मनाचे श्लोक - श्लोक ७७

प्रकाशन: संपादक मंडळ | १३ एप्रिल २००८

मनाचे श्लोक - श्लोक ७७ | Manache Shlok - Shlok 77

मनाचे श्लोक - श्लोक ७७ - [Manache Shlok - Shlok 77] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ७७


करी काम निष्काम या राघवाचे ।
करी रुप स्वरुप सर्वां जिवांचे ॥
करि छंद निर्द्वद्व हे गुण गातां ।
हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होतां ॥७७॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


अकामो हियो रामकांर्य करोति ।
स्वतुल्यं नरं राघवस्तं करोति ॥
हरिद्वंद्दःखाद्विमुक्तं करोति ।
स्वंकीर्तने प्रीतिविश्वासयुक्तम्‌ ॥७७॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ सांगतात, एका श्रीरामाची इच्छा केली, श्रीरामचरणांचा मनाने सारखा ध्यास घेतला की भक्त निष्काम होतो, त्याच्या सर्व इच्छा नाहीशा होतात किंवा सर्व इच्छा पूर्ण होऊन तो निष्काम होतो.

मुखीं राम त्या काम बाधूं शकेना ।

आणि कामाची तंगडी मोडली म्हणजे मग कामापासून होणारे सर्वच अनर्थ आपोआप टळतात. राघवाचे ध्यान हृदयामध्ये एकदा ठसावले म्हणजे भक्ताला सर्वत्र राम भरलेला दिसतो, त्याची दृष्टी जिथे जाईल, तिथे त्याला फक्त रामच दिसतो.

पहा पहा या जगांत राम आहे रे ।
राम आहे राम आहे राम आहे रे ॥

याचा त्याला अनुभव येतो, रिता ठाव या राघवेवीण नाहीं । हे त्याच्या प्रत्ययास येते,

माझा राम अवघाचि आपण ।
दुसरें नाही त्याची च आण ॥

असे तो प्रतिज्ञापूर्वक म्हणू लागतो. राघवाचे गुण गात गात हरिकीर्तनाच्या ठिकाणी वृत्ती स्थिर होऊन श्रीरामाच्या गुणानुवादाचा भक्ताला जो छंद लागतो तेणे करून भक्त निर्वैर होतो.