मनाचे श्लोक - श्लोक ७

प्रकाशन: संपादक मंडळ | ७ फेब्रुवारी २००८

मनाचे श्लोक - श्लोक ७ | Manache Shlok - Shlok 7

मनाचे श्लोक - श्लोक ७ - [Manache Shlok - Shlok 7] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ७


मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे ।
मना बोलणे नीच सोशीत जावें ॥
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे ।
मना सर्व लोकांसि रे नीववावें ॥७॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो धार्ममार्येषु मार्गेषु धैंर्य ।
मनो हीनपुंसो वच: ज्ञाम्यमेव ॥।
मनोज्ञैस्त्वया शीतलैर्वाक्प्रबंधै: ।
मन: सर्वदा सज्जनास्तोषणीया: ॥७॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


आघातीं उपजे धारिष्ट । ते श्रेष्ठ धारिष्ट होय. इथे समर्थ मनाला अधिक कणखर व्हायला सांगून त्याला आपली सहनशक्ती वाढवण्यास सांगत आहेत. धारिष्ट म्हणजे मनोधैर्य. खचलेलं मन पुरुषार्थ करण्यास कधीही साथ देत नाही.

नीच बोलणे सोशीत जावे हे सांगण्यात समर्थांचा हा हेतु आहे की, बोलणाऱ्याला नंतर पश्चात्ताप होऊन तो आपलासा होईल. इथे अजून एक अर्थ असा आहे की, लोकांनी केलेली निंदा जर सोसत गेलो, तर मनाची सहनशक्ती दुपटीने वाढते आणि पुढे येईल त्या परिस्थितीला तोंड द्यायची त्याची तयारी होते. याच्या उलट जर सारखे कौतुक झाले, तर मन सोकावते आणि धैर्य नकळत खचते.
धकें चपेटे सोसावे ।
नीच शब्द साहात जावें ।
प्रस्तावोन परावे ।
आपले होती ॥

जगामधें जगमित्र । जिव्हेपासीं आहे सूत्र ॥ असे जाणून आपण स्वतः मात्र, विचारें गोड बोलावें । म्हणजे स्वतः कितीही सोसले तरी बोलताना मात्र आपली वाणी नेहमी गोड असावी. दुसऱ्याच्या दुःखें दुःखवावें । परसंतोषें सुखी व्हावें । प्राणीमात्रांस मिळऊन घ्यावें । बऱ्या शब्दें ॥ वेड्यास वेडे म्हणों नये । वर्म कदापि बोलों नये । तरी च घडे दिग्विजय निस्पृहासी ॥

अशा रीतीने दिग्विजयाकडे लक्ष ठेवून सर्वांना समान लेखून त्यांची संतप्त अंतःकरणे गार करावी. उंच नीच म्हणों नये । सकळांचे निववावें हृदय ॥