मनाचे श्लोक - श्लोक ९०

प्रकाशन: संपादक मंडळ | २३ एप्रिल २००८

मनाचे श्लोक - श्लोक ९० | Manache Shlok - Shlok 90

मनाचे श्लोक - श्लोक ९० - [Manache Shlok - Shlok 90] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ९०


न ये राम वाणी तया थोर हाणी ।
जनीं व्यर्थ प्राणी तया नाम कोणी ॥
हरीनाम हें वेदशास्त्रीं पुराणीं ।
बहू आगळे बोलिली व्यासवाणी ॥९०॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


प्रगल्भाऽपि वाड्नामहीना विनष्टा ।
वदेदर्थवादं हरेर्नाम्नि सोऽज्ञः ॥
हरेर्नाम सद्वर्णितं वेदशास्त्रैः ।
पुरोणेष्वपि ख्यापितं वेदवाक्यैः ॥९०॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ आपल्या सर्वांना बजावत आहेत की, ज्याच्या मुखी रामनाम येत नाही, तो आपण होऊन आपला मोठा घात करून घेत आहे.

जगामध्ये ज्याचा जन्म निरर्थक आहे, अशाच मनुष्याला नाम हे तुच्छ वाटते, किंवा नामस्मरणाचे त्यास कष्ट वाटतात. थोडक्यात, ज्याला नामस्मरण तुच्छ किंवा क्लेशदायक वाटते, अशा मनुष्यचा जन्म निरर्थकच समजावा.

काणी म्हणजे तुच्छ.

“हरिनाम हे बहु आगळे (आहे अशी) वेदशास्त्री पुराणी व्यासवाणी बोलली (आहे)” असा अन्वय करूम कोणी अर्थ करतात. परंतु वेदशास्त्रे ही काही व्यासप्रणीत नाहीत अशी शंका घेऊन “वेदशास्त्रे हरिनाम हे बहु आगळे (आहे अशी) पुराणी व्यासवाणी बोलली (आहे)” असा अन्वय दुसरे काही लावतात. यावर पहिल्यांचे म्हणणे असे की, इतके बारीक भेद करण्यासाठी समर्थांना वेळ नव्हता. व्याकरणादिकांचे नियम त्यांना बाधक होत नसत. त्यांचा जो कवित्वाचा प्रवाह चाले, तो पाहून व्याकरणाने वाटल्यास आपले नियम बदलावे, आणि म्हणून व्यासवाणी पुराणापुरतीच घ्यावी म्हणजे झाले.