मनाचे श्लोक - श्लोक ४१

प्रकाशन: संपादक मंडळ | १२ मार्च २००८

मनाचे श्लोक - श्लोक ४१ | Manache Shlok - Shlok 41

मनाचे श्लोक - श्लोक ४१ - [Manache Shlok - Shlok 41] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ४१


बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं ।
शिणावे परी नातुडे हीत कांहीं ॥
विचारें बरें अंतरा बोधवीजे ।
मना सज्जना राघवीं वस्ति कीजे ॥४१॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


सदैवाटने नो सुखं किंचिदस्तिं ।
श्रमो जायतो नो हितं किंचिदेव ॥
विचारेण लब्ध्वा घनानंदबोधम्‌ ।
सदा रामचंद्रे निवासं कुरुष्व ॥४१॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ सांगत आहेत की,

उगें च वणवण हिंडोन ।
काय होतें ॥

हिंडण्याने हित काहीच होत नाही पण त्याचा शीणच फार येतो. पण,

नित्य नूतन हिंडावें ।
उदंड देशाटण करावें ॥

किंवा

येके ठाई बैसोन राहिला ।
तरी मग व्याप चि बुडाला ।
सावधपणें ज्याला त्याला ।
भेटि द्यावी ॥

कित्येक ठिकाणी समर्थांनी देशाटनाचे महत्त्व फार दर्शवलं आहे. फार काय, “परिभ्रमण” एक सांप्रदायाचे लक्षण ठरवलं आहे. पण त्या पर्यटनाचा हेतु वेगळा. परमेश्वरप्राप्तीसाठी हिंडायचे असेल तर मात्र तो हेतु हिंडण्याचे साध्य व्हावयाचा नाही.

येक म्हणती फिरावें ।
तीर्थाटण ॥

त्यावर

येक म्हणती हे अटाटी ।
पाणी पाषाणाची भेटी ।
चुबकुळ्या मारितां हिंपुटी ।
कासावीस व्हावें ॥

हेच खरे. परिभ्रमण हा परमेश्वरप्राप्तीचा उपाय नव्हे. प्राप्तीचा उपाय म्हटला म्हणजे बसल्या ठायी विचारें बरें अंतरा बोधवीजे ।

विचार करून स्वतःच्या अंतःकरणाला बोध करावा. समर्थांनी त्यांच्या सर्व साहित्यांमध्ये याच विवेकी विचाराला अत्यंत महत्त्व दिलं आहे.

संसारत्याग न करितां ।
प्रपंचउपाधी न सांडितां ।
जनामध्ये सार्थकता ।
विचारें चि होये ॥

विचार पाहेल तो पुरुषु ।
विचार न पाहे तो पशु ।
ऐसी वचनें सर्वेशु ।
ठाई ठाई बोलिला ॥