मनाचे श्लोक - श्लोक ४७

प्रकाशन: संपादक मंडळ | १७ मार्च २००८

मनाचे श्लोक - श्लोक ४७ | Manache Shlok - Shlok 47

मनाचे श्लोक - श्लोक ४७ - [Manache Shlok - Shlok 47] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ४७


मनीं लोचनीं श्रीहरी तोचि पाहे ।
जनीं जाणतां मुक्त होऊनि राहे ॥
गुणीं प्रीति राखे क्रमू साधनाचा ।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥४७॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


ह्रदा चिंतयँल्लोचनाभयां प्रपश्च ।
न्हरिं भकिउतयुक्तो य आस्ते बुधोऽपि ॥
सदा प्रीतिमान्साधने रामभक्तेः ।
स धन्योऽस्ति दासा हि सर्वसर्वौत्तमस्य ॥४७॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ या श्लोकातून सांगत आहेत की, अंतर्बाह्यदृष्टीने जो श्रीरामच पाहतो, श्रीरामावाचून ज्याच्या अंतर्बाह्यदृष्टीला दुसरे काही दिसतच नाही, ज्याचे मन आणि दृष्टी ही राममय झाली आहेत.

असा तो जाणता म्हणजे ज्ञानी असूनही सेव्यसेवकभावाने राहतो. श्रेष्ठ सुगमोपायांत म्हणतात -
माझा राम आवघा चि आपण ।
दुसरें नाही त्याची च आण ।
हें स्थित न मोडतां स्वामीसेवकपण ।
दिधलें ऐसा उधार ॥

“लागे” खोडून समारांत “राखे” लिहिले आहे.

सगुणावरचे प्रेम व साधनाचा क्रम जो राखतो. ज्याच्या दृष्टीला सर्वत्र राम दिसतो आहे, असा जो सिद्ध झाला त्याला आणखी सगुणाची भक्ति व साधनांचे अनुष्ठान कशास पाहिजे, असे कोणी विचारले त्यास समर्थ म्हणतात -
आचार उपासना सोडिती ।
ते भ्रष्ट अभक्त दिसती ।
जळो तयांची महंती ।
कोण पुसे ॥

म्हणून सिद्धांनी देखील साधन सोडता कामा नये. सिद्धपणाच्या घमेंडीत जो साधन सोडील तो बद्धच समजावा.

साधन न मने जयाला ।
तो सिद्धपणें बद्ध झाला ॥

ज्ञानबळे उपासना ।
आह्मी भक्त जरी मानूं ना ।
तरी या दिषाच्या पतना ।
पावों अभक्त पणें ॥

जो सर्वोत्तम, श्रीराम त्याचा.
सर्वांमधें जो उत्तम ।
त्या नांव सर्वोत्तम ॥