मनाचे श्लोक - श्लोक ३६

प्रकाशन: संपादक मंडळ| ७ मार्च २००८

मनाचे श्लोक - श्लोक ३६ | Manache Shlok - Shlok 36

मनाचे श्लोक - श्लोक ३६ - [Manache Shlok - Shlok 36] समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक, श्लोकाचा अर्थ, संस्कृत रुपांतर आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.

मनाचे श्लोक - श्लोक ३६


सदा सर्वदा देव सन्नीध आहे ।
कृपाळुपणे अल्प धारीष्ट पाहे ॥
सुखानंद आनंद कैवल्यदानी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३६॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


ह्रदि स्वे स्थितो याद्दशो यस्व भावो ।
वसत्यंजसा तादृशस्तत्र देव: ॥
अनन्यस्य यो रक्षकश्र्चापपाणि: ।
स नोपेक्षते रामचंद्र: स्वभक्तम्‌ ॥३६॥समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - अर्थ


श्रीसमर्थ येथे आपल्याला सांगत आहेत की, देव सदा सर्वकाळ आपल्याच जवळ निवास करत असतो. फक्त आपल्या हृदयातील भाव तेवढा प्रबळ नसल्याने आणि दृष्टी अस्वच्छ असल्या कारणाने तो पावताना दिसत नाही. जसा भाव, तसा देव !

बहु काळ गेले देवासी धुंडितां ।
देव पाहों जातां जवळी च ॥

जवळी च असे ।
पाहातां न दिसे ।
सन्नीध चि वसे रात्रदिस ॥

रात्रदिस देव बाह्यआभ्यांतरी ।
जीवा क्षणभरी विसंभेना ॥

विसंभेना परी जीव हे नेणती ।
जाती अधोगती म्हणोनीयां ॥

निसर्गाच्या नियमाप्रमाणे, या जगात कुठलीही गोष्ट फुकटात मिळत नाही. मग ती परमेश्वर प्राप्ती का असेना. एखादं कार्य करण्यासाठी आपल्या हृदयात त्याची तळमळ असेल आणि आपण कष्टाचं पहिलं पाऊल टाकलं तर, पुढची शंभर पाऊले टाकण्यास देव स्वतः आपल्याला सहाय्य करतो. हेच तत्त्व इथे मांडून समर्थ आपल्याला सांगतात की, जर राम हवा असेल तर त्यासाठी आधी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजे. राम स्वतः येऊन आपल्या डोक्यावर हात ठेवणार नाही. आणि यासाठी आपण किती प्रयत्नशील आहोत, आपण किती धैर्यशील आहोत, हे कृपाळूपणे श्रीराम बघत आहे ! आपण एक पाऊल टाकावं की राम पुढचं सर्व बघून घेईल, कारण तो फार दयाळू आहे.

मातेचें हृदय कोमळ ।
नोळखोनी भयभीत बाळ ।
तेवी श्रीराम कृपाळ ।
भक्तपरीक्षा आरंभी ॥

संकटामागें संकट ।
येतां धैर्य धरी चोखट ।
तरी भक्तासी दीर्घ काळ वाट ।
पाहणें नलगे ॥

ऐसा कृपाळु देवाधिदेव ।
पाहे शरणागताचा भाव ।
परी हेतु तद्रक्षणीं सर्व ।
मातेपरी मुळीहुनी ॥

माय बाप रामराया ।
ज्यातें दास नित्य गाय ।
ते चि धरी घट्ट पाय ।
आलिया रे ॥

श्रीराम सुखानंद स्वरुप असून कैवल्य प्रदान करणारा म्हणजे मोक्ष देणारा आहे, हा बोध समर्थ आपल्याला करुन देत आहेत.