मनाचे श्लोक - श्लोक ५९

प्रकाशन: संपादक मंडळ | २९ मार्च २००८

मनाचे श्लोक - श्लोक ५९ | Manache Shlok - Shlok 59

मनाचे श्लोक - श्लोक ५९ - [Manache Shlok - Shlok 59] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ५९


मना कल्पना कल्पितां कल्पकोटी ।
नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी ॥
मनीं कामना राम नाही जयाला ।
अती आदरे प्रीती नाही तयाला ॥५९॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


जनः कल्पनां कल्पयन्कोटिकल्पम्‌ ।
समभयेति रामं प्रभुं नैव नैव ॥
धृतश्र्चेतसा येन कामो न रामः ।
कुतस्तस्य सत्संगमे प्रीतियोगः ॥५९॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून आपल्याला कळकळीने समजवीत आहेत की, हे मना, कल्पकोटी कल्पना केल्या तरी काय होणार आहे रे ? नुसती कल्पना करून श्रीरामचरणांचे दर्शन कधी झाले आहे काय ? कल्पनारूपी कामनेचा संपूर्ण क्षय झाल्यावाचून श्रीराम भेटणार नाहीच हे निश्चित होय !

आपुले अनुभवें ।
कल्पनेसी मोडावें ।
मग सुकाळी पडावें ।
अनुभवाचे ॥

निर्विकल्पास कल्पावें ।
कल्पना मोडे स्वभावें ।
मग नसोनि असावें ।
कल्पकोटी ॥

जयाला मनी कामना, तयाला राम नाही व अती आदरें (श्रीरामी) प्रीति नाही. ज्याला श्रीरामावाचून अन्य कामना असते, त्याला श्रीरामदर्शन होत नाही व त्याची श्रीरामाच्या ठिकाणी अनन्य प्रीतिही नसते.