मनाचे श्लोक - श्लोक ६४

प्रकाशन: संपादक मंडळ | ३ एप्रिल २००८

मनाचे श्लोक - श्लोक ६४ | Manache Shlok - Shlok 64

मनाचे श्लोक - श्लोक ६४ - [Manache Shlok - Shlok 64] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ६४


अती मूढ त्या दृढ बुद्धि असेना ।
अती काम त्या राम चित्ती वसेना ॥
अती लोभ त्या क्षोभ होइल जाणा ।
अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा ॥६४॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


दृढा नातिबुद्धिर्विमूढस्य पुंसो ।
नचित्तेऽस्ति रामोऽतिकामाकुलस्य ॥
प्रवृत्तेऽतिलोभे भवेद्दैवकोपः ।
प्रसक्तोऽतिभोगेषु दैन्यं प्रयाति ॥६४॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून सांगत आहेत की, विषयवासना प्रबल असलेल्या माणसाकडून श्रीरामचिंतन कधीच घडत नाही. आणि ज्याच्या मुखी अखंड रामनाम चालू असते, त्याला विषयाची बाधा कधीच होत नाही. काम आहे तेथे राम नाही व राम आहे तेथे काम नाही.
मुखीं राम त्या काम बाधूं शकेना ॥ ८७ ॥

लोभाला काही मर्यादा नसते. त्यामुळे दुःखाचे कारण अनावर लोभ, हेच होय.
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्यातें ॥ १६ ॥

जाली विषईं वृत्ति अनावर । दृढ धरिल संसार । परमार्थचर्चेचा विचार । मळिण जाला ॥
मोड घेतला परमार्थाचा । हव्यास धरिला प्रपंचाचा । भार वाहिला कुटुंबाचा । काबाडी जाला ॥
मानिला प्रपंची आनंद । केला परमार्थी विनोद । भ्रांत मूढ मतिमंद । लोभला कांमीं ॥