मनाचे श्लोक - श्लोक ९६

प्रकाशन: संपादक मंडळ | २९ एप्रिल २००८

मनाचे श्लोक - श्लोक ९६ | Manache Shlok - Shlok 96

मनाचे श्लोक - श्लोक ९६ - [Manache Shlok - Shlok 96] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ९६


महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळीं ।
जपे रामनामावळी नित्यकाळीं ॥
पिता पापरुपी तया देखवेना ।
जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना ॥९६॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


हरेर्नाममंत्रं जपान्नादरेण ।
परां निर्वृतिं दैत्यवर्यः प्रपेदे ॥
पिता तस्य तन्नैव सेहे दुरात्मा ।
जगत्यां स दीनो वदेद्यो न रामम्‌ ॥९६॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात. ज्यांचा नामस्मरणावर विश्वास नाही, ते दैत्यच होत. प्रत्यक्ष दैत्य हिरण्यकशिपु याच्या पोटी जरी प्रल्हाद जन्मास आला होता तरी लहानपणापासूनच त्याचे लक्ष ईश्वरचरणी लागले होते. हिरण्यकशिपुने जेव्हा प्रल्हादाला मोठ्या प्रेमाने विचारले की, ‘बाळा, तुला शाळेत पंतोजीने काय शिकवले ?’ यावर प्रल्हादाने उत्तर दिले की, ‘श्रवणं कीर्तनं विष्णो : स्मरणं पादसेवनम् । अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ॥’. झाले ! हिरण्यकशिपुच्या मनाने घेतले की शाळेतील शिस्त बिघडली. तो गुरुपुत्रांना अद्वातद्वा बोलला. प्रल्हादाची ही नैसर्गिक मति आहे, असे गुरुपुत्र म्हणत. ते हिरण्यकशिपुला अजिबात पटेना. त्याने शाळेला जास्त शिस्त लावली, तरी प्रल्हादाची भगवद्भक्ति कमी होत नाही, असे पाहून प्रल्हादाचा त्याने आतोनात छळ केला. तथापि प्रल्हाद भक्तिमार्गापासून लवमात्रसुद्धा ढळला नाही. अखेरीस बापाने मुलाला स्वतः ठार मारण्याच्या इच्छेने आणविले. ‘मूर्खा, मजवाचून दुसरा कोण जगन्नायक आहे, तो सर्वत्र आहे म्हणतोस तर या खांबात आहे काय ?’ अशी हिरण्यकशिपुने गर्वोक्ति केली. ‘होय, आहे’ असाच जबाब प्रल्हादाने दिला. ‘कार्ट्या, हा मी तुला ठार करितो आणि खांबातील तुझा हरि तुझे रक्षण कसे करितो ते पाहतो’ असे त्वेषाने म्हणून हिरण्यकशिपुने खांबावर जोराने मुष्टिप्रहार करताच भगवान श्रीहरि नृसिंहरूप धारण करून त्या स्तंभाचे ठिकाणी प्रकट झाले. भक्तकैवारी भगवान दासाची कधीही उपेक्षा करत नाहीत, हे दाखविण्यासाठी श्रीसमर्थांनी पुढील श्लोक १२१ यात या कथेचा पुढील अन्वय आणला आहे. श्रीमत् भागवत, सप्तम स्कंध अध्याय ५ ते १० यात प्रल्हादाचा जो कथाभाग आलेला आहे, तो प्रत्येक बालाने अवश्य प्रेमाने वाचावा.

हरिभक्त येक जाहाला प्रल्हाद ।
जयाचा गोविंद कैवारी ।
कैवारी हरि राखे नानापरी ।
ऐसा भाव धरीं आलया रे ॥