मनाचे श्लोक - श्लोक ८०

प्रकाशन: संपादक मंडळ | १३ एप्रिल २००८

मनाचे श्लोक - श्लोक ८० | Manache Shlok - Shlok 80

मनाचे श्लोक - श्लोक ८० - [Manache Shlok - Shlok 80] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ८०


धरा श्रीवरा त्या हरा अंतराते ।
तरा दुस्तरा त्या परा सागराते ॥
सरा वीसरा त्या भरा दुर्भराते ।
करा नीकरा त्या खरा मत्सराते ॥८०॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनःसंश्रय श्रीशमुत्सृज्य भेदं ।
तराद्यैव संसारदुष्पारवार्धिम्‌ ॥
प्रहेयस्त्वया दुर्भरः काम एषः ।
खरो मत्सरः सर्वथा दंड्य एव ॥८०॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


येथे ‘श्रीवर’ म्हणजे सीतापति श्रीराम. ‘हरा अंतरातें’ म्हणजे महादेवांच्या हृदयात वसलेला श्रीराम. श्रीसमर्थ येथे मनाला शिकवण देत आहेत की, महादेवांच्या अंतरात वसत असलेल्या श्रीरामाला धर, त्याला आपल्या हृदयात अखंड साठव, त्याला आपलासा कर.

श्रीरामाला अखंड स्मरून, तरून जाण्याला कठीण म्हणजे दुस्तर असलेला जो पर, म्हणजे फार मोठा प्रपंचरूपी सागर, त्याला तरून जा.

दुर्भर म्हणजे भरण्यास कठीण, कितीही भरले तरी जे भरतच नाही, असे जे पोट ते भरा, पण सारखे आपले त्या पोटाच्याच नादी लागू नका. त्यापासून सरा म्हणजे मागे हटा, अलिप्त राहून त्याला विसरा.

संसार सुखें करावा ।
परी कांही परमार्थ वाढवावा ॥

खर म्हणजे गर्दभ, तद्रूप जो मत्सर त्याला नीकरा करा, म्हणजे त्याच्याशी हट्टाने झगडून त्याचा समूळ नाश करा. या मत्सराच्या योगाने आपण सत्य ते असत्य व असत्य ते सत्य मानीत असतो. यासाठी बुद्धिभ्रंश करणारा मत्सर टाकून देऊन, साधुसंतांनी आखून दिलेल्या मार्गावर जा, असे समर्थ आपल्याला सांगत आहेत.