्रमिकांनो
या शामल धरणीचा तुम्ही कलकत्ती नर्कच केलात ना ?
संतानीही तुमच्या विटाळावर टाळाची मात्रा सांगून
अखेर त्यांनाही आपल्याच चरणी झुकवल ना
ज्यान त्यान पायरीन राव्ह हेच तुम्ही दावलत ना !
यालाच म्हणतात निखळ सत्य !
कारण `सत्यापरता नाही धर्म
सत्य हेच परब्रह्म' |