मनाचे श्लोक - श्लोक ७४

प्रकाशन: संपादक मंडळ | १२ एप्रिल २००८

मनाचे श्लोक - श्लोक ७४ | Manache Shlok - Shlok 74

मनाचे श्लोक - श्लोक ७४ - [Manache Shlok - Shlok 74] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ७४


बहुतांपरी संकटे साधनांची ।
व्रते दान उद्यापने ती धनाची ॥
दिनाचा दयाळू मनी आठवावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७४॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


तपःपूर्वके साधने देहकष्टं ।
धनेनैव दानं व्रतोद्यापनं च ॥
कृपालुः सदा दीनजीवेषु योऽसो ।
प्रभाते हृदा राघवश्र्चिंतनीय ॥७४॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून बोध करवून देत आहेत की, तीर्थयात्रादि इतर साधने सोपी नाहीत. त्यावेळी काशी यात्रा दुर्घट होती. आज ती दुर्घटता काशीयात्रेत नसली तर मानससरोवर दर्शनात आहे. त्यात नसली तर पलीकडच्या यात्रेत आहे. तसे व्रते, उद्यापने किंवा दानधर्म करणे ही पैशांची कामे आहेत. ती निर्धनाच्या हातून होणार नाहीत. ज्यात श्रम नाहीत, साहस नाही, द्रव्यादिकांची अपेक्षा नाही, असे सर्वांना सुलभ वाटणारे परमार्थाचे साधन म्हटले म्हणजे दीन दयाळ प्रभु श्रीरामचंद्र यांचे अखंड नामस्मरण होय.

यासी नचले कांही विघ्न ।
कोण्ही हि न करूं शके भग्न ।
म्हणौनि नारदादि सर्वज्ञ ।
परी नामीं च रमोनि राहिले ॥

पण हे साधन खरोखरच का इतके सोपे आहे आणि ते जर का इतके सोपे आहे, तर त्याचा आश्रय करून सर्व जीव आपला उद्धार का करून घेत नाहीत ? साधन सोपे आहे याचा अर्थ त्यात कष्ट नाहीत इतकेच, परंतु ते घोर तपश्चर्या व निष्ठा यावाचून कोणास साधत नाही. चारी अवस्थात अखंड नामस्मरण होणे काय सोपे आहे ? एक तरी अवघड यात्रा करवतील व व्रतादिकांसाठी शरीर कष्टवून वित्तोपार्जन करून उद्यापने ही होतील, पण अखंड नामस्मरण होणार नाही !

श्रीसमर्थांचे वडील बंधू तर म्हणतात,
सुलभ व्रत तप दान दमन ।
सुलभ तीर्थाटण वेदाध्ययन ।
सुलभ यज्ञ व्याकरणाभ्यासन ।
हरिभक्ति अति दुर्लभा ॥