मनाचे श्लोक - श्लोक ९७

प्रकाशन: संपादक मंडळ | ३० एप्रिल २००८

मनाचे श्लोक - श्लोक ९७ | Manache Shlok - Shlok 97

मनाचे श्लोक - श्लोक ९७ - [Manache Shlok - Shlok 97] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ९७


मुखी नाम नाहीं तया मुक्ति कैंची ।
अहंतागुणे यातना ते फुकाची ॥
पुढे अंत येईल तो दैन्यवाणा ।
म्हणोनि म्हणा रे म्हणा देवराणा ॥९७॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


न यद्वाचि रामः कथं तस्य मुक्ति ।
रहंतावशो दुःखमान्पोति मर्त्यः ॥
ततो देहनाशे महद्दुःखमेती ।
त्यतो ब्रूत रे ब्रूत रामं सुरेशम्‌ ॥९७॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात की, माझे घर, माझी शेती, माझा प्रपंच, अशा रीतीने माझे-माझे करण्याने व्यर्थ दुःख होते व मरणसमयी यातले काही एक उपयोगी पडायचे नाही. असा विचार करून अहोरात्र प्रपंचात गुंतलेल्या मनाला काही प्रहर तरी तेथून काढून नामस्मरणाकडे लावावे ! ज्याच्या मुखी राम नाही, त्याच्या अंतरी तरी भगवंत कोठून येणार आणि त्याला मुक्ती तरी कशी मिळणार?

कोणाचें हे घर कोणाचा संसार ।
सांडुनी जोजार जाणें लागे ॥ १ ॥

जाणें लागे अंती येकलें सेवट ।
वेर्थ खटपट सांडुनीयां ॥ २ ॥

जन्मवरी देहे संसारी गोविलें ।
नाहीं कांही केलें आत्महित ॥ ३ ॥

आत्महित गेलें संसाराचे वाढी ।
अंती कोण सोडी रामेंवीण ॥ ४ ॥