मनाचे श्लोक - श्लोक ५४

प्रकाशन: संपादक मंडळ | २४ मार्च २००८

मनाचे श्लोक - श्लोक ५४ | Manache Shlok - Shlok 54

मनाचे श्लोक - श्लोक ५४ - [Manache Shlok - Shlok 54] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ५४


सदा सेवि आरण्य तारुण्यकाळीं ।
मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी ॥
चळेना मनीं निश्चयो दृढ ज्याचा ।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५४॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


सदाऽरण्यसंस्थो भवेद्यो युवाऽपि ।
विकल्पस्य चित्ते मलो यस्य नैव ॥
दृढः प्रत्ययो यस्य चितत्तान्न याति ।
स धन्योऽस्ति दासो हि सर्वोत्तमस्य ॥५४॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकात सांगतात की, श्रीरामाचा दास आपले तारुण्य सर्वकाळ अरण्याच्या सेवनात घालवतो. अरण्यात एकांत असतो आणि एकांतात चाळणा होऊन ज्ञान प्राप्त होते म्हणून अरण्यवास श्रेष्ठ.

चाळणा करावी सर्वे ।
येकांती राहातां बरें ।
येकांत मानला ज्याला ।
त्याला साधे हळु हळु ॥

संवाद वेवाद होतों ।
वेवादें युद्ध होतसे ।
म्हणोनि लोक सोडावे ।
आरण्य धरिता बरें ॥

असा श्रेष्ठ अरण्यवास वृद्धपणी कोठून होणार ?

देह्याचा भर्वसा नाहीं ।
तारुण्य चळतें जनी ।
वृधापी विटंबे काया ।
रूप विद्रूप होतसे ॥

असे सांगून स्फुट प्रकरणांपैकी नव्या प्रकरणात वृद्धावस्थेच्या आपदा निवेदन करून समर्थ म्हणतात -

ऐसें हें दुःख वृधापीं ।
कळलें पाहिजे जना ।
परत्र साधणें आधीं ।
तारुणीं च उठाउठी ॥

समर्थ म्हणतात -

एवं कल्पितां कल्पेना ।
ना तर्कितां हि तर्केना ।
कदापि भावितां भावेना ।
योगेश्वर ॥

लोक संकल्प विकल्प करिती ।
ते अवघे चि निर्फळ होती ।
जनाची जना लाजवी वृत्ति ।
तेव्हां योगेश्वर ॥

समर्थ म्हणतात की ब्रम्हांड कोसळले असताही ज्याचे मन श्रीरामचिंतना पासून भरकटत नाही असा तो भक्त सर्वोत्तमाचा दास असून जगात सर्वाधिक धन्य आहे.

विषईं धांवे वासना ।
परी तो कदा डळमळिना ।
ज्याचें धारिष्ट चळेना ।
तो सत्वगुण ॥