मनाचे श्लोक - श्लोक ५८

प्रकाशन: संपादक मंडळ | २८ मार्च २००८

मनाचे श्लोक - श्लोक ५८ | Manache Shlok - Shlok 58

मनाचे श्लोक - श्लोक ५८ - [Manache Shlok - Shlok 58] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ५८


नको वासना वीषयीं वृत्तिरुपें ।
पदार्थी जडे कामना पूर्वपापें ॥
सदा राम निष्काम चिंतीत जावा ।
मना कल्पनालेश तोहि नसावा ॥५८॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


मनो मास्तु शब्दादिषु प्रीतियोगः ।
पदार्थेषु कामो भवेत्पूर्वपापः ॥
अतो रामचंद्रस्त्वया चन्तिनीयो ।
विकल्पस्य लेशोऽपि तूर्णे प्रहेय: ॥५८॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ आपल्या सर्वांना या श्लोकातून सांगू इच्छितात की, उदासीनता नसली तर वृत्तींचा सारा ओढा विषयांकडे असतो. तो तसा नसावा.

पण, नसावा एवढे म्हणून भागत नाही. पूर्वजन्मार्जित कर्माप्रमाणे पदार्थांच्या ठिकाणी वासना जडत जाते.

यासाठी आता तरी या जन्मात श्रीरामाचे अखंड चिंतन निष्काम बुद्धीने करत जावे.

कामनेचा लेशही नसावा, कल्पनेवाचून कामना अन्य काय आहे ? म्हणून कल्पनालेश म्हणजे कामनालेशच.

कामनेनें फळ घडे ।
निःकाम भजनें भगवंत जोडे ।
फळ भगवंता कोणीकडे ।
महादांतर ॥

नाना फळें देवापासीं ।
आणी फळ अंतरी भगवंतासी ।
याकारणें परमेश्वरासी ।
निःकाम भजावें ॥

भक्तें जें मनीं धरावें ।
तें देवें आपण चि करावें ।
तेथें वेगळें भावावें ।
नलगे कदा ॥