मनाचे श्लोक - श्लोक ७०

प्रकाशन: संपादक मंडळ | ८ एप्रिल २००८

मनाचे श्लोक - श्लोक ७० | Manache Shlok - Shlok 70

मनाचे श्लोक - श्लोक ७० - [Manache Shlok - Shlok 70] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ७०


सदा रामनामे वदा पुर्णकामें ।
कदा बाधिजेना ऽऽ पदा नित्य नेमें ॥
मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७०॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो ब्रूहि रामं सदा कामपुरं ।
न वै बाध्यसे दुःखजालैः कदापि ॥
मदालस्यामाशु त्वया संप्रहेयं ।
प्रभाते हृदा राघवश्र्चिंतनीयः ॥७०॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून सांगत आहेत की, पूर्णकामे हे ‘रामनामे’ चे विशेषण आहे. पूर्णकामे म्हणजे ज्यांच्या योगाने कामना पूर्ण होतात अशी.

ठाईं पाडी राम जीवांचा विश्राम ।
तेणें सर्व काम पूर्ण होती ॥

बाधिजेना + आपदा.

आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम् ।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥

जी साधने करावयाची, ती नित्य नियमाने करीत गेल्यास संकटांची बाधा येत नाही.

परमेश्वराची अनंत नामें ।
स्मरतां तरिजे नित्य नेमें ।
नामस्मरण करितां येमें ।
बाधिजेना ॥

मद + आलस्य = गर्व आणि आळस.

थोर आयुष्य मोलाचें ।
मदें वेर्थ चि नासिलें ॥

असा आयुष्याचा नाश करणारा गर्व न करावा. मोठेपणाची घमेंड सोडून लहानाबरोबर लहान होऊन अखंड श्रीरामनामस्मरण करावे ! नित्य नियमाला दुसरे विघ्न आळसाचे, तो आळसही सर्वथा त्यजावा.

येकाग्र करूनियां मन ।
बळें चि धरावें साधन ।
येत्नीं आळसाचें दर्शन ।
होऊं च नये ॥