॥ मानुस्मृती ॥
आज मी गद्दार-आलोय तुमच्या विध्वंसक वेदांशी
भंडाफोड गीतेशी आणि पाणवट पुराणांशीही
हजारो नर्क कोसळले तरी ना हरकत !
अशाअंशाने चुकता करणार मी हिशोब
संस्कृतीतल्या हरेक दलालीचा !
मनूच्या वारसदारंनो बुब्बळे बाहेर काढू नका
घामेजलेले टाचा तळवे उगा उराशी बडवू नका
तुमच्याच अवलादीतलं नव बेण
(तिन्ही लोकातला श्रेष्ट ब्राम्हण ? )
नवी स्मृती घडवीत आहे
मानुस्मृती सांगत आहे --- घ्या लिहून !
इथून पुढे विषमतेच्या साक्षीला
परमात्मा तुमचा धावणार नाही
अन्यायाच्या उद्यापनाला
सत्यनारायण पावणार नाही
माणसाला मारुन
कुठलाही प्राणी भजणार नाही
वसुधैव कुटुंबकम सांगून
`राजवाडा' मांडणार नाही
चातुर्वर्ण्याला मान तुकवून
खोट समर्थन सांगणार नाही
माणूसकीची पिंड, न्यायाचा अभिषेक आणि समतेचे स्तोत्र
उद्या जगाल आणि लावाल `मानुस्मृतीच' नव गोत्र |