MarathiMati.com - Android App on Google Play Store

मनाचे श्लोक - श्लोक ८८

प्रकाशन: संपादक मंडळ | २१ एप्रिल २००८

मनाचे श्लोक - श्लोक ८८ | Manache Shlok - Shlok 88

मनाचे श्लोक - श्लोक ८८ - [Manache Shlok - Shlok 88] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

श्लोक ८८


बहू चांगले नाम या राघवाचे ।
अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे ॥
करी मूळ निर्मूळ घेता भवाचे ।
जिवां मानवां हेंचि कैवल्य साचें ॥८८॥समर्थ रामदास स्वामी

संस्कृत रुपांतर


अतीवोत्तमं सुंदरं स्वल्पवर्णं ।
सुलभ्यं सुखं रामचंद्रस्य नाम ॥
जनैः कीर्तमानं भवध्वंसकं य ।
त्तदेवेह कैवल्यरुपं नराणाम्‌ ॥८८॥समर्थ रामदास स्वामी

अर्थ


श्रीसमर्थ अत्यंत कळवळीने आपल्या सर्वांना बोध करवून देत आहेत की, “राम” ही दोन अक्षरे किती चांगली आहेत ! ही दोन अक्षरे अत्यंत गोड असून, थोडक्यात आहेत, सोपी आहेत आणि विशेष म्हणजे फुकटचीही आहेत !

श्रोता प्रश्न करतो की यापेक्षा जास्त या नामाचे काही वैशिष्ट्ये नाहीत काय ? या अक्षरांचे इतकेसेच महत्त्व असेल, तर मग यात विशेष काही नाही. वक्ता उत्तर देतो की, आम्ही पहिल्या दोन चरणांत सांगितलेले गुण तर या नामात आहेतच, पण याचा अत्यंत महत्त्वाचा गुण म्हणजे, हे नाम जो अखंडपणे स्मरतो, त्याची जन्ममरणाच्या फेऱ्यांमधून कायमची सुटका होते.

रामनाम घेतले असता भवाचे, म्हणजे जन्माचे मूळ जी वासना, त्याचे निर्मूलन नाम करते. आणि याचसाठी आम्ही म्हणतो की, रामनामस्मरण हेच आमचे खरे कैवल्यधाम होय ! हाच आम्हाला लाभलेला मोक्ष होय !

सोपें सुगम हें नाम राघवाचे ।
सर्व काळ वाचे येवों द्यावें ।
येवों द्यावें वाचे नाम निरंतर ।
तेणे हा संसार तरीजेले ।
तरीजेल नामी रामदास म्हणे ।
सावधान होणें रामनामीं ॥

MarathiMati.com - Android App on Google Play Store